Eknath Shinde: शिवसेनेला धक्क्यावर धक्के; दिवसभर काय घडलं वाचा

एकनाथ शिंदे रातोरात आपल्यासोबत असलेल्या सर्व आमदारांना घेऊन सूरतमधून आसाममधल्या गुवाहाटीमध्ये रवाना झाले आहेत.
CM Uddhav Thackeray
CM Uddhav ThackeraySakal
Updated on

शिवसेनाला धक्का : दादर-माहिमचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) आणि कुर्ला मतदारसंघाचे आमदार मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar) हे शिवसेनेच्या गोटातून बाहेर पडले असून गुवाहटीला रवाना झाल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का बसला आहे. 

मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावरून मातोश्रीवर जात असताना शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी केली असून शिवसैनिकांनाही अश्रू अनावर झाले आहेत. दरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या गाड्यावर फुलांची उधळण केली आहे. मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांना अभिवादन करत त्यांची कृतज्ञता व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी आपले वर्षा निवासस्थान सोडल्यावर भाजपचे निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. "दुसऱ्यांची घरं पाडणार्‍या व्यक्तीला आज नियतीने घर सोडायला लावले" असं ट्वीट निलेश राणे यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारी निवासस्थान असलेला वर्षा बंगला सोडला आहे. ते तिथून मातोश्रीकडे रवाना झाले आहेत. यावेळी उपस्थित सर्व ठाकरे कुटुंबियांना डोळ्यातील अश्रू अनावर झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधताना ज्या शिवसेना आमदारांना मी नालायक आमदार  वाटतो त्यांनी समोर येवून सांगाव मी दुसऱ्या क्षणाला राजीनामा देतो, तुम्हाला विश्वास नसेल तर मी वर्षा सोडून मातोश्रीवर माझा मुक्काम हलवणार आहे असं सांगितलं होतं.

इकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारी निवासस्थान वर्षा बंगल्यावरून खासगी निवासस्थान मातोश्रीकडे रवाना होत आहेत. तर रस्त्यावर शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. घोषणाबाजी करत शिवसैनिकांकडून शक्तिप्रदर्शन केलं जात असून शिंदे यांच्याविरोधात कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसत आहे.

गुलाबराव पाटील यांच्यासोबत योगेश कदम, मंजुळा गावित आणि चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर) हे गुवाहटीला दाखल झाले आहेत. तसेच संजय राठोड आज सकाळीच गुवाहटीला पोहोचले होते. तेथील रेडिसन्स ब्ल्यू हॉटेलमध्ये पोहोचल्यावर सर्व आमदार एकनाथ शिंदे यांच्या पाया पडले आहेत.

संजय राऊत : आम्हाला सत्तेचा, मोहमायेचा लोभ नाही, आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत आणि तेच राहणार. ते राजीनामा देणार नसून शरद पवारांनी कोणताही सल्ला उद्धव ठाकरेंना दिला नाही. तसेच शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा कोणताही सल्ला शरद पवार यांनी दिला नाही.

सध्या सत्तानाट्यातील ट्वीस्ट वाढला असून एकनाथ शिंदे यांनी एक नवं ट्वीट केलं आहे. यावेळी त्यांनी शिवसेना महाविकासआघाडीत कशी भरडली गेली आणि शिवसैनिकांचं पद्धतशीर खच्चीकरण कसं केलं गेलं यावर भाष्य केलं आहे. त्यामुळे आता या अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे आवश्यक आहे असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला आणि शिवसैनिक भरडला गेला. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे पद्धतशीर खच्चीकरण होत गेलं. पक्ष आणि शिवसैनिक टिकवण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्र हितासाठी निर्णय घेण्याची गरज असल्याचं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे.

शिवसेनेचा एकही आमदार आमच्या संपर्कात नाही. आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबतही अजुन बोललो नाही, हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही यासाठी जबाबदार नसून आम्ही सरकार स्थापन करण्याची कुठलीही घोषणा केली नाही असं मत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं आहे.

मुंबईतील सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मातोश्री बंगल्यावर येण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. तर मातोश्रीवर आज रात्री आठ वाजता शिवसेनेकडून शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे.

या सर्व घडामोडी नंतर काँग्रेसचे नेते आता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. नाना पटोले हे मुख्यमंत्र्यांना वर्षा बंगल्यावर जाऊन भेटणार आहेत. ठाकरे यांच्या निर्णयाला आमचा पाठिंबा असल्याचं स्पष्टीकरण काँग्रेसचे नाना पटोले यांनी दिलं आहे.

काही वेळापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनता आणि शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यात त्यांनी आपण आजच वर्षा बंगल्यावरून मातोश्री निवास्थानी जाणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता पुढील काही वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा बंगल्यावरून मातोश्रीकडे रवाना होणार असल्याचे सांगितले जात आहे. तत्पूर्वी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर गेले होते. सुमारे एक तास चाललेली ही बैठक संपली आहे.

मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधल्यावर मातोश्रीबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली आहे. तसेच उद्धव ठाकरे हे सध्या वर्षा बंगल्यावरून मातोश्रीकडे रवाना झाले आहेत. दरम्यान मुख्यमंत्री मातोश्रीकडे रवाना झाल्यावर कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी केली जाण्याची शक्यता आहे.

'शिवसेनेचा अडीच वर्षाचा प्रवास: फेसबुक लाईव्ह ते फेसबुक लाईव्ह...' असं ट्वीट अतुल भातखळकर यांनी केलंय.

शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत. मुख्यमंत्र्यांची शरद पवारांसोबत काय चर्चा होणार आणि महाविकास आघाडीकडून काय निर्णय घेण्यात येणार हे बघावं लागणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या संवादानंतर आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक होणार आहे. तर एकनाथ शिंदे हेही सायंकाळी सात वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी भावनिक साद घातल्यावर आता शिंदे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला असून त्यांच्या संवादानंतर शिवसेनेचे संजय राऊत यांनी ट्वीट करत संघर्ष करणार असल्याचं सांगितलंय.

सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोरी केलेल्या आमदारांनी भावनिक साद घातली आहे. शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या नावावर तुम्ही आक्षेप घेवू नका, हिंदुत्व हा शिवसेनेचा श्वास आहे. कालही आजही आणि उद्याही आपण हिंदुच आहोत आणि हिंदुच राहणार आहोत असं ते म्हणाले. शरद पवारांच्या सांगण्यावरून मी मुख्यमंत्रीपद स्विकारलंय, त्यामागो कोणता स्वार्थ नाही असं मुख्यमंत्री म्हणाले.

"तुम्हाला जर मी मुख्यमंत्री पदावर नको असेल तर समोर येवून सांगावं मी या क्षणाला राजीनामा द्यायला तयार आहे. तुम्हाला विश्वास वाटत नसेल तर मी आत्ता माझा मुक्काम वर्षावरून मातोश्रीवर हलवतो. मी जर नालायक असेल तर तुम्ही फक्त मला सांगा. तुम्हाला फोनवर बोलायला किंवा समोर यायला संकोच वाटत असेल तर मला फोनवरून सांगा की, आम्हाला तुम्ही मुख्यमंत्री पदावर नको आहेत, त्यानंतरच्या दुसऱ्या क्षणाला मी राजीनामा देईन." असं त्यांनी संवाद साधताना म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे : एकाही आमदाराने माझ्याविरोधात मत केलं तर ती गोष्ट माझ्यासाठी लाजीरवाणी आहे. त्यांनी फक्त सांगावं मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे. फक्त एकच सांगतो तुमचे प्रेम असेच ठेवा.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे : मी बोलत असताना तुम्ही आमच्या कुटुंबाचे वाटतात असं मला अनेक लोकांनी सांगितलं. लोकांचं हे प्रेम मला महत्त्वाचं आहे. ती माझी कमाई आहे. जोपर्यंत शिवसैनिक माझ्यासोबत आहेत तोवर मी कुठल्याही आव्हानाला समोर जाईन. शिवसैनिकांना शंका वाटत असेल तर मी पक्ष प्रमुख पद सोडायला तयार आहे. मी सर्व शिवसैनिकांचा बांधील आहे. संकाटाला सामोरा जाणारा मी शिवसैनिक आहे. पण शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर माझी तयारी आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे : तुम्हाला जो मुख्यमंत्री हवाय तो मला समोर येऊन सांगा किंवा फोनवरून सांगा, मी या क्षणाला मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे : एकाही आमदाराला वाटलं की मी मुख्यमंत्री पदाचा लायक नाही, त्यांनी फक्त समोर येवून बोलावं, मी माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करून ठेवलं आहे. तसंच मी शिवसेनाप्रमुख पद सोडायला तयार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे : माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री पदी नको असेल तर मी काय करायचं? त्यांनी मला समोर येवून सांगाव. बंडखोरी केलेल्या एकाही आमदारानी सांगितलं की तुम्ही मला मुख्यमंत्री नको तर मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतो, तुम्हाला विश्वास नसेल तर मी आजच माझा मुक्काम वर्षावरून माझ्या मातोश्रीवर हलवतो.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे : माध्यमात अनेक अफवा पसरल्या आहेत. शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित केले जातात पण शिवसेना कधीच हिंदुत्वापासून दूर होऊ शकत नाही म्हणूनच आदित्य, एकनाथ शिंदे अयोध्येला गेले होते. विधानभवनात हिंदुत्वावर बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री आहे. पण ही बाळासाहेबांची शिवसेना नाही अशी बातमी पसरवण्यात आली. २०१४ साली एकट्याच्या ताकदीवर ६३ आमदार शिवसेनेचे निवडून आले ते पण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे : आघाडी स्थापन करताना शरद पवारांनी मला सांगितलं की महत्त्वाची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल, त्यानंतर मी जिद्द केली आणि मुख्यमंत्री झालो. कोणताही अनुभव नसलेला माणूस येथे बसवण सोप नाही. त्यासाठी यांचा मला मोठा पाठिंबा आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे : शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचे मला फोन येत आहेत. त्यांना मी बाहेर काढणार आहे. त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे : शिवसेनेने हिंदुत्व सोडलं नाहीये, तुम्हाला तसं वाटत असेल तर मधल्या काळात जे काही शिवसेनेने तुम्हाला दिलं ते काय होतं?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे : शिवसेनाप्रमुखांनी शब्द दिलाय की हिंदुत्व आमचा श्वास आहे. त्यांचाच विचार मी पुढे नेत आहे. शिवसेनेबद्दल विधानभवनात हिंदुत्वाबद्दल बोलणार मी पहिला मुख्यमंत्री आहे.

भावना गवळी यांचं पत्र: बंडखोर आमदारानंतर आता खासदारांचीही नाराजी आता हळूहळू बाहेर येत असून भावना गवळी यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. ते पत्र आता माध्यमाकडे आलं आहे.

शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे आज सायंकाळी सात वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. ते यावेळी काय बोलणार याकडे लक्ष लागलेलं असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही क्षणात लाईव्ह संवाद साधणार आहेत.

- सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलणार आहेत. आता त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

- आज सायंकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

- राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली असून त्यामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. जवळपास दीड तास ही बैठक चालली आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेले आहे.

सध्या चालू असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ५ वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. राजकीय नाट्याच्या पार्श्वभूमीवर ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. सध्या एकनाथ शिंदे यांनी आमच्याकडे ४२ आमदार असल्याचा दावा केला आहे. यावर मुख्यमंत्री काय निर्णय घेणार किंवा घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

शिवसेनेला मोठा धक्का : शिवेसनेचे दमदार नेते गुलाबराव पाटीलही गुवाहटीला जात असल्याची माहिती आहे. त्यांच्यासोबत चार आमदार असल्याचंही सांगण्यात येत आहे. संजय राठोड, संजय कदम आणि चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर) हे आमदार त्यांच्यासोबत असल्याची माहिती समोर आली आहे. ते गुवाहटीला रवाना झाले असल्याची माहिती समोर येत असून त्यानंतर आता गुलाबराव पाटील चंद्रकांत भुमरे शंभुराज देसाई आणि बच्चू कडू मिळून एकून चार मंत्री बंडात सहभागी झाले आहेत.

  • एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सुरेश प्रभू यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. श्री.सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध असल्याचं सांगितलं आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे विधीमंडळ गटनेते अजित चौधरी यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे.

  • 'सागर'वरच्या हालचाली वाढल्या; नारायण राणे फडणवीसांच्या भेटीला

  • केंद्रीय मंत्री नारायण राणे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला आले आहे. देवेंद्र फडणवीसांच्या सागर या निवासस्थानी भाजपाची नेतेमंडळी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता हालचाली वाढल्या आहे.

  • मला उमेदवारी दिली असती तर हे झालं नसतं - संभाजीराजे

  • राज्यातल्या राजकीय गदारोळावर संभाजीराजे छत्रपती यांनीही भाष्य केलं आहे. पुण्यात पालखी सोहळ्यासाठी आलेले असताना संभाजीराजे बोलत होते. मला उमेदवारी दिली असती तर हे घडलं नसतं, अशी प्रतिक्रिया संभाजीराजेंनी दिली आहे. एकनाथ शिंदेंची खदखद आजची नाही, अनेक वर्षांची आहे, असंही संभाजीराजे म्हणाले आहेत. सरकार कुणाचेही असावे पण ते चांगलं चालावं आमचं एवढंच मत आहे, असंही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.

ट्विटरवरुन पद हटवल्यानंतर आदित्य ठाकरे बैठकीलाही गैरहजर

  • कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक सध्या सुरू आहे. मात्र या बैठकीला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील हेही या बैठकीला गैरहजर आहेत. काही वेळापूर्वीच आदित्य ठाकरेंनी आपल्या ट्विटर प्रोफाईलवरुन आपल्या मंत्रिपदाचा उल्लेख हटवला होता. त्यानंतर आता चर्चांना उधाण आलेलं आहे.

हार्ट अटॅक आलेल्या आमदाराची धक्कादायक खुलासे करत घरवापसी

  • एकनाथ शिंदेंसोबत बंड करुन गेलेले आमदार नितीन देशमुख आता पुन्हा एकदा ठाकरेंच्या गोटात परतले आहेत. मला हार्ट अटॅक केला हे धादांत खोटं, असा दावाही त्यांनी केला आहे. माझ्या दंडावर बळजबरीने इंजेक्शन टोचलं गेलं. मी शिवसैनिक आहे, असं सांगत ते नागपुरात परत आले आहेत.

काँग्रेसचे आमदार फुटले? बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं!

  • बाळासाहेब थोरांतांनी माध्यमांशी बोलताना कॉंग्रेसचे सर्व आमदार मुंबईत दाखल असून ४४ आमदार आमच्यासोबत आहेत. कॉंग्रेसचा कोणताही आमदार फुटलेला नाही. ४१ आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. तर तीन आमदार रस्त्यात आहेत. सगळे ४४ आमदार आमच्यासोबत आहेत.

CM Uddhav Thackeray
काँग्रेसचे आमदार फुटले? बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं!

'तयार राहा...'; भाजपा हायकमांडच्या सगळ्या आमदारांना सूचना

पुढचे ४८ तास संपर्कात राहा. कोणत्याही दौऱ्यावर किंवा परदेशामध्ये जाऊ नका अशा सक्त सूचना भाजपाने सर्व आमदारांना दिल्या आहेत. कोणत्याही क्षणी तुम्हाला मुंबईला पोहोचायला लागू शकतं. त्यामुळे सर्वांनी संपर्कात राहावं अशा सूचना भाजपा हायकमांडने दिल्या आहेत.

एकनाथ शिंदेंच्या (Shivsena leader Eknath Shinde) बंडाची माहिती मिळताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (BJP leader Devendra Fadnavis) तात्काळ दिल्लीकडे रवाना झाले होते. तिथे त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (BJP President JP Nadda) आणि गृहमंत्री अमित शाह (Home minister Amit Shah) यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आता या विशेष सूचना देण्याची माहिती हाती येत आहे. भाजपाच्या पक्षश्रेष्ठींकडून ही माहिती देण्यात आली आहे.

CM Uddhav Thackeray
'तयार राहा...'; भाजपा हायकमांडच्या सगळ्या आमदारांना सूचना

महाराष्ट्राची वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडे चाललेली आहे. अवघ्या अडीच वर्षांतच महाविकास आघाडीचा डाव फसला आहे. शिवसेनेने अडीच वर्षांसाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहावेत अशी मागणी केली होती. त्याप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावर राहिलेले आहेत.

सरकार बरखास्त होणार; संजय राऊतांचे स्पष्ट संकेत

सध्या राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्त होण्याच्या दिशेने असल्याचं ट्वीट राऊत यांनी केलं आहे. यानंतर राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचं स्पष्ट झालंय. महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने, असं संजय राऊत या ट्वीटमध्ये म्हटलेलं आहे.

CM Uddhav Thackeray
मविआ सरकार बरखास्त होणार, संजय राऊतांचे स्पष्ट संकेत

राज्य गुप्तचर विभागाने महाराष्ट्रातल्या राजकीय संकटाची कल्पना दोन महिन्यांपूर्वीच सरकारला दिली होती. पण त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, असा दावा महाराष्ट्र पोलिसांच्या सूत्रांनी केला आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्यासह आठ ते दहा आमदार विरोधी पक्षाच्या संपर्कात होते, अशी माहिती एसआयडीच्या अधिकाऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वीच दिली होती.

'जास्तीत जास्त काय होईल? सत्ता जाईल...'

बघू कोणाकडे किती आमदार आहेत, तुम्ही उगाच उतावळे होऊ नका, असा इशारा राऊत यांनी दिला. सध्या आमच्याकडे संख्याबळ आहे. हा आमच्या घरातला विषय आहे. एकनाथ शिंदे आणि अन्य सहकाऱ्यांसोबत माझं बोलणं चालू आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर कोणी नाराज आहे असं मला वाटत नाही. एकनाथ शिंदेंबरोबर माझं सकाळीच बोलणं झालंय. आमचा एक तास फोन कॉल झाला. काही समज गैरसमज असतात. पण कोणतंही चिंतेचं कारण नाही, असं राऊत यांनी म्हटलंय.

CM Uddhav Thackeray
मविआ सरकार बरखास्त होणार, संजय राऊतांचे स्पष्ट संकेत

आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर प्रोफाईलमधून पर्यावरण मंत्री हा उल्लेख हटवला आहे. त्यामुळे याबद्दलच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Aditya Thackeray Tweet Profile
Aditya Thackeray Tweet ProfileSakal

राऊतांच्या घराबाहेर जोरदार पोस्टरबाजी

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घराबाहेर सेनेने जोरदार पोस्टरबाजी केली आहे. 'तेरा घमंड तो चार दिन का है पगले, हमारी बादशाही तो खानदानी है', असं वाक्य या पोस्टरवर लिहिलेलं आहे. शिवसेनेच्या नेत्या दिपमाला बढे यांनी ही पोस्टर्स लावलेली आहेत.

कोश्यारी कोरोनाबाधित; गोव्याच्या राज्यपालांकडे कार्यभार?

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. उपचारासाठी राज्यपाल कोश्यारी यांना रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन-तीन दिवसांपासून त्यांना ताप, खोकला असा त्रास होत होता. काल त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे आता गोव्याच्या राज्यपालांकडे महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार देण्यात येणार असल्याची माहिती हाती येत आहे. गोवा राज्यपाल श्रीधरन हे कार्यभार हाती घेणार असल्याची शक्यता आहे.

CM Uddhav Thackeray
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण

राऊत आमचे नेते पण मी कोणत्याही आमदाराचं अपहरण केलेलं नाही

एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधत संजय राऊतांच्या विधानावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की संजय राऊत आमचे नेते आहेत. पण मी कोणाचंही अपहरण केलेलं नाही. सगळे आमदार स्वखुशीने माझ्यासोबत आलेले आहे. माझ्यासोबत ४५ आमदारांचं संख्याबळ आहे. आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्याचं काम करतोय.

काँग्रेसचे आमदारही सोबत येणार

गुवाहाटीमध्ये असलेले बच्चू कडू यांनीही माध्यमांशी संवाद साधलेला आहे. त्यांनी सांगितलं की,आता आमच्यासोबत शिवसेनेचे ३३ आमदार आहेत आणि काही अपक्ष आहेत. आज आणखी काही आमदार दाखल होणार आहे. त्यामुळे शिवसेनेचा आकडा ३८ -३९ पर्यंत जाईल. एकूण आमदारांची संख्या ५० पर्यंत नक्कीच जाईल. काँग्रेसचेही काही आमदार सोबत येणार. दोन तीन दिवसांत चित्र स्पष्ट होईल.

बच्चू कडूंनी सांगितलं नाराजीचं कारण

बच्चू कडू म्हणाले की, आम्ही शिवसेनेला समर्पित होतो. शिवसेनेचे ७५ टक्के आमदार इथं आल्याने आम्हीही इथं आलो. कोणतीही व्यक्तिगत नाराजी नाही. निधीतली विषमता आहे, शिवसेनेने त्याकडे लक्ष दिलेलं नाही. मी मुख्यमंत्र्यांना फोन केला होता. त्यांना सांगितलं की दोन्ही निवडणुकांमध्ये आम्ही सेनेलाच मत दिलंय, मग हे अचानक वातावरण तयार झालं आणि परिस्थिती बदलली.

बंडखोर आमदारांची काही वेळात बैठक

एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे बंडखोर आमदार पहाटेच आसाममधल्या गुवाहाटी इथल्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. शिंदे गटाची सकाळी ९.३० वाजता बैठकही होणार आहे. भाजपाचे काही स्थानिक नेते, आसामचे पाणीपुरवठा मंत्री देखील या हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत. या हॉटेलच्या परिसराला पोलीस छावणीचं स्वरुप प्राप्त झालं आहे. पोलिसांनी सर्व प्रकारची मदत या आमदारांना मिळत आहे. पोलीस आयुक्तांनी स्वतः या आमदारांच्या बसला हॉटेलपर्यंत पोहोचवलं आहे.

४० आमदार सोबत, आणखी १० येणार; शिंदेंचा दावा

गुवाहाटीमध्ये आपल्या समर्थक आमदारांसोबत पोहोचल्यानंतर एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला. शिवसेनेचे ४० आमदार माझ्यासोबत आहेत, आणखी १० आमदार येणार आहेत, असा दावा शिंदेंनी केला आहे. आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला पुढे घेऊन जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

ठाण्याच्या महापौर बंगल्यावर शिजली बंडाळी

विधान परिषद निवडणुकीनंतर मंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांसोबत सुरत गाठले. मात्र सुरतला जाण्याआधी या बंडाळीची ‘खिचडी’ ठाण्याच्या महापौर बंगल्यावर शिजल्याचे समोर आले आहे. विधान परिषदेच्या निकालानंतर उपवन येथे असलेल्या महापौर बंगल्यावर सर्व आमदारांची बैठक आणि जेवणाचा कार्यक्रम झाला. यावेळीच या घटनाक्रमाला सुरुवात झाल्याची चर्चा आहे.

विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले. त्या आधी काय घडले, आमदारांना त्यांनी कुठे विश्वासात घेतले याविषयीच्या चर्चांना उधाण आले आहे. याचवेळी अशी माहिती समोर आली आहे की, सुरतला जाण्याआधी एकनाथ शिंदे रात्री नऊच्या सुमारास उपवनच्या महापौर बंगल्यावर काही तासांसाठी होते. हे ठिकाण त्यांच्या आवडीचे असून अनेक निर्णय ते या निसर्गरम्य परिसरातील बंगल्यावर घेतात. येथेच त्यांनी त्यांच्या विश्वासातील आमदारांशी चर्चा केली. पुढील राजकीय वाटचालीविषयी खलबते केल्यानंतर ते सुरतला रवाना झाले.

शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचं बंड आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. शिवसेनेचे ३५ नव्हे तर ४० आमदार आपल्यासोबत असल्याची प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. या आमदारांना काल रात्री उशिरा आसाममधल्या गुवाहाटी इथं नेण्यात आलं आहे. शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र शिंदे भूमिकेवर ठाम आहेत. शिवसेनेने भाजपासोबत सरकार बनवावं, मंत्रिपद दिलं नाही तरी चालेल अशी भूमिका शिंदेंनी घेतली आहे. आज दुपारी शिंदे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटणार असून आपला गट हीच खरी शिवसेना असा दावा त्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.