राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांच्या मुद्द्यावर भाजप आणि राष्ट्रवादीचा अजित पवार यांचा गट यांच्यात सध्या सगळं काही अलबेल नाहीये. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशन कामकाजादरम्यान नवाब मलिक सत्ताधारी पक्षांच्या बाकावर जाऊन बसले, यानंतर विरोधकांकडून सत्ताधारी भाजपवर टीका करण्यात आली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहून मलिकांना सत्तेत सहभागी करता येणार नाही असं पत्र लिहीलं. या पत्रानंतर भाजपवर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मलिकांवर झालेले आरोप प्रफुल्ल पटेल यांच्यावर देखील झाले होते असा मुद्दा उपस्थित करत फडणवीसांना कोंडीत पकडले. दरम्यान काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी देखील तोच मुद्दा उपस्थित करत भाजपवर हल्लाबोल केला आहे.
सचिन सावंत यांनी अजित पवार आणि भाजप तसेच देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. "नवाब मलिक यांना देशद्रोही ठरवण्याचे कारण त्यांनी दाऊदशी संबंधित मालमत्ता घेतली हा आरोप व तपास यंत्रणांकडून चौकशी - प्रफुल्ल पटेल यांनी इक्बाल मिर्चीशी संबंधित मालमत्ता घेतली - इडीने ती ताब्यात घेतली तरी भाजपाला चालते पण नवाब मलिक चालत नाहीत.
इतकेच काय? RKW डेव्हलपर्स लिमिटेड आणि सनब्लिंक रिअल इस्टेट या कंपन्यांची ED द्वारे टेरर फंडिंग तसेच इक्बाल मिर्चीशी असलेल्या संबंधांची चौकशी केली जात आहे. भाजपाने या कंपन्यांकडून ₹२० कोटी देणगी घेतली तेही चालते. आता भाजपा नेते भाजपा अध्यक्षांना पत्र कधी लिहिणार?" असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
"असो! अजितदादांनी आपल्या सहकाऱ्याला भाजपाच्या दबावात वाऱ्यावर सोडणे योग्य नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची नवाब मलिकांबद्दलची भूमिका योग्य आहे का? यावर अजितदादांनी भूमिका स्पष्ट करावी. उगीच उत्तर नाही म्हणून "एक मिनिट - एक मिनिट" करुन पत्रकारांना धमकावू नये." असा शब्दात सावंत यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला आहे.
अजित पवारांची भूमिका काय?
नवाब मलिक यांच्या मुद्द्यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले होती की, आमदार नवाब मलिक यांना कुठे बसू द्यावे, हा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे. त्यावर मी बोलणे योग्य नाही. वैद्यकीय जामीनावर सुटल्यानंतर ते पहिल्यांदाच हिवाळी अधिवेशनात आले. मात्र, कुठल्या गटात आहेत याबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर मी भाष्य करेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.