क्रिकेटपटूंना डिसेंबरपासून स्पर्धांची पर्वणी! १४, १६, १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा; सोलापूर, सांगली, धाराशिव, सातारा या जिल्ह्यांमध्ये सामने

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली पुढील महिन्यापासून १४, १६ व १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या सामन्यांना सुरवात होईल. खुल्या गटांच्या स्पर्धांचाही त्यात समावेश आहे. या स्पर्धांसाठी सोलापूर जिल्ह्यातील सहा मैदानांची उपलब्धता पाहिली जात आहे.
क्रिकेट स्टेडियम
क्रिकेट स्टेडियमsakal
Updated on

सोलापूर : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली पुढील महिन्यापासून १४, १६ व १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या सामन्यांना सुरवात होईल. खुल्या गटांच्या स्पर्धांचाही त्यात समावेश आहे. या स्पर्धांसाठी सोलापूर जिल्ह्यातील सहा मैदानांची उपलब्धता पाहिली जात आहे. मैदानांच्या उपलब्धतेनुसार त्या त्या मैदानांवर या स्पर्धांमधील सामने होणार आहेत.

डिसेंबरपासून आंतरजिल्हा क्रिकेट सामन्यांना सुरवात होणार आहे. सोलापूर, सांगली, धाराशिव व सातारा या दक्षिण विभागातील संघांमध्ये सामने रंगणार आहेत. यावर्षी विशेष बदल म्हणजे चारही जिल्ह्यातील खेळाडूंचा एकत्रित स्वतंत्र संघ निवडला जाणार आहे. पाच संघांमध्ये १४ वर्षांखालील स्पर्धा खेळविली जाणार असून त्याची निवड चाचणी पुढील आठवड्यात पार पडेल.

निवड समितीचे अध्यक्ष राजेंद्र गोटे, वैभव इराबत्ती, डॉ. महेश ढेंमरे, सत्यजित जाधव, विक्रांत पवार आणि जिल्हा क्रिकेट असोसिशनचे सचिव चंद्रकांत रेंबुर्से हे त्या संघाची निवड करतील. २०-२० सामने, आयपीएलसह इतर सामन्यांमुळे अलिकडे तरुणांचा क्रिकेटकडे ओढा वाढला आहे. त्यामुळे निवड चाचणीवेळी नेहमीच १५०हून अधिक खेळाडू येतात. त्यातून १९ जणांची निवड केली जाते. प्रत्यक्षात ११ व तीन राखीव खेळाडू आणि संघ व्यवस्थापक सामन्यांसाठी निवडले जातात. काही अडचणींमुळे एखादा खेळाडू सामने खेळू न शकल्यास इतर पाच राखीवमधील खेळाडूला त्याठिकाणी संधी मिळते.

डिसेंबरपासून टप्प्याटप्प्याने मैदानांची उपलब्धता, खेळाडूंच्या परीक्षा या बाबींचा विचार करून चार प्रकारच्या स्पर्धा पार पडतील. सामन्यांचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून केला जातो. खेळाडूंची राहण्याची, जेवणासह सर्व सोयी असोसिएशनकडूनच पाहिल्या जातात.

‘क्रिकहिरो’तून समजेल खेळाडूंची कामगिरी

‘क्रिकहिरो’ म्हणून मोबाईल ॲप असून त्यात प्रत्येक खेळाडूने केलेली कामगिरी नमूद आहे. आपल्या आवडत्या कोणत्याही खेळाडूंची कामगिरी त्यातून पहायला मिळते. जिल्हा, राज्य किंवा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचलेल्या प्रत्येक खेळाडूंची कामगिरी केव्हाही त्या ॲपद्वारे आपल्याला पाहता येते.

आठ दिवसांत संघ निवड होईल

आठ दिवसांत आंतरजिल्हा क्रिकेट सामन्यांसाठी दक्षिण विभागाचा स्वतंत्र पाचवा संघ निवडला जाणार आहे. त्यात सोलापूर, सांगली, धाराशिव व सातारा या चार जिल्ह्यातील खेळाडूंची निवड केली जाईल. ही निवड चाचणी सोलापुरातच होणार आहे. मैदानांच्या उपलब्धतेनुसार डिसेंबरपासून १४, १६, १९ वर्षांखालील मुला-मुलींचे व खुल्या गटांचेही सामने खेळविले जातील.

- चंद्रकांत रेंबर्सु, सचिव, जिल्हा क्रिकेट असोसिएशन, सोलापूर

जिल्ह्यात क्रिकेट सामन्यांसाठी ६ मैदाने

आंतरजिल्हा क्रिकेट सामने नेहमी सोलापूर शहरातील भंडारी मैदान, पुष्प ॲकेडमी (डोणगाव रोड), रेल्वे मैदान आणि ग्रामीणमधील अकलूज व बार्शीतील येरमाळा या मैदानांवर खेळविले जातात. त्यात भारतरत्न इंदिरा गांधी पार्क स्टेडिअमचाही समावेश आहे. हे मैदान आंतरराष्ट्रीय दर्जाचे असून नुकताच त्याठिकाणी राज्यस्तरीय सामना पार पडला आहे. आंतरजिल्हा स्पर्धा पार पडल्यानंतर राज्य व राष्ट्रीय स्तरावरील सामने या मैदानावर व्हावेत, यासाठी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न सुरु आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.