मुंबई : पंतप्रधान मोदींच्या (PM Modi Security Lapse) सुरक्षेमध्ये मोठी चूक झाल्याने त्यांची पंजाबमधील सभा रद्द करण्यात आली, असं केंद्रीय गृहमंत्रालयानं सांगितलं आहे. त्यानंतर त्यांना भटींडा विमानतळावर परत नेण्यात आलं. मोदींच्या सुरक्षेवरून भाजप (BJP) आणि काँग्रेसमधील (Congress) नेते एकमेकांवर टीका-टीप्पणी करत आहेत. यावर राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रतिक्रिया दिली असून जे पेरलं ते उगवलं, असं पटोले म्हणाले.
''केंद्र सरकारने शेतकऱ्यांना न विचारता कृषी कायदे आणले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. त्यामध्ये शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला. त्याचा परिणाम आज पंजाबमध्ये पाहायला मिळाला. काही राज्यांमध्ये चाललेल्या निवडणुकीत स्वतः सहानुभूती मिळविण्यासाठी हा प्रकार केलाय. ठरवून दिलेल्या रस्त्यानं न जाता दुसऱ्या रस्त्याने जायचं आणि वरून आपणच कांगावा करायचा हे पंतप्रधानांना शोभत नाही. त्यांच्या पदाला शोभत नाही'', अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.
राज्यातील भाजप नेत्यांकडून निषेध -
पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेच्या प्रश्नावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निषेध व्यक्त केला आहे. या घटनेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी दोन्ही नेत्यांनी केली असून पंजाब सरकारवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेत गंभीर चूक झाल्यानंतर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी एक शब्दही बोलू नये, हे सर्वात वाईट आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
गृहमंत्रालयानं काय म्हटलं? -
''पंतप्रधान मोदी आज सकाळी भटींडामध्ये उतरले आणि हेलिकॉप्टरद्वारे ते हुसैनीवालामध्ये राष्ट्रीय शहीद स्मारकाला जाणार होते. २० मिनिटं वाट पाहून वातावरण ठीक झालं नाही. त्यामुळे त्यांनी रस्त्याने कार्यक्रमस्थळी पोहोचण्याचा निर्णय घेतला. पंजाब पोलिसांच्या महासंचालकांकडून सुरक्षा व्यवस्थेबाबत दुजोरा मिळाल्यानंतर मोदींचा ताफा रवाना झाला. कार्यक्रमस्थळापासून ३० किलोमीटर अंतरावर मोदींचा ताफा उड्डाणपुलावर पोहोचला असता काही आंदोलकांनी त्यांचा ताफा रोखला. त्यामुळे मोदी १५-२० मिनिटं उड्डाण पुलावर अडकून पडले होते. पंतप्रधानांच्या सुरक्षेत गंभीर चूक होती. त्यामुळे त्यांना परत भटींडा विमानतळावर नेण्यात आले.'' असं गृहमंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.