‘महावितरण’कडून वीज कनेक्शन तोडणी! थकीत वीजबिल भरा, अन्यथा राहावे लागेल अंधारात; सोलापूर शहरात 64 हजारांवर तर ग्रामीणमधील 2 लाख ग्राहक थकबाकीत

तीन महिन्यांपासून एकही रुपयांचे लाइटबिल न भरणाऱ्या ग्राहकांची महावितरणने यादी तयार केली आहे. आता त्या ग्राहकांचे कनेक्शन तोडण्यात येत आहेत. सोलापूर शहरातील घरगुती, औद्योगिक व व्यापारी ६४,८३२ ग्राहक तर ग्रामीणमधील दोन लाख नऊ हजारांहून अधिक ग्राहक थकीत आहेत.
solapur
light billSakal
Updated on

सोलापूर : मागील तीन महिन्यांपासून एकही रुपयांचे लाइटबिल न भरणाऱ्या ग्राहकांची महावितरणने यादी तयार केली आहे. आता त्या ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्यात येत आहेत. सोलापूर शहरातील घरगुती, औद्योगिक व व्यापारी ६४ हजार ८३२ ग्राहक तर ग्रामीणमधील दोन लाख नऊ हजारांहून अधिक ग्राहक थकीत आहेत. त्यांच्याकडे ६० कोटी रुपयांची वीजबिले थकीत आहेत.

घरोघरी विजेचा प्रकाश पोचविणाऱ्या महावितरणलाच थकबाकीचा शॉक बसत आहे. जूनअखेर जिल्ह्यातील अडीच लाख ग्राहकांकडे महावितरणची ७१ कोटी रुपयांची थकबाकी होती. आता वीज तोडणीची विशेष मोहीम हाती घेतल्यापासून एका महिन्यात ११ कोटींची थकबाकी वसूल झाली आहे. सोलापूर शहरातील ११ हजार घरगुती ग्राहकांनी मागील तीन महिन्यांपासून वीजबिल भरलेले नाही. त्यांच्याकडे सव्वादोन कोटींची थकबाकी आहे. ग्रामीणमध्ये देखील एक लाखांहून अधिक घरगुती ग्राहकांनी वीजबिले भरलेली नाहीत. दररोज विजेचा वापर करत असतानाही त्यांच्याकडून वीजबिल भरले जात नसल्याने आता थेट त्यांचे कनेक्शनच तोडले जात आहे. वीज कनेक्शन तोडण्यापूर्वी थकीत वीजबिले भरावीत, असे आवाहन महावितरणने केले आहे.

पुनर्जोडणी शुल्क भरल्यावरच कनेक्शन

ज्या थकबाकीदारांचे कनेक्शन तोडले जाईल, त्या ग्राहकाला महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने निश्चित केलेले पुनर्जोडणी शुल्क भरावेच लागेल. लघुदाब वर्गवारीतील सिंगल फेजसाठी २१० रूपये, थ्री फेजसाठी ४२० रुपये, उपरी-भूमिगत वीज वाहिन्यांद्वारे दिलेल्या वीजजोडणीतील ग्राहकांना कनेक्शन पुनर्जोडणी करताना सिंगल फेजसाठी ३१० रुपये तर थ्री फेजसाठी ५२० रुपये आणि उच्चदाब वर्गवारीतील ग्राहकास तीन हजार १५० रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे. याशिवाय या रकमेवर १८ टक्के जीएसटी सुद्धा द्यावी लागेल.

जिल्ह्यातील थकबाकीदार वीज ग्राहक

  • विभाग थकबाकीदार एकूण थकबाकी

  • सोलापूर शहर ६४,८३२ १५.६६ कोटी

  • अकलूज २८,२८२ ४.७७ कोटी

  • बार्शी ५१,९१० ११.३५ कोटी

  • पंढरपूर ५९,८६३ १२.४९ कोटी

  • सोलापूर ग्रामीण ६९,०७२ १५.६९ कोटी

  • एकूण २,७३,९५९ ५९.९६ कोटी

थकबाकीदार ग्राहकांनी वेळेत थकीत बिले भरून कारवाई टाळावी

ग्राहकांनी जेवढी वीज वापरली आहे, त्याचे बिल नियमित भरणे अपेक्षित आहे. महावितरणकडून प्रत्येक ग्राहकाला विनाअडथळा वीज दिली जाते. त्यावेळी आम्हाला केवळ ग्राहकांनी नियमित वीजबिल भरणा करावा एवढीच अपेक्षा असते. वीज वापरूनही बिल न भरणाऱ्यांचे कनेक्शन आता तोडले जात आहेत. थकबाकीदार ग्राहकांनी वेळेत थकीत बिले भरून कारवाई टाळावी.

- आशिष मेहता, कार्यकारी अभियंता, सोलापूर शहर

तोडल्यानंतर चोरून वीज घेतल्यास...

थकीत वीज ग्राहकाचे कनेक्शन महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तोडल्यानंतर संबंधित ग्राहकावर लक्ष ठेवले जाते. त्याने चोरून शेजारच्याकडून वीज कनेक्शन घेतल्यास वीज कायद्यातील १२६ कलमानुसार शेजारच्याला अनधिकृत वापराचे बिल आकारले जाते. दुसरीकडे तारेवर आकडा टाकून वीज घेतल्यास वीज कायद्यातील कलम १३५ नुसार संबंधितास वीजबिल आणि तडजोड बिल आकारणी केली जाते. ही रक्कम त्याने न भरल्यास त्याच्याविरुद्ध पोलिसांत फौजदारी गुन्हा दाखल केला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com