सोलापूर : दहावी निकालानंतर आता अकरावी प्रवेशाची लगबग सुरु असून प्रवेशाची पहिली यादी २५ जूनला प्रसिद्ध केली जाणार आहे.
जिल्ह्यातील उच्च माध्यमिक महाविद्यालयांनी गुणवत्तेनुसारच विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावेत, असे सक्त आदेश माध्यमिकचे प्रभारी शिक्षणाधिकारी जावेद शेख यांनी दिले आहेत. १३ जुलैपर्यंत प्रवेश प्रक्रिया संपवून १७ जुलैपासून कॉलेज सुरु करण्याचेही निर्देश त्यांनी दिले आहेत.
जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९६.०६ टक्के लागला असून त्यात ३२ हजार २०९ मुले आणि २८ हजार ११९ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. या परीक्षेत ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेतलेल्यांची संख्या जवळपास ४० हजारांपर्यंत आहे.
३५ ते ६० टक्के गुण मिळालेले विद्यार्थी कमी असून कला व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांचा त्या विद्यार्थ्यांवरच वॉच आहे. पण, बरेच विद्यार्थी डिप्लोमा व आयटीआयला देखील प्रवेश घेतात. त्यामुळे कला शाखेच्या शिक्षकांची चिंता वाढली आहे.
कला शाखेतून बारावी, बीए, एमए केल्यावर पुढे नोकरीचे काय, या प्रश्नाचे ठामपणे उत्तर कोणीच देऊ शकत नाही. डीएड, बीएडची क्रेझ आता कमी झाली असून अनेक महाविद्यालये विद्यार्थ्यांअभावी बंद पडली असून काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
स्पर्धा परीक्षेची तयारी एवढेच उत्तर काहीजण देतात. विज्ञान व वाणिज्य शाखेतून शिक्षण घेतल्यावर खासगी कंपन्या, बॅंकांमध्ये जॉब लागण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांचा कल या दोन शाखांकडे व अभियांत्रिकी डिप्लोमाकडेच सर्वाधिक आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांचा कल नेमका कोणत्या शाखेकडे आहे, हे २५ जूनला समजणार आहे.
शाखानिहाय प्रवेश क्षमता
विज्ञान
३२,०००
वाणिज्य
२३,५००
कला
१७,०००
व्यावसायिक अभ्यासक्रम
२,०००
१३ जुलैपर्यंत प्रवेश प्रक्रिया संपणार
अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी २५ जूनला प्रसिद्ध होईल. त्यानंतर रिक्त जागांसाठी १३ जुलैपर्यंत गरजेनुसार गुणवत्ता याद्या लागतील. १७ जुलैपासून अकरावीची महाविद्यालये सुरु होतील.
- जावेद शेख, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर
जादा शुल्क घेणाऱ्यांवर शिक्षणाधिकाऱ्यांचा हवा ‘वॉच’
जिल्ह्यात विज्ञान शाखेच्या ३२ हजार तर वाणिज्य शाखेच्या २३ हजारांहून अधिक जागा आहेत. दरवर्षी दोन्ही शाखेच्या जागा हाऊसफुल होतात. आता अनेक विद्यार्थ्यांनी एकापेक्षा अधिक कॉलेजमध्ये प्रवेशासाठी अर्ज केले आहेत.
त्याला पाहिजे त्या महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्याने तो दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेशासाठी धडपडत आहे. पण, त्याठिकाणी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होण्यापूर्वीच प्रवेश हाऊसफुल झाल्याचे सांगितले जात आहे.
त्यातून विनाअनुदानित तुकडीत प्रवेश मिळू शकतो, पण त्यासाठी शुल्क द्यावे लागेल म्हणून १० ते २० हजार रुपये घेतले जात असल्याचेही बोलले जात आहे. त्याकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सर्वसामान्य हुशार, होतकरू विद्यार्थ्यांना न्याय द्यावा,अशी पालकांची अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.