बीड : तु एमबीएच कर, तुझी पर्सनॅलीटी एमबीएलाच सुट होणारी आहे. युपीएससी तुला झेपणार नाही, असा सल्ला दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर ज्या महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले त्याच महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी दिला. परंतु, तरीही पदवी परीक्षेच्या शेवटच्या पेपरच्या रात्रीचीच युपीएससीची तयारी करण्यासाठी ट्रेन पकडून दिल्ली गाठली. पहिल्या प्रयत्नात अपयश तर आलेच.
शिवाय कोविडच्या महामारीत पुन्हा घरीच परतून अभ्यास केला. त्यातही प्रिलिमनरी परीक्षेच्या दोन दिवस अगोदर वडिलांना कोविडची बाधा झाल्याने कुटुंबासह सर्वच टेन्शनमध्ये. तरीही युपीएससीची परीक्षा पास करुन आयपीएसला गवसणी घातली. विशेष म्हणजे, आयपीएसच्या खडतर ट्रेनिंगमध्येच अभ्यास करुन पुन्हा प्रयत्न करुन आयएएसला गवसणी घातली. त्यांच्या युपीएससीच्या चार पैकी दोन प्रयत्नांत त्यांना यश आले. दुसऱ्या प्रयत्नात आयपीएस ओडीसा कॅडर तर चौथ्या प्रयत्नात आयएएसचे महाराष्ट्र कॅडर मिळाले.