ठिबक, तुषार संच खर्चमर्यादेत १० ते १३ टक्के वाढ

Irrigation for farming
Irrigation for farmingesakal
Updated on

बाणगाव बुद्रुक (जि. नाशिक) : केंद्र सरकारने पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत सुरू असलेल्या सूक्ष्म सिंचन योजनेच्या मापदंडात चांगले बदल केले आहेत. ठिबक व तुषार संचासाठी खर्चमर्यादेत १० ते १३ टक्क्यांपर्यंत वाढ केली असून, त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारे अनुदानही वाढून मिळणार आहे.

ठिबक उद्योगात समाधान

विविध पिकांच्या लागवड अंतरानुसार शेतकरी ठिबक व तुषार संच बसवतात. केंद्राने त्यासाठी खर्चमर्यादा आणि अनुदानमर्यादा यापूर्वी २०१६ मध्ये निश्‍चित केली होती. त्यात बदल करण्याची मागणी राज्यातील ठिबक उद्योग व कृषी विभागाकडून सातत्याने केली जात होती. शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप थेट बॅंक खात्यात करण्याची अट केंद्राने कायम ठेवली आहे. त्यामुळे राज्य शासनदेखील महाडीबीटीच्या सध्याच्या ठिबक नियमावलीत बदल करणार नाही.

१.२ मीटर बाय ०.६ मीटर लागवडीसाठी एक हेक्टरवर ठिबक संच बसविल्यास २०१६ च्या नियमावलीनुसार एक लाख १२ हजार २३७ रुपये अनुदान मिळत होते. आता हेच अनुदान एक लाख २७ हजार ५०१ रुपये मिळेल. तुषार संचासाठी पूर्वी हेक्टरी १९ हजार ५४२ रुपये अनुदान मिळत होते. आता नव्या धोरणानुसार २१ हजार ५५८ रुपये मिळतील. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी ५५ टक्क्यांपर्यंत व इतर शेतकऱ्यांसाठी ४५ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते. सूक्ष्म संच अनुदानात पर्यायी सामग्रीलादेखील अनुदान मिळते. खत टाकी, कचरा गाळणी, माती व अन्य जड घटक वेगळे करणारे उपकरण अशी पर्यायी सामग्री यापूर्वी केंद्राच्या अनुदान कक्षेत होती. मात्र, राज्याकडून अनुदान दिले जात नव्हते. नव्या निकषानुसार सॅन्ड फिल्टर, हायड्रो सायक्लॉन फिल्टर (सॅन्ड सेप्रेटेर) फर्टिलायझर्स टॅंक व ठिबक नळी गुंडाळणारे अवजारदेखील (ड्रीप लाइन वाइंडर) आता अनुदान कक्षेत आले आहे. त्यामुळे ठिबक उद्योगातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Irrigation for farming
कांदा तेजीत असतांनाच धाडसत्र कसे? शेतकरी चिंताग्रस्त

शेतकऱ्यांना मिळणार लाखाच्यावर अनुदान

राज्यातील ऊस, भाजीपाला, कापूस उत्पादक मोठ्या संख्येने ठिबककडे वळत आहे. मात्र, या पिकांना योग्य ठरणाऱ्या अंतराला अनुदान मिळत नव्हते. ही बाब केंद्राच्या निदर्शनास आणली गेली. त्यामुळे आता खास या पिकांना डोळ्यासमोर ठेवत १.५ मीटर बाय ०.६ मीटर लागवड असे नवे लागवड अंतर मान्य करण्यात आले आहे. त्यामुळे या अंतरानुसार एक हेक्टरवर ठिबक संच बसविल्यास शेतकऱ्याला एक लाख १४ हजार ४५१ रुपये अनुदान मिळू शकेल.

कोकण व पश्‍चिम महाराष्ट्रात छोटे शेतकरी अर्ध्या एकरमध्ये ठिबक संच बसवून शेती करतात. मात्र, छोट्या अंतरासाठी अनुदानाची तरतूदच नव्हती. केंद्राला हा मुद्दादेखील कळविण्यात आला होता. तो मान्य करीत आता अनुदान नियमावलीत १.५ मीटर बाय १.५ मीटर असे नवे अंतर ग्राह्य धरण्यात आले आहे. त्यामुळे छोट्या शेतकऱ्याला हेक्टरी एक लाख २१ हजार ५५६ रुपये अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अनुदान निकषात केलेले बदल असे...

- ठिबक संच खर्चमर्यादा : १३.५९ टक्के वाढ

- तुषार संच खर्चमर्यादा : १०.४६ टक्के वाढ

- ठिबक नळी गुंडाळणाऱ्या अवजाराला अनुदान

- नियमावलतीत अर्धा एकर क्षेत्राचा समावेश

- अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी

Irrigation for farming
नाशिक : भाजपचे पाच, शिवसेनेचा एक नगरसेवक कुंपणावर

राखीव निधीत अर्धा टक्क्यांनी वाढ

''पाण्याच्या शेतीसाठी पुरेपूर वापर शेतकऱ्यांना करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार जलसिंचनाची सूक्ष्म सिंचन योजना राबवत आहे. जेणेकरून कमी पाण्यातही शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन घेण्यात यावे. नांदगाव तालुक्यात आजपर्यंत ३५० शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घेत तुषार सिंचन संच बसविला आहे. या वर्षी ३०० च्यावर शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत.'' - वसंत नागरे, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी कार्यालय, नांदगाव

''आमच्या भागात कायमच पाणीटंचाई असते. पिकांना शेवटी पाणी मिळत नाही. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक सोडावे लागते. कृषी विभागाकडून सूक्ष्म सिंचन अनुदान योजनेची माहिती घेत ऑनलाइन दाखल केलेला अर्ज मंजूर झाला आहे. सूक्ष्म सिंचनामुळे पिकांना पाणी कमी लागेल व पाणी भरण्यासाठी मजुरीचा खर्चही कमी लागणार आहे. ठिबकमधून खते, औषधेही सोडता येणार आहे. यामुळे पिकांना फायदा होऊन उत्पादन वाढणार आहे.'' - अतुल कवडे, युवा शेतकरी, बाणगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.