अजित पवार गटाने विकास निधी वाटपात न्याय मिळत नसल्याने दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर नाराजी व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अजित पवार गटातील नेत्यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती. याच वेळी त्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांना जास्त निधी मिळतो तर अजित पवार गटातील आमदारांना कमी निधी मिळतो अशी खंत असल्याची माहिती आहे. यावर आता राजकीय नेत्यांची प्रतिक्रिया समोर येत आहेत.
या संपुर्ण प्रकरणावर शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, "त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तरी ते नाराज आहेत हे जाणवतं, पण, नाराजगी वेगवेगळ्या कारणांवर असू शकते. भाजपची प्रथा अशी आहे, नेत्यांना दुसऱ्या पक्षातून आपल्याकडे आणयचं आणि खोटी आश्वासने द्यायची आणि ती आश्वासने पाळायची नाहीत, त्या लोकनेत्याची ताकद भाजप हळुहळू कमी करते, तीच गोष्ट अजित पवार यांच्याबाबतील भाजपने केली असं आमचं सगळ्यांचं मत आहे, असं रोहित पवार म्हणाले आहेत.
"भाजपकडून दिलेली आश्वासनं पूर्ण होत नसल्याने आमदारांमध्ये नाराजी आहे", असा दावा रोहित पवार यांनी केला. "लोकसभेपुरते नाराज आमदारांना वापरतील, सुरूवातीला नेत्यांना, लोकांना आमिष दाखवायचं, पण खरी वेळ आल्यावर काहीच करायचं नाही, अशीच वागणूक भाजप पक्ष देतो", अशी टीकाही रोहित पवार यांनी केली.
मविआत असताना तिजोरी साफ केली
या प्रकरणावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार प्रतिक्रिया देताना म्हणाले, "नेहमीच 'हम करे सो कायदा' अशी ज्यांची भूमिका आहे. तीन पक्षाच्या सरकारमध्ये आता ज्यांना असं वाटतंय की निधी मिळत नाही. पण तिजोरीची चावी आता तुमच्याकडेच आहे, त्यामुळं तुम्ही दुसऱ्यांची तक्रार काय करत आहात. तुमची आता धमक दाखवा, महाविकास आघाडीमध्ये असताना तुम्ही सगळी तिजोरी साफ करत होतात, आता ही धमक अजितदादांनी दाखवावी"
निधी मिळत नाही म्हणून रडण्यापेक्षा दुसऱ्याला रडवण्याची हिंमत आहे का? हे दाखवण्याची गरज आहे. दिल्लीचे चरणदास झालेले आता आपली दादागिरी दाखवूच शकणार नाहीत. रडण्याची स्थिती आता अजित पवारांवर आली असेल भाजपसोबत आलेल्यांना रडवून रडवून सडवतात. त्यामुळं आता रडण्याची आणि सडण्याची वेळ अजित पवारांवर आली असावी, अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.