1.23 लाख पदे भरूनही राज्य शासनात दीड लाख पदे रिक्तच! आता आणखी 50,000 पदभरतीचे नियोजन; पोलिस भरतीचे अर्ज करून 3 महिने झाले, पण मैदानीची प्रतीक्षाच

विद्यमान सरकारने दोन वर्षांत तब्बल सव्वालाख पदांची भरती केली आहे. सरकारच्या ४३ शासकीय विभागांमध्ये अजूनही दीड लाख पदे रिक्त असून आता विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी आणखी ५० हजार पदभरती करण्याचे नियोजन सुरू आहे.
solapur
mantralaysakal
Updated on

सोलापूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाप्रसंगी ७५ हजार शासकीय पदे भरण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आणि कोरोनात दोन वर्षे वाया गेलेल्या तरुणांना मोठा दिलासा मिळाला. विद्यमान सरकारने दोन वर्षांत तब्बल सव्वालाख पदांची भरती केली आहे. सरकारच्या ४३ शासकीय विभागांमध्ये अजूनही दीड लाख पदे रिक्त असून आता विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी आणखी ५० हजार पदभरती करण्याचे नियोजन सुरू आहे. त्याअनुषंगाने शासकीय विभागाकडील रिक्त पदांची माहिती सामान्य प्रशासन विभागाने मागविली आहे.

शासकीय विभागांमधील पदभरती करण्याची ‘एमपीएससी’ची तयारी असतानाही खासगी संस्थांच्या माध्यमातून पदभरती केली जात आहे. आतापर्यंतच्या पदभरतीत अनेक विभागांच्या परीक्षेचे पेपर फुटल्याचे आरोप झाले आणि त्यामुळे नाराज झालेल्या तरुणांचा फटका सरकारला लोकसभा निवडणुकीत बसल्याचे दिसून आले. ‘एमपीएससी’मार्फतच गट ब व क संवर्गाची पदभरती व्हावी, अशी तरुणांची मागणी असून याचा सरकारला गांभीर्याने विचार करावाच लागेल.

राज्य सरकारने सर्वात मोठी शिक्षक, पोलिस, आरोग्य अशा विभागांमधील पदभरती केली. पण, परीक्षा व निकालातील गोंधळ, नेमणुकीस विलंब, अशा कारणांमुळे भरतीपेक्षा त्या गोंधळामुळे बदनामी झाली. आता विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाही ‘एमपीएससी’कडून संयुक्त पूर्व परीक्षा गट क आणि ब या पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. शिक्षक भरती अजूनही अर्ध्यावर असून पोलिस भरतीसाठी अर्ज मागविले, पण भरती सुरू झालेली नाही. त्यामुळे राज्य सरकारला तरुणांची नाराजी दूर करण्यासाठी सर्व सुधारणा करावीच लागेल आणि नवीन नोकरभरती तातडीने करावी लागणार आहे.

विभाग व किती जागांसाठी परीक्षा

शासकीय विभाग पदसंख्या

  • तलाठी ४,६४४

  • जिल्हा परिषदा १९,४६०

  • आरोग्य गट क, ड १०,९४९

  • पोलिस १७,५४०

  • वनविभाग २,३१९

  • सहकार ३०९

  • कृषी सेवक २,१०९

  • नगरपरिषदा १,७८२

  • वैद्यकीय शिक्षण व संशोधन ५,१५५

  • एमआयडीसी ८०२

  • राज्य उत्पादन शुल्क ५११

  • सांस्कृतिक विभाग ३९

  • पशुसंवर्धन ३७६

  • सांस्कृतिक ३९

  • पशुसंवर्धन ३७६

  • एमपीएससी ८,४२१

  • महापालिका १६२८

  • श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान ४७

  • महाराष्ट्र न्यायवैद्य विभाग १२५

  • नागपूर रुग्णालय गट- ड ६८०

  • शिक्षक भरती ११,०८५

  • एकूण १,२३,६१६

पोलिसांच्या १७,४७१ पदभरतीची प्रतीक्षा

राज्याच्या गृह विभागाने मागील वर्षीप्रमाणेच मोठी पोलिस भरती करण्याचे जाहीर केले आणि त्यासाठी तरुणांकडून अर्जही मागवून घेतले. आता एकूण १७ हजार ४७१ पदांची भरती होणार असून त्यासाठी राज्यभरातून तब्बल १७ लाख ७६ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. पण, तीन महिने झाले अर्ज करून अद्याप भरतीची प्रक्रिया सुरू झालेली नाही. अर्ज केलेल्यांमध्ये वयोमर्यादा संपण्याच्या उंबरठ्यावरील हजारो तरूण असून अनेकांचे विवाह थांबल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मैदानी चाचणीला कधीपासून सुरवात होईल की भरती विधानसभेच्या आचारसंहितेत अडकणार, याची अर्जदार तरुणांना चिंता वाटू लागली आहे.

...सत्ताधाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत ‘या’ बाबींमुळे फटका

सध्याच्या विद्यमान सरकारने अनेक शासकीय विभागाच्या परीक्षा घेतल्या, पण अनेक परीक्षा वादाच्या भोवऱ्यात अडकल्या. पेपरफुटी, वाढीव परीक्षा शुल्क, पेपरफुटीवर न केलेला कायदा, एसआयटी नेमूनही न झालेली चौकशी आणि ‘एमपीएससी’तर्फे सर्वच पदभरतीची मागणी असतानाही मध्येच आणलेले खाजगीकरण, या सर्व गोष्टीचा फटका लोकसभा निवडणुकीत सरकार बसला. आता सरकार युवकांच्या अपेक्षा पूर्ण करेल व तातडीने रिक्त पदे भरेल अशी अपेक्षा आहे.

- महेश घरबुडे, कार्याध्यक्ष, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.