मुंबई - विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच मुंबई सोडण्याचा ‘कट’ एकनाथ शिंदे समर्थक आमदारांनी ‘द वेस्ट-इन’मध्ये रचला होता. या सगळ्या आमदारांनी मतदानाला येण्याआधीच आपल्या बॅगा बाहेर काढून, मतदानानंतर पाच-पाच आमदारांच्या गटाने एकाच गाडीतून विधानभवन सोडले. गंभीर म्हणजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधानभवनातून निघण्याआधीच दोन वाजून पाच मिनिटांनी शिंदे समर्थक आमदारांनी विधानभवन सोडले. त्याआधीच पाच मिनिटे म्हणजे, दुपारी दोन वाजता शिंदे हे निघून गेले होते. ‘नाराज आहात का?’ या पत्रकारांच्या या प्रश्नावर ‘नाराजीवर नंतर बोलतो’, असे मोजके उत्तर देऊन शिंदे आपल्या गाडीत बसले. त्यानंतर शिंदे आणि काही आमदार ठाण्यातून सुरतकडे वळले.
फोडाफोडी टाळण्याच्या उद्देशाने विधान परिषद निवडणुकीआधी शिवसेनेने आपल्या आमदारांना पवईतील ‘वेस्ट इन’मध्ये ठेवले. मात्र, त्याआधी ‘वर्षा’वर आलेल्या आमदारांना शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भेटले नसल्याने शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर त्यात भर पडत गेली, ती आमदारांवर अविश्वास दाखविला जात असल्याची. त्यातून शिंदे समर्थक आमदारांनी तक्रारीचा पाढा वाचायला सुरूवात केली. त्याच हॉटेलमध्ये शिंदे समर्थक आमदारांच्या गुप्त बैठकाही झाल्या आणि निकालानंतर नेतृत्वाला ‘धडा’ शिकविण्याचा पवित्रा घेतला. ही बाब शिंदेंच्याही कानावर घातली गेली. या घडोमोडीनंतर विधान भवनात सोमवारी मतदानासाठी आलेले आमदारांनी मुंबईबाहेर जाऊन ‘नॉट रिचेबल’ किंवा फोन न घेण्याची भूमिका घेतली होती.
विधान परिषद निवडणुकीत थेट शिवसेना, त्यांना पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार आणि काँग्रेसचीही मते फोडण्यात भाजपला यश आले. निकालानंतर थेट ठाकरे सरकार पडण्याच्या चर्चाना वेग आला. तेवढ्याच विधान परिषदेच्या निकालाची वाट न पाहताच शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी नेतृत्वाला चकवा देत, गुजरात गाठले. या निवडणुकीतील पराभवानंतर जागे झालेल्या ठाकरेंनी आपल्या आमदारांची मंगळवारी बैठक बोलावली असताना, शिंदे नॉट रिचेबल झाल्याने शिवसेनेत मोठा राजकीय भूकंप होण्याचा अंदाज आहे.
बंडाची बीजे डिसेंबरात
मुंबई - एकनाथ शिंदे सर्वाधिक आमदार आणि सर्वाधिक नगरपालिका असलेल्या ठाणे जिल्ह्याच्या राजकारणावर एकहाती पकड राखून आहेतच शिवाय संपूर्ण राज्यात त्यांच्यावर निष्ठा असलेल्या आमदारांची संख्याही लक्षणीय आहे. अशी ताकद असलेला नेता विस्तारवादी भाजपच्या नजरेत भरला नसता तरच नवल. गेल्या डिसेंबर महिन्यात गोव्यात त्यांची कुणा बड्या भाजप नेत्याशी भेट झाली? यावरून चर्चेला उधाण आले आहे. आज गुजरातेत पोहोचून बंडाचा झेंडा उभारणाऱ्या शिंदेंच्या हिंदुत्ववादी भूमिकेत गोवा या भाजपशासित राज्यालाही तेवढेच महत्त्व आहे असे म्हणतात.
ठाकरे परिवार शिंदेंना देवतेसमान पण त्या पलिकडे जनाधार नसलेल्या नेत्यांचे शिवसेनेत महत्त्व वाढू लागल्याने ते संतप्त झाले होते. राज्यसभेच्या निवडणुकीत शिंदेंना विश्वासात न घेता उमेदवार दाखल केला गेला अन् विधानपरिषदेच्या १० दिवसानंतरच्या निवडणूक नियोजनात तर एकदा त्यांना विशेष कक्षातून बाहेर जा, असे सांगण्यात आले. हे योग्य नसल्याची भावना त्यांच्या समर्थक आमदारात रुजली अन् मग बंडाचे झेंडे उभे झाले. ठाण्यावर एकछत्री अंमल गाजविणाऱ्या आनंद दिघेंवर ‘धर्मवीर’ चित्रपट काढला तेव्हा ठाकरे कुटुंबीय उपस्थित होते. शिंदेंच्याच जीवनावर कर्मवीर चित्रपट काढला जाईल असे बोलले जात होते. शिंदेंच्या जवळच्या काही व्यावसायिकांवर यंत्रणांचे विशेष लक्ष आहे असेही बोलले जात होते पण पडद्यामागे भलतेच घडत होते. एका माहितगाराच्या मते उद्धव ठाकरे यांनी भाजपला जय महाराष्ट्र करीत ‘मविआ’ सरकार स्थापन केले तेव्हाच भाजपने शिंदे यांना हेरले होते.
भाजपला होती कुणकुण
मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानाआधीच शिवसेनेत बंड होऊन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे काही आमदार फुटणार असल्याचे भाजपमधील एका बड्या नेत्यांना सोमवारीच ठाऊक होते. या बड्या नेत्यांशी हातमिळवणी करूनच शिंदे यांनी थेट गुजरात गाठल्याचेही स्पष्ट आहे. दुसरीकडे, गुजरातमध्येच शिंदेसह त्यांच्या आमदारांची बडदास्त ठेवून त्यांना सुरक्षित ठेवण्याचीही जबाबदारी या बड्या नेत्यांनी उचल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिंदेंच्या नाराजीचा फायदा उठवून ठाकरे सरकारला चक्रावण्याचा डाव भाजपने टाकल्याचे दिसत आहे.
शिवसेनेत विशेषत: स्वपक्षीय आमदारांत बळ वाढवून आलेले शिंदे हे नेहमीच भाजपसाठी आशेचा किरण ठरले आहेत. ठाकरेंपासून शिवसेनेच्या बहुतांशी मंत्री, नेते आणि आमदारांभोवती चौकशांचे फास आवळणाऱ्या केंद्रीय यंत्रणांनी शिंदेंकडे कधीच वाकड्या नजरेने पाहिले नाहीत. भाजप आणि शिंदे यांच्यातील ‘छुपी’ जवळीक पाहता, शिंदे हे त्यांच्या २५ आमदारांसह भाजपच्या साथीला जाणार असल्याचे चर्चा मध्यंतरी रंगली होती. तसे जाहीर निमंत्रण भाजपच्या एका नेत्यानेही दिले होते. राज्यसभा निवडणुकीत फोडाफोडी झाल्यानंतर शिंदे समर्थकांवर संशय व्यक्त गेला होता. मात्र, त्यात तथ्य नसल्याचे दिसून आले. त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीत मात्र, ठाकरे आणि शिंदे यांच्यातील मतभेदाच्या घटना पुढे आल्या.
नव्या समीकरणाची चिन्हे
एकनाथ शिंदे यांनी आपला मुक्काम सुरतमध्ये हलविल्यानंतर शिंदे आणि त्यांच्या आमदारांची आपल्या ‘होम पीच’ वर शाही व्यवस्था ठेवण्यात भाजपनेही आपली यंत्रणा कामाला लावल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदेंच्या पवित्र्यानंतर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असून, बैठकांपाठोपाठ बैठक सुरू झाल्या आहेत. शिवसेनेतील नाराजीनाट्यावरून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसही हवालदिल झाल्याचे दिसत आहे. दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी आपापल्या नेत्यांना तातडीने बोलावून चर्चा सुरू केल्या आहेत. परिणामी, राज्यसभा, विधान परिषदेच्या धक्कादायक निकालानंतर तितक्याच धक्कादायक नवे राजकीय समीकरण आकाराला येण्याची चिन्हे तुर्त तरी दिसत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.