कऱ्हाड : देशासाठी, समाजासाठी झटणारी यापूर्वीची पिढी होती. मात्र, अलिकडे स्पर्धा, व्यावसायीकपणा वाढल्याने समाजासाठी काही करावे ही भावनाच कमी झाली आहे. परिक्षा आली की आपण पास होतो, यशामुळे मेडल मिळतात. मात्र, जीवनातील परिक्षा पास झालो की ते गोल्ड मेडलपेक्षा मोठे यश असते. त्याचे आत्मसमाधान पैशातूनही मिळत नाही, असे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
कऱ्हाड (जि.सातारा) येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचा दहावा दीक्षांत सोहळ्यामध्ये ते बोलत होते. विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले अध्यक्षस्थानी होते. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, अतुल भोसले, कुलपतींचे प्रधान सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिनगारे, कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा, कर्नाटकचे उद्योगमंत्री मुरुगेश निराणी, डॉ. ओमप्रकाश शेटे, परीक्षा नियंत्रक डॉ. आर. के. गावकर, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य विनायक भोसले आदी उपपस्थित होते.
श्री. फडणवीस म्हणाले, ‘‘वैद्यकीय क्षेत्रापुढे अनेक आव्हाने उभी आहेत. ती संधी म्हणून स्विकारण्याची गरज आहे. तंत्रज्ञानामुळे आज समाजात, देशात मोठे परिवर्तन सुरू आहे. पूर्वी डॉक्टर हे ग्रामीण भागात काम करण्यास उत्सुक नव्हते. त्यामुळे आम्ही टेलीमेडीसीमच्या माध्यमातून डॉक्टरांनाच ग्रामीण भागाशी कनेक्ट केले. तंत्रज्ञानामुळे ग्रामीण भाग शहरी भागाच्या जवळ आला आहे. मात्र, समाजाचे आपण काही तरी देणे लागतो ही भावना कमी झाली आहे. नेहमी मागे वळून पाहिल्यावर समाजासाठी आपण काही तरी चांगले केल्याचे समाधान मिळाले पाहिजे आणि तरच आपले यश मोठे होते. केवळ स्वतःची प्रगती होऊन समाज मागे राहिला तर आपल्या यशाला काहीच किंमत नाही. जीवनातील परिक्षा पास झालो की ते गोल्ड मेडलपेक्षा मोठे यश असते. त्याचे आत्मसमाधान पैशातूनही मिळत नाही.’’
डॉ. कराड म्हणाले, ‘‘कृष्णा अभिमत विद्यापीठासह कृष्णा रूग्णालयाचे काम कौतुकास्पद आहे. कृष्णा विद्यापीठाला कोरोना लस चाचणीस मान्यता दिली होती. देशातील निवडक रूग्णालयांसह विद्यापीठांनी यास मान्यता दिल्याचे सांगत राष्ट्र उभारणीत कृष्णा अभिमत विद्यापीठासह कृष्णा रूग्णालयाचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.’’ डॉ. सुरेश भोसले म्हणाले, ‘‘कोरोना काळात कृष्णा रूग्णालयाच्या माध्यमातून मोठे काम झाले. कृष्णा रूग्णालयातून पैसे नाहीत, म्हणून कोणावरही उपचार झालेले नाहीत असे ४० वर्षांत कधीच घडलेले नाही. हीच परंपरा यापुढेही कायम ठेवू.’’
‘कृष्णा’ने दिली पहिल्यांदाच डी. लिट.
कृष्णा अभिमत विद्यापीठाकडून यंदा पहिल्यांदाच कर्नाटकचे उद्योग मंत्री मुरूगेश निराणी, ओमप्रकाश शेटे यांना डी. लिट. पदवी प्रदान करण्यात आली. दोन्ही मान्यवरांनी आरोग्य क्षेत्रात भरीव योगदान देत हजारो सर्वसामान्यांसाठी आदर्शवत असे कार्य केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.