Dasara Melava 2022 : दसरा मेळाव्यासाठी चोख नियोजन अन् बंदोबस्त

निष्ठावंत शिवसैनिक मुंबई दाखल झाले
Dasara Melava 2022 shiv sena police security shivaji park uddhav Thackeray mumbai
Dasara Melava 2022 shiv sena police security shivaji park uddhav Thackeray mumbaiesakal
Updated on

मुंबई : मुंबईत दसरा मेळाव्याच्या गर्दीसाठी एकीकडे शिवसेनेतील दोन्ही गटांनी कंबर कसली आहे. दादरच्या शिवाजी पार्कात मिनिट टू मिनिट नियोजनासाठीही तितकीच लगबग दसरा मेळाव्याच्या निमित्ताने दिसून आली. आज सकाळपासूनच शिवसेना पदाधिकाऱ्यांपासून ते पोलीस यंत्रणेकडून पुन्हा पुन्हा दसरा मेळाव्यासाठी खबरदारीसाठीच्या तयारीचा आढावा घेतला. त्यासोबतच तयारीत काही उणीवा राहणार नाही याचीही खातरजमा केली.दसरा मेळाव्यासाठी व्हीआयपीपासून ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या आसन व्यवस्थेच्या बंदोबस्तापासून ते अनुचित घटना घडणार नाही याची खबरदारी घेणारी परेड मुंबई पोलिसांकडून आज झाली. पोलिसांसोबतच शिवसेनेच्या नेत्यांनीही संपूर्ण तयारीचा आढावा आज दसरा मेळाव्याच्या पूर्वसंध्येला घेतला. दुसरीकडे बीकेसीत होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कातही कायदा आणि सुव्यवस्थेची जोरदार तयारी करण्यात आली आहे.

कशी आहे आसन व्यवस्था ?

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कात साडेतीन हजार ते चार हजार इतक्या मोठ्या प्रमाणात आसन व्यवस्था ही खुर्च्याच्या माध्यमातून करण्यात आली आहे. तर उर्वरीत ठिकाणी कारपेटने खालीच बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पार्कातील जागेची मर्यादा पाहता याठिकाणी ४० हजार लोकांची व्यवस्था दसरा मेळाव्यासाठी हजेरी लावण्यासाठी होऊ शकते. हीच बाब लक्षात घेऊन मैदानात पोहचू न शकणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी एलसीडी स्क्रिनचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

शिवसैनिकांकडून मुंबई गाठायला सुरूवात

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे दसरा मेळाव्याला पार्कात येता आले नाही. मी १९८५ पासून दसरा मेळाव्यासाठी अखंडीतपणे लातुरच्या किल्लारीहून मुंबई गाठतो. प्रत्यक्ष बाळासाहेबांचे विचार एकण्यासाठी आलेला एकनिष्ठ शिवसैनिक असल्याची प्रतिक्रिया देविदास भोसले यांनी दिली. बाळासाहेबांनी पावसात घेतलेल्या सभेचीही आठवण त्यांनी बोलून दाखवली. दसरा मेळाव्याच्या एक दिवस आधीच मुंबई गाठणाऱ्या शिवसैनिकांपैकी भोसले हे एक आहेत.  मुंबईत आज यवतमाळ, जळगाव, जालना, लातूर,अमरावती यासारख्या भागातून सर्वसामान्य कार्यकर्ते यायला सुरूवात झाली आहे. अनेकांनी स्वखर्चाने मुंबई गाठली आहे हे विशेष. कोणत्याही आयोजनाची वाट न पाहता स्वेच्छेनेही शिवसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. त्यापैकी काहींनी दादर परिसरातच मुक्कामाची व्यवस्था केली आहे. पदाधिकारी मात्र रातोरात प्रवास करत उद्या सकाळी मुंबईत दाखल होतील असे सांगण्यात आले.

सेना अन् पोलिसांकडून तयारीचा आढावा

आज शिवसेनेतील नेत्यांपैकी भास्कर जाधव तसेच अनिल परब यांनी दसरा मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळचा दसरा मेळावा अभूतपूर्व होईल. लोकांची येण्यासाठी रीघ सुरू झाली आहे. भूतो न भविष्यती अशा एतिहासिक मेळाव्याला आणि सणाला हजेरी लावण्यासारखा यंदाचा मेळावा असेल. देश विदेशातून या मेळाव्याला शिवसैनिक येत असल्याची माहिती शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी दिली तर दुसरीकडे पोलीस प्रशासनाकडून अतिरिक्त आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनीही पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेतला. मुंबईत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस वर्गाला अलर्ट राहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. तसेच सावधगिरीचा उपाय म्हणून कोणत्याही प्रसंगासाठी अलर्ट राहण्याचेही आदेश त्यांनी यावेळी दिले.  

पार्किंगसाठी शोधाशोध

शिवाजी पार्कात आजपासूनच मेळाव्यासाठी वाहने पार्क करण्याची सुरूवात झाली आहे. नेत्यांनाही गाड्यांसाठी पार्किंग शोधताना आज जागा शोधावी लागत होती अशी स्थिती होती. शिवाजी पार्कच्या दिशेने उद्या बुधवारी येणारा गाड्यांचा मोठा ताफा पाहता वाहतूक व्यवस्थेतही अनेक बदल करण्यात आले आहेत. तसेच अनेक मार्गांवर प्रवेशासाठीही वाहतूक पोलिसांनी मज्जाव केला आहे. अनेक ठिकाणी व्हीआयपी गाड्यांसाठीही मार्गांच्या तयारीचा आढावा आज पोलिसांकडून घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.