बाजारात स्टूल टाकून रुग्णांना तपासणाऱ्या डॉक्टरांनी वसंतदादा पाटलांनाच दिला होता धक्का

dr. narsingh pathak won 1972 election by defeating candidate of vasantdada patil in miraj of sangli
dr. narsingh pathak won 1972 election by defeating candidate of vasantdada patil in miraj of sangli
Updated on

सांगली : गेल्या १९६० ते ७० च्या दशकात सांगली आणि दक्षिण महाराष्ट्र परिसरात वसंतदादा पाटलांचे वर्चस्व होते. यशवंतराव चव्हाणांच्या खांद्याला खांदा लावून राजकारण करणारे महान लोकनेता म्हणून त्यांची ओळख होती. त्याकाळी वसंतदादांच्या विरोधात कोणीही उमेदवार द्यायचे धाडस करत नव्हते. मात्र, त्याकाळी प्रत्येक आठवडी बाजारात स्टूल टाकून रुग्ण तपासणाऱ्या एका डॉक्टरने वसंतदादा पाटलांच्या विरोधात जाण्याचे धाडस केले आणि मिरजेच्या जनतेनी त्यांना निवडून देखील दिले. त्याकाळी हा वसंतदादा पाटलांचा सर्वात मोठा पराभव मानला जात होता.

काँग्रेसविरोधी मिरज -

वसंतदादा पाटील यांची दिल्ली ते गल्ली अशी ओळख होती. राज्याच्या राजकारणात वसंतदादा पाटलांचे वर्चस्व होते. ते पदमाळ गावचे होते. ते गाव सांगलीच्या जवळ होते. त्यामुळे दादा नेहमी सांगलीला जवळ करतात आणि मिरजेला दुय्यम लेखतात, अशी मिरजेच्या जनतेची भावना होती. तसेच मिरजेला रेल्वे होती. सांगलीला रेल्वेच्या मुख्य मार्गावर आणायचे, अशी वसंतदादा पाटलांचे स्वप्न होते. मिरजेमध्ये रेल्वेचे जंक्शन आहे. त्यावरच मिरजेची आर्थिक घडी बसलेली आहे. मात्र, वसंतदादा पाटील हे रेल्वे जंक्शन सांगलीला नेणार असल्याची अफवा पसरली होती. त्यामुळे काँग्रेसकडून मिरजेला वारंवार डावलले जात असल्याची भावना मिरजेच्या जनतेत होती.  त्यामुळे सर्व काँग्रेसविरोधी पक्षांनी एकत्र येऊन काँग्रेसला धक्का द्यायचाच असे ठरविले. मात्र, उमेदवार कोण? असा प्रश्न त्यावेळी उपस्थित झाला. त्यावेळी डॉ. नरसिंह पाठक या सेवाभावी डॉक्टरांचे नाव समोर आले. 

डॉ. पाठक मूळचे मिरजेचे रहिवासी होते. मिरज हे मेडीकल हब होते. डॉ. गायकवाड, डॉ. वॉनलेस, डॉ. पाठक, डॉ. गोसावी, डॉ. मजरेलो हे त्याकाळी गाजलेले डॉक्टर होते. त्यापैकी डॉ. नरसिंह पाठक अत्यंत सेवाभावी होते. ते दर आठवडी बाजारात जायचे. पण ते खरेदीसाठी नाही, तर रुग्णांची सेवा करण्यासाठी. आठवड्यात जवळपास ५ ठिकाणी बाजार भरायचा. डॉ. पाठक हे गाडीच्या डिक्कीत औषधांसह वैद्यकीय साहित्य भरायचे अन् बाजारात जात होते. बाजारात स्टूल टाकून रुग्णांना तपासायचे, ते देखील एकही रुपया न घेता. त्यामुळे त्यांच्याविषयी जनतेच्या मनात प्रचंड आदरभाव होता. ते शस्त्रक्रिया विशारद होते. देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक रुग्ण त्यांच्याकडे शस्त्रक्रिया करण्यासाठी यायचे. एकदा माजी पंतप्रधान चंद्रशेखर देखील त्यांच्याकडे उपचारासाठी आले होते. डॉ. पाठक यांचा शस्त्रक्रियेमध्ये हातखंड होता. तसेच त्यांची सेवाभावी वृत्ती पाहून जनता त्यांच्यावर खुश होती. त्यामुळे सर्व काँग्रेसविरोधी पक्षांनी डॉ. पाठक यांना निवडणुकीत उभे करायचे ठरविले. 

१९६७ च्या निवडणुकीत डॉ. पाठक यांचा फक्त ३ हजार मतांनी पराभव झाला. त्याचवेळी मिरजेचा आपल्याला किती विरोध आहे, हे वसंतदादा पाटलांना समजले असावे. पराभूत झाल्यावरही डॉ. पाटील यांची सेवाकार्य सुरूच होते.  

१९७२ च्या निवडणुकीत डॉ. पाठक यांच्या पथ्थ्यावर पडलेले मुद्दे -

  • मिरजेचे हवा आणि पाणी आरोग्याला चांगले आहे, असे समजले जाते. त्यामुळे मिरज हे मेडीकल हब होते. विल्यम वॉनलेस हे पहिले मिशनरी मिरजेला आले होते. ते मूळचे लंडनचे होते. पण शिक्षण मात्र, अमेरिकेत झाले. ते सेवा द्यायला म्हणून भारतात आले आणि त्यांनी ४० वर्ष मिरजेत वास्तव्य केले. त्याकाळी त्यांनी वॉनलेस रुग्णालय काढले. आता त्यालाच मिशन रुग्णालय म्हणून ओळखले जाते. तसेच १९५१- ५२ च्या काळात कुष्ठरोग्याचे पहिले रुग्णालय मिरजेत सुरू झाले. तसेच या भागात टीबीचे प्रचंड प्रमाण होते. त्यासाठी वॉनलेस वाडी येथे चेस्ट हॉस्पीटल तयार करण्यात आले. मिरेजला इतकी मोठी वैद्यकीय पार्श्वभूमी असतानाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सांगलीला हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मिरजेला डावलले जात असल्याची भावना मिरजेच्या जनतेत होती. त्यामुळे मिरजेच्या जनतेमध्ये काँग्रेसविरोधात प्रचंड रोष होता.  
  • डॉ. पाठक यांनी १९७२ च्या निवडणुकीत डॉ. पाठक यांनी अर्ज भरला. त्यावेळी त्यांनी लोकवर्गणीतून निवडणूक लढविणार असल्याचे ठरविले. त्यामुळे जनतेला 'एक व्होट-एक नोट' द्या असे आवाहन केले. प्रचाराला जाताना ते प्रत्येकाकडून एक रुपया घ्यायचे. त्याचा निवडणुकीत किती खर्च झाला याचा हिशोब चौकात लिहून ठेवत होते. त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सर्व प्रचार सायकलने केला.
  • दरम्यान, वसंतदादा पाटलांनी डॉ. पाठक यांच्याविरोधात वसंतदादा पाटील सहकारी कारखान्याचे संस्थापक आबासाहेब शिंदे यांना तिकीट दिले. मात्र, निवडणुकीचे तिकीट घेऊन मिरजेला परतत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यानंतर बापूसाहेब जामदार यांना तिकिट देण्यात आले. 

हे सर्व मुद्दे डॉ. पाठक यांच्या पथ्थ्यावर पडले आणि बहुमताने डॉ. पाठक आमदार झाले. वसंतदादा पाटील यांचे प्रस्थ असलेल्या भागातून डॉ. पाठक बहुमताने निवडून आले होते. त्यामुळे हा वसंतदादा पाटलांना मोठा धक्का मानला जात होता. 

संपादन - भाग्यश्री राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.