मतदानाला जाताना मोबाईल घेवून जावू नका! मतदान करतानाचा व्हिडिओ केल्यास दाखल होणार गुन्हा; ‘ईव्हीएम’वर लक्ष ठेवण्यासाठी केंद्राध्यक्षांना सतर्क राहण्याच्या सूचना

लोकशाहीचा उत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा, यासाठी मतदानाला जाताना कोणालाही जवळ मोबाईल बाळगता येणार नाही. मोबाईल स्वत:जवळ ठेवून मतदान केले आणि त्यावेळचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला किंवा मोबाईलच्या स्टेट्‌सवर ठेवल्यास त्या व्यक्तीविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल केला जाणार आहे.
voter
votersakal
Updated on

सोलापूर : लोकशाहीचा उत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा, यासाठी मतदानाला जाताना कोणालाही जवळ मोबाईल बाळगता येणार नाही. मोबाईल स्वत:जवळ ठेवून मतदान केले आणि त्यावेळचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला किंवा मोबाईलच्या स्टेट्‌सवर ठेवल्यास त्या व्यक्तीविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल केला जाणार आहे. विधानसभा निवडणुकीवेळी असा प्रकार घडू नयेत म्हणून केंद्राध्यक्षांना तसे निर्देश देण्यात आले आहेत.

लोकसभा निवडणुकीवेळी करमाळ्यातील एका मतदान केंद्रावर मतदान करताना एका व्यक्तीने ‘ईव्हीएम’वर हातोडा मारला होता. माढ्यातील एका मतदाराने कांद्याने ‘ईव्हीएम’चे बटन दाबले आणि तो व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाला होता. तर सांगोल्यातील एका मतदाराने पेट्रोल टाकून ‘ईव्हीएम’च जाळण्याचा प्रयत्न केला होता. हा अनुभव लक्षात घेऊन विधानसभा निवडणुकीत असे अनुचित प्रकार घडणार नाहीत, याची दक्षता घेतली जाणार आहे. मतदारांना मोबाईल घेऊन जाता येणार नाही आणि मोबाईल घेऊन गेलाच तर त्यांना मतदान करतानाचा व्हिडिओ काढता येणार नाही. तसा प्रकार आढळल्यास त्या व्यक्तीविरुद्ध पोलिसांमार्फत कठोर कारवाई केली जाणार आहे.

अधिकारी-कर्मचाऱ्यांना निवडणुकीसंदर्भातील प्रशिक्षण देताना आवर्जून अशा संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आदेश केंद्राध्यक्षांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिले आहेत. विधानसभेची निवडणूक निर्भय वातावरणात व शांततेत पार पडावी म्हणून प्रत्येक मतदारसंघात राखीव पोलिस बलाची स्वतंत्र तुकडी तैनात असणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील ११ मतदारसंघातील तीन हजार ७२३ मतदान केंद्रांसाठी एकूण १२ हजारांपर्यंत पोलिसांचा बंदोबस्त नेमला जाणार आहे.

...‘त्या’ व्यक्तीला अजूनपर्यंत नाही जामीन

लोकसभा निवडणुकीवेळी सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथील मतदान केंद्रावर एका मतदाराने पेट्रोल टाकून ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मतदान केंद्रावरील मशिन बदलून मतदान घ्यावे लागले होते. त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्याला अजूनपर्यंत न्यायालयातून जामीन मिळालेला नाही. त्यामुळे कोणीही असे कृत्य करू नये, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्वांना केले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील स्थिती

  • एकूण मतदारसंघ

  • ११

  • एकूण उमेदवार

  • १८४

  • एकूण मतदान केंद्रे

  • ३,७२३

  • एकूण मतदार

  • ३८,४८,८६९

व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे आणि ते प्रसारित करणे गुन्हा

मतदानाला जाताना मतदारास मोबाईल वापरता येणार नाही, असे निर्देश निवडणूक आयोगाचेच आहेत. त्यामुळे मतदारांनी मतदानाला जाताना मोबाईल नेऊ नये. मतदान गोपनीय असल्याने त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे आणि ते प्रसारित करणे गुन्हा आहे. असे करणाऱ्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल होवू शकतो.

- गणेश निऱ्हाळी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.