नवी दिल्ली- विदर्भातील काँग्रेस नेत्यांचा वाद दिल्ली दरबारी गेला आहे. चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांना दिल्लीला बोलावण्यात आलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी वादावर तोडगा काढण्याचा पक्षश्रेष्ठींचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.
दोन्ही नेत्यांसोबत पक्षाचे वरिष्ठ नेते बैठक घेणार आहेत. काँग्रेसचे संघटक सरचिटणीस केसी वेणुगोपाल, राज्य प्रभारी रमेश चेंनिथाल्ला यांच्यासोबत बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बैठकीनंतर तरी वाद मिटतो का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.