‘दशसुत्री’ने वाढला नात्यातील गोडवा! ७ वर्षानंतर नातवांना भेटून आजी-आजोबांच्या डोळ्यात पाणी

आजी-आजोबा आणि नातवंडांच्या उबदार नात्याला अधिक दृढता देण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची ‘दशसूत्री’ उपयुक्त ठरली आहे. त्याच दशसूत्रीमुळे माढा तालुक्यातील एका गावातील आजी-आजोबा आणि नातवंडे यांच्यातील सात वर्षांपासूनचा दुरावा दूर करून त्यांच्या नात्यात नवा गोडवा निर्माण झाला आहे.
Happy family
Happy familyesakal
Updated on

सोलापूर : आजी-आजोबा ते नातवंडे, या तीन पिढ्यातील उबदार नात्यांच्या घट्ट बंधनात घर टिकवून असते. मात्र, आजच्या धकाधकीच्या जीवनात विशेषत: आई-वडिल दोघेही नोकरी करत असताना आजी-आजोबांसाठी त्यांना वेळ मिळतो का, हा प्रश्न आहे. दुसरीकडे ज्या घरी आजी-आजोबा नसतील तेथे काय, हादेखील प्रश्न आहे. आजी-आजोबा आणि नातवंडांच्या उबदार नात्याला अधिक दृढता देण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची ‘दशसूत्री’ उपयुक्त ठरली आहे. त्याच दशसूत्रीमुळे माढा तालुक्यातील एका गावातील आजी-आजोबा आणि नातवंडे यांच्यातील सात वर्षांपासूनचा दुरावा दूर करून त्यांच्या नात्यात नवा गोडवा निर्माण झाला आहे.

बटव्यातून गुपचूप खडीसाखर तळहातावर ठेवणारी आजी घराघरातून हरवत चालली आहे. मुलांना नात्यांची ओळख करून देणारे आजी-आजोबा कुटुंबात राहिलेच नाहीत. आजी-आजोबा हे संस्काराचे विद्यापीठ आहेत. मात्र, या विद्यापीठाचे रितेपण समाजाला घातक आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा परिषदेची दशसूत्री हा उपक्रम संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्यासाठी अतिशय प्रेरणादायी ठरत आहे. आजी-आजोबा म्हणजे संस्कारांचे विद्यापीठ; पण ही व्यवस्थाच दुर्मिळ होत चालली आहे. आधुनिकतेचा आव आणणाऱ्या जगात आजी-आजोबांची जागा वृद्धाश्रमाने घेतली आहे. जन्मदात्या आई-वडिलांना विभक्त करण्याची प्रवृत्ती समाजात वाढू लागली आहे. एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास झाल्याने कुटुंबव्यवस्थाच ढासळू लागली आहे. भविष्यातील संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी हे काही चांगले लक्षण नाही. या पार्श्वभूमीवर संस्काराची जपणूक व्हावी आणि आजी-आजोबा नातवंडांच्या नात्यातील ओलावा जोपासला जावा, यासाठी ही दशसूत्री पालक, विद्यार्थी आणि समाजाने आचरणात आणण्यासारखी आहे.

अशी आहे दशसूत्री...

  • संस्कारक्षम शिक्षण; देशभक्ती व मातृ-पितृ भक्ती वाढविणे

  • गुणवत्ता पुर्ण शिक्षण प्रदान करणे

  • स्पर्धाक्षम विद्यार्थी तयार करणे

  • आरोग्यवर्धक, आनंददायी व नाविण्यपूर्ण शिक्षण

  • तंत्रस्नेही व आयटीक्षम शिक्षण

  • मुलांच्या सुप्त गुणांना वाव देणे; स्व:अभिव्यक्तीस प्रोत्साहन

  • कौशल्य चिकित्सक विचार

  • सृजनशिलतेची कास अन्‌ ज्ञानातील आधुनिकतेनुसार शिक्षकांनी अध्यापन करणे

  • स्वावलंबन प्रवृतीला चालना

  • गुरुकुल पध्दतीला उजाळा देऊन शंभर टक्के विद्यार्थी उपस्थिती

दशसूत्री अशी राबविली जाते...

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सुरवातीला सर्व शाळांना भेटी दिल्या. या भेटीतून त्यांना मुलांच्या भावाना जाणून घेतल्या. त्यावेळी जाणवलेल्या मुलांमधील समस्या व उणीवांमधून दशसूत्रीचा जन्म झाला. त्यानंतर त्यांनी तालुकानिहाय मुख्याध्यापकांच्या (१३) कार्यशाळा घेतल्या. शिक्षकांनाही सूचना केल्या आणि लिखित स्वरूपात ही दशसूत्री शाळाशाळांपर्यंत पोहचली. त्यानंतर मुले दररोज आई-वडिल, आजी-आजोबा, वडिलधाऱ्यांसह गुरुजींच्या पाया पडू लागले. त्याचेच यश म्हणजे माढा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील दोन विद्यार्थी व त्यांच्या आजी-आजोबातील दूरावा दूर झाला.

एकत्र कुटुंब पध्दतीची गरज अन्‌ फायदे…

  • मुलांमध्ये निर्माण होते सुरक्षिततेची भावना

  • आई-वडिल आणि मुलांमधील हरवलेला संवाद आजी-आजोबांमुळे भरून निघतो

  • आजी-आजोबांमुळे जुन्या रुढी-पंरपंरा, संस्कार आणि धार्मिक गोष्टींचे मिळते बाळकडू

  • वडिलधाऱ्यांबद्दल वाढतो आदरभाव; चांगला नागरिक म्हणून मुलांचे नेतृत्व खुलते

  • आजी-आजोंबाच्या गोष्टी सांगण्याने मुलांचा कमी होईल टीव्ही, मोबाईलचा अतिवापर

मुलांच्या सदृढ आरोग्यासाठी…

आधुनिक जीवनशैलीमुळे आई-वडिलांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. विभक्त कुटुंबामुळे पालक आणि मुलांमधील दुरावा वाढून ते एकाकी पडतात. त्यामुळे मुलांमधील नैराश्य, एकलकोंडीपणा वाढीस लागतो. यातून अनेकदा शारीरिक व सामाजिक समस्या निर्माण होऊ लागल्या असून अनुचित घटनाही घडत आहेत. या गोष्टी टाळण्यासाठी एकत्र कुटुंब आणि त्या घरात आजी-आजोबा असणे काळाची गरज आहे.

औद्योगिकरण अन्‌ पाश्चिमात्य जीवनशैलीमुळेच कुटुंबव्यवस्थेचा ऱ्हास

भारतीय कुटुंबव्यस्थेचा ऱ्हास का होतोय, याबद्दल ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉ. सी. डी. कांबळे म्हणतात, आपली समाजव्यवस्था खेड्याची रचना व एकत्र कुटुंबपध्दतीवर आधारलेली होती. या व्यवस्थेमुळे संस्कारक्षम पिढ्या आकाराला आल्या. त्यावेळी लहानांबद्दल प्रेम तर मोठ्यांबद्दल आदरभाव होता. नात्यांमधील ऋणानुबंध घट्टपणे टिकून होता. पण, औद्योगिकरणानंतर खेड्यातून अनेकांनी रोजगारासाठी स्थलांतर केले आणि कुटुंबव्यस्थेला घरघर लागली. आधुनिकीकरणामुळे समाजिक मूल्यव्यवस्था विस्कटली आहे. त्यामुळे गावातील त्यांच्या आई-वडिलांसह कुटुंबातील इतर सदस्यांसाठी त्यांना वेळ मिळालाच नाही. याचा दुरगामी परिणाम आजही पहायला मिळतात. ज्या देशांची ही जीवनशैली आपण स्वीकारली, तेथे कुटुंबव्यवस्था एवढी प्रभावी नाही. त्याच पाश्चात्य जीवनशैलीचा भारतीय कुटुंबव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे. आता पुन्हा आपल्याला भारतीय परंपरा, ग्रामीण जीवनशैली, अध्यात्मातून नातेसंबंध दृढ करण्याचा प्रयत्न करायला हवा.

संस्कारक्षम पिढ्यांसाठी ‘हे’ कराच…

  • मुलांसाठी प्रत्येक पालकांनी करावा दशसूत्रीचा जीवनात वापर

  • पाश्चात्य जीवनशैली बदलून त्याला भारतीय परंपरेची द्यावी जोड

  • प्रत्येक माता-पित्यांनी कुटुंबव्यवस्था टिकविण्यासाठी मुलांना द्यावेत संस्काराचे धडे

  • कुटुंबातील सूनेने सासू-सासऱ्यांकडे बघण्याचा बदलावा दृष्टीकोन

  • महाभारत, गीता, रामायण, संत साहित्य, अशा अध्यात्मिक साहित्यांचे मुलांना द्यावे शिक्षण

‘वसुधैव कुटुंबकम्’ची संस्कृती यावी आचरणात

‘वसुधैव कुटुंबकम्’ (विश्व हेच माझे घर) ही संकल्पना भारतानेच संपूर्ण जगाला दिली. पण, आता तीच भारतीय संस्कृती आणि भारतीय कुटुंबव्यवस्थेच्या सामाजिक मूल्याची उतरंड ढासळली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला ‘वसुधैव कुटुंबकम्’कडेच गेले पाहिजे. श्रीकृष्णाशिवाय आणि भगवद्गीतेशिवाय वसुधैव कुटुंबकम् अशक्य आहे. वसुधैव कुटुंबकम् उभं करण्यासाठी निस्वार्थ, निरपेक्ष राहून सर्वांनाच झिजावं लागेल. संस्कारक्षम पिढ्यांसाठी प्रत्येक पालकास त्यांच्या मुलांना पांरपारिक साहित्यांचे बाळकडू पाजावे लागेल. आज ‘वसुधैव कुटुंबकम’चे काम करणाऱ्यांसाठी मोठे आव्हान आहे. हे आव्हान जो स्वीकारेल तोच खरा तरुण, मग तो ६० वर्षांचा असला तरीही तरुणच. २५ वर्षांचा तरुण हे आव्हान स्वीकारत नसेल तर तो म्हातारा, असे समाजावे, हे वेदात म्हटले आहे.

आई-वडिल देवासमान

आई-वडिल, भाऊ-बहिणींचे चरण स्पर्श केल्यास मन:शांती मिळते. त्यामुळे शिक्षण, नोकरी, व्यवसायात सकारात्मक ऊर्जा मिळते. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव। त्वमेव विद्या च द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वम् मम देवदेवं। यातून देखील सर्वांनाच घेण्यासारखे आहे.

- ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, संत साहित्याचे अभ्यासक

संस्कारक्षम नागरिक हाच दशसुत्रीचा उद्देश

शिक्षणाच्या माध्यमातून संस्काराला आधुनिकेतची जोड देऊन प्रत्येकाच्या नात्यातील दुरावा दूर करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळांमध्ये दशसुत्री राबविली जात आहे. त्यातून संस्कारक्षम नागरिक तयार व्हावेत, हा मुख्य हेतू आहे.

- दिलीप स्वामी, सीईओ, सोलापूर जिल्हा परिषद

दशसूत्रीची अंमलबजावणी

  • एकूण शाळा

  • ३,४६०

  • एकूण विद्यार्थी

  • ३.५७ लाख

  • मुख्याध्यापक

  • २,९००

  • शिक्षक

  • १३,७००

२२५ सदस्यांची हॅप्पी फॅमिली

सोलापूर महापालिकेचे माजी नगरसेवक रियाज खरादी यांच्या कुटुंबात एक-दोन नव्हे तर तब्बल २२५ सदस्य आहेत. त्यांच्या कुटुंबातील पहिला सदस्य फातिमाबी इब्राहिम खरादी या ८७ वर्षाच्या आहेत. तर सर्वात लहान सदस्य हलिमा ही एक वर्षाची आहे. अनेक आनंदाचे क्षण एकत्रित साजरे करणाऱ्या या कुटुंबातील मुलांना आई-वडिलांचे तर नातवंडांना आजी-आजोबांचे भरभरून प्रेम मिळत आहे. हीच या कुटुंबाची जमेची बाजू ठरली आहे. तब्बल ५९ वर्षांपासून एकत्रित असलेल्या या हॅप्पी फॅमिलीतील सदस्य डॉक्टर, वकिल, सरकारी नोकरदार, न्यायाधीश, व्यावसायिक, राजकारणी, पोलिस अशा वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.