पंचायत समिती सदस्य ते जिल्हा परिषदेचे सभापती, आमदार, खासदार ते राज्यसभा सदस्य आदी पदं त्यांनी अनुभवली. पण त्यांनी कधीच माती आणि मातीतली माणसं सोडली नाही.
"सत्यजीत, आता माणसं जमव, चांगली तरुण मुलं तयार कर, वेगवेगळ्या जातीधर्मातल्या युवकांना सोबत घे. लक्षात ठेव, पुढच्या २५ ते ३० वर्षांची काँग्रेस पक्षाची फळी तू तयार करतो आहेस." महाराष्ट्र युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी जेव्हा राजीवभाऊंना पहिल्यांदा भेटायला गेलो तेव्हा त्यांनी जे मार्गदर्शन केलं, ते आयुष्यभर पालन करण्याजोगं आहे. काँग्रेस पक्ष फक्त कार्यकर्ते घडवत नाही, तर ते माणसं घडवतं, याचि प्रचिती देणारे हे मार्गदर्शन होतं.
भाऊंसोबत २००४ ते २००५ मध्ये माझा संबंध आला. तेव्हा ते पंचायत समितीचे सदस्य होते. त्यावेळेस प्रत्यक्ष भाऊंचे काम पाहण्याची संधी मिळाली. पुढे २००७ मध्ये त्यांच्याच सोबत मीही जिल्हा परिषदेला निवडून आलो. ते हिंगोली जिल्हा परिषदेचे सभापती आणि मी नगर जिल्हा परिषदेचा सदस्य झालो. २००७ मध्ये राहुल गांधींनी युवक काँग्रेस आणि एनएसयुआय प्रभारी म्हणून जबाबदारी घेतली, तेव्हा त्यांनी युवकांमध्ये ‘टॅलेंट हंट’ म्हणून प्रक्रिया सुरू केली होती. या माध्यमातून युवक काँग्रेस व इतर संघटनांमध्ये नवीन चेहऱ्यांना, कुशल कार्यकर्त्यांना पदनियुक्तीद्वारे संधी दिली जात होती. त्यासाठी भाऊ आणि मी दिल्लीला वारंवार बैठकांना जायचो. अनेकदा प्रवासातही विद्यार्थ्यांच्या, तरुणांच्या प्रश्नांवर चर्चा करायचो. सहकारी या नात्यासोबतच समविचारांतून आमची जवळीक अधिक वाढली.
कुटुंबवत्सल
राहुल गांधींनी मला युवक काँग्रेसमध्ये पदोन्नती दिली, आणि तेव्हाच राजीवभाऊ युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. ते अध्यक्ष आणि मी त्यांच्या कमिटीमध्ये सरचिटणीस म्हणून रुजू झालो. यामुळे भाऊंसोबत पहिल्यांदाच प्रत्यक्षपणे काम करण्याची संधी मिळाली. राजकारणाने, संघटनेने दिलेलं हे नातं आम्ही नेहमीच जपलं. आमचं नातं फक्त आमच्यापुरतं न रहाता अगदी घरोब्याचे झाले, माझ्या आईला ते खूप मानायचे, तिच्याशी अनेकदा फोनवर बोलायचे. माझ्या आई-वडिलांना मावशी व काका म्हणूनच संबोधायचे. त्यांना व मला दोघांनाही मुली असल्याने ते सतत मला आपल्या मुलींबरोबर कसा वेळ घालवणे महत्त्वाचे आहे, हे सांगायचे. ते नेहमी म्हणायचे, " आपली मुलगी लहान आहे, तेव्हाच तिच्याबरोबर भरपूर वेळ घालवून बॉंडिंग वाढवले पाहिजे, एकदा की मुली मोठ्या झाल्या की खूप मर्यादा येतात. त्यांची ही कुटुंबवत्सल बाजू फार कौतुकास्पद होती.
राजीव भाऊंचा जीवनप्रवास मी जवळून पाहिला आहे. पंचायत समिती सदस्य ते जिल्हा परिषदेचे सभापती, आमदार, खासदार ते राज्यसभा सदस्य आदी पदं त्यांनी अनुभवली. पण त्यांनी कधीच माती आणि मातीतली माणसं सोडली नाही. त्यामुळेच पक्षासाठी बिकट परिस्थिती असतानाही २०१४ मध्ये हिंगोली मतदारसंघातून ते निवडून आले. काँग्रेसमध्ये अभिप्रेत असलेले सर्व नेतृत्वगुण त्यांनी आत्मसात केले होते. निष्ठावान, मितभाषी आणि जमिनीशी नेहमीच जोडलेले भाऊ काँग्रेसमध्ये राहुल गांधींच्या अतिशय विश्वासातले सहकारी बनले. काही माणसं जेव्हा या विश्वातून जातात, तेव्हा ते एक व्यक्ती म्हणून जात नाहीत, तर एक संस्था या जगात वसवून जातात. काँग्रेस पक्षात गेली २० वर्षे कार्यरत असलेली एक संस्थाच आज हरपली आहे.
(लेखक महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष आहेत.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.