मुंबई- शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली होती. आता भाजप खासदाराने देखील राहुल गांधी यांच्यावर बोचरी टीका केली आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटायला नाही पाहिजे, तर त्यांच्या जीभेला चटके द्यायला हवेत, असं वादग्रस्त वक्तव्य भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केलं आहे.
राहुल गांधी यांनी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना आरक्षणाबाबत वक्तव्य केलं होतं. यावरून विरोधी पक्षाकडून वातावरण तापवण्याचा प्रयत्न सुरु आहे. यातच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींविषयी बोलताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्या मी ११ लाख रुपये देईन असं बेताल वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे.