पुणे - शाळेची वेळ सकाळी नऊपूर्वी असेल आणि त्याबाबत संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी घेतली नसेल तर आता राज्यातील अशा शाळांना प्राथमिक शिक्षण विभागाकडून कारणे दाखवा नोटीस पाठविली जाणार आहे. इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊ किंवा नऊनंतर भरविण्यात यावेत, या सरकारी आदेशाला केराची टोपली दाखविणाऱ्या शाळांना नोटीस मिळणार आहे.
राज्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सर्व व्यवस्थापनांचे, सर्व माध्यमांचे पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊ किंवा त्यानंतर भरविण्यात यावेत, असा आदेश शालेय शिक्षण विभागाने ८ फेब्रुवारी २०२४ रोजी काढला. या आदेशाप्रमाणे अनेक शाळांनी आपल्या वेळापत्रकात आवश्यक ते बदल केले असून शाळांच्या वेळा बदलल्या आहेत.
परंतु, अजूनही बहुतांश शाळांनी विशेषतः खासगी शाळांनी आपल्या शाळेच्या वेळेत कोणतेही बदल केले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अद्यापही पूर्व प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्ग सकाळी सात, साडेसात वाजता भरत आहेत. आता याचीच दखल घेत शिक्षण विभागाने कठोर पावले उचलण्यास सुरवात केली आहे.
राज्यपालांनी केली होती सूचना
राज्यपाल रमेश बैस यांनी ५ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या एका कार्यक्रमात शालेय शिक्षण विभागाला सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याची सूचना केली होती. या सूचनेनुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या ज्या शाळांची पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग भरण्याची वेळ सकाळी नऊ वाजण्याअगोरदची आहे.
त्या शाळांनी शैक्षणिक वर्ष २०२४-२५पासून सकाळी नऊ किंवा नऊनंतर वर्ग भरवावेत, असा आदेश काढत शालेय शिक्षण विभागाने संबंधित शाळांना सूचना दिल्या होत्या. शाळेच्या वेळेत होणाऱ्या बदलांच्या पार्श्वभूमीवर काही शाळांनी पालक आणि स्कूल बस-व्हॅन चालक यांच्याशी चर्चा केली आणि शाळेच्या वेळा ठरविल्या. परंतु, अनेक शाळांनी सकाळी नऊ अगोदरच्या वेळेत बदल केला नसल्याचे दिसून आले आहे. अशा शाळांना आता शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे.
राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व माध्यमांच्या इयत्ता चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊ किंवा त्यानंतर भरविणे आवश्यक आहे. सकाळी नऊ अगोदर शाळा भरवायची असल्यास अशा शाळांनी संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांची रीतसर परवानगी घेणे आवश्यक आहे. परंतु, शिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी न घेता सकाळी नऊपूर्वी शाळा भरविणाऱ्या शाळांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याची सूचना देण्यात आली आहे.
- शरद गोसावी, संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.