सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंना दोनदा पराभवाचा चटका सहन करावा लागला. वडिलांच्या पराभवाचा बदला घेण्याची तयारी आता आमदार प्रणिती शिंदेंनी सुरू केली असून त्यासाठी खासदारकीच्या निवडणुकीत त्यांना उतरविण्याची तयारी सुरू आहे.
पण, भाजप उमेदवारांकडून दोन्हीवेळी श्री. शिंदे दीड लाख मताधिक्यांनी पराभूत झाले आहेत. हा फरक तोडल्याशिवाय काँग्रेसला विजय शक्य नाही, अशी स्थिती आहे.
आता राज्यातील बदललेल्या सत्तासंघर्षामुळे आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सहापैकी ‘शहर मध्य’ विधानसभा मतदारसंघ वगळता सर्वच ठिकाणी सत्ताधारी आमदार आहेत.
त्यामुळे आमदार प्रणिती शिंदेंच्या उमेदवारीने हा मतदारसंघ काँग्रेसला परत मिळेल का, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. भाजपचा उमेदवार कोण?, यावरही बरेच काही अवलंबून असणार आहे.
माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आतापर्यंत तीनवेळा खासदारकी मिळविली आहे. तत्पूर्वी, या मतदारसंघात सुरजरतन फतेहचंद दमाणी यांच्याशिवाय कोणालाही तीनवेळा खासदारकीची संधी मिळाली नव्हती.
गंगाधर कुचन, धर्मण्णा सादूल यांना मतदारांनी या मतदारसंघातून प्रत्येकी दोनदा नेतृत्व करण्याची संधी दिली होती. सोलापूर लोकसभा मतदारसंघ सर्वाधिक काळ काँग्रेसकडेच राहिला आहे.
१८ निवडणुकांपैकी १० निवडणुकांमध्ये काँग्रेसने तर पाचवेळा भाजप आणि प्रत्येकी एकवेळा शेतकरी कामगार पक्ष व संयुक्त राष्ट्र समितीच्या उमेदवाराला खासदारकीची संधी मिळाली आहे. पण, सध्याची राजकीय समीकरणे खूपच बदलली आहेत.
श्री. शिंदे यांचा दोनदा पराभव झाला, त्यावेळी मोहोळ, शहर मध्य, पंढरपूर-मंगळवेढा या मतदारसंघात काँग्रेससह आघाडीचे आमदार होते.
२०१४ मध्ये अक्कलकोटमध्ये काँग्रेसचे सिद्धाराम म्हेत्रे आमदार होते. २०१९पासून सचिन कल्याणशेट्टी भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे लोकसभा जिंकण्यासाठी काँग्रेस उमेदवाराला विरोधकांच्या पुढे एक पाऊल टाकत राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करून आघाडीतील आजी-आमदारांची साथ मिळवावी लागणार आहे.
पराभवाचा बदला पूर्ण करण्याची संधी देणारा मतदारसंघ
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून १९८९ च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार लिंगराज वल्याळ यांचा धर्मण्णा सादूल यांनी पराभव केला होता. पण, अखेर १९९६च्या निवडणुकीत लिंगराज वल्याळ यांनी श्री. सादूल यांचा पराभव करून बदला पूर्ण केला.
१९९८च्या निवडणुकीत श्री. शिंदेंनी हा मतदारसंघ काँग्रेसकडे खेचला. मात्र, २००३ मध्ये श्री. शिंदे राज्यात आले आणि या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत प्रतापसिंह मोहिते-पाटलांना खासदारकीची संधी मिळाली. त्यानंतर सुभाष देशमुखही भाजपकडून खासदार झाले.
मतदारसंघ आपल्या हातून निसटल्याची जाणीव होताच काँग्रेसने पुन्हा २००९च्या निवडणुकीत श्री. शिंदेंना उतरवले आणि भाजपचे उमेदवार ॲड. शरद बनसोडेंचा एक लाखाच्या मताधिक्यांनी पराभव करीत मतदारसंघ परत मिळविला.
मात्र, २०१४च्या मोदी लाटेत हा मतदारसंघ भाजपकडे आला आणि ॲड. बनसोडेंनी सुशीलकुमार शिंदेंचा दीड लाखांच्या फरकाने पराभव करत विजय मिळवून बदला पूर्ण केला. आता आमदार प्रणिती शिंदे या वडिलांच्या पराभवाचा बदला पूर्ण करतात का?, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.