Solapur: माजी आमदार दिलीप मानेंची मध्यस्थी अन्‌ सोलापूरच्या समांतर जलवाहिनीचा अडसर दूर; नोव्हेंबरअखेर पूर्ण होणार पाइपलाइन

सोलापूर शहराला १८ ते २० वर्षांपासून दोन-तीन तर कधी चार-पाच दिवसांआड असाच पाणीपुरवठा होतोय. नागरिकांना एक दिवसाआड किंवा नियमित पाणी अद्याप मिळालेले नाही. समांतर जलवाहिनी झाल्यावर पाणीपुरवठा आठवड्यातून दोन-तीन दिवसांआड मिळणार आहे.
solapur
solapursakal
Updated on

सोलापूर : सोलापूरचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटावा म्हणून सोलापूर ते उजनी अशी ११० किलोमीटर समांतर जलवाहिनी टाकली जात आहे. १०३ किलोमीटरपर्यंत काम पूर्ण झाले आहे, पण चार ठिकाणी काम थांबले होते. त्यातील धरणाजवळील ८०० मीटरचे काम सुरू झाले; पण हिवरे, चिखली व पाकणी येथे वनविभागाच्या जागेतून पाइपलाइन जाणार असल्याने त्या तिन्ही ग्रामपंचायतींचे ठराव आवश्यक होते. त्या ग्रामपंचायतींनी गुरुवारी महापालिकेला ‘ना-हरकत’ दिल्याने जलवाहिनीच्या कामातील मोठा अडसर दूर झाला आहे.

सोलापूर शहराला १८ ते २० वर्षांपासून दोन-तीन तर कधी चार-पाच दिवसांआड असाच पाणीपुरवठा होतोय. नागरिकांना एक दिवसाआड किंवा नियमित पाणी अद्याप मिळालेले नाही. समांतर जलवाहिनी झाल्यावर पाणीपुरवठा आठवड्यातून दोन-तीन दिवसांआड मिळणार आहे. तत्पूर्वी, समांतर जलवाहिनीला वनविभागाच्या जागेचा अडथळा निर्माण झाला असून, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने (एनएचएआय) हिवरे, चिखली व पाकणी येथील वनविभागाच्या काही जागेतून महामार्ग नेला असून, त्याचा वाद सध्या सुरू आहे. त्यामुळे सध्या त्या ठिकाणी जलवाहिनीचे काम थांबले आहे. हा वाद मिटेल तेव्हा मिटेल, तोपर्यंत नोव्हेंबरअखेर कामाची मुदत असल्याने मुदतीत काम पूर्ण करण्यासाठी महापालिका आयुक्त शीतल तेली- उगले यांनी पर्यायी मार्ग शोधला. त्यासाठी त्या तिन्ही ग्रामपंचायतींचे ठराव जरुरी होते. आचारसंहिता लागल्यावर ग्रामसभा घेता येत नसल्याने ठराव मिळणे जरुरीचे होते आणि ते मिळाल्याने मुदतीत काम पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

टेंभुर्णी बायपासजवळील मोजणी पूर्ण

टेंभुर्णी बायपासजवळ १८०० मीटर अंतरावर समांतर जलवाहिनीचे काम सध्या थांबले आहे. तेथील १३ शेतकऱ्यांच्या शेतातून जलवाहिनी जाणार आहे. त्यांच्या जागेची मोजणी भूसंपादन अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पार पडली असून, आता बाधित शेतकऱ्यांना रेडिरेकनर दरानुसार मोबदला दिला जाणार आहे. दुसरीकडे, उजनी ते आढेगाव या दरम्यानचे ८०० मीटर काम मंगळवारी (ता. ८) पोलिस बंदोबस्तात सुरू झाले असून आठ दिवसांत ते पूर्ण होईल.

आयुक्तांच्या नेतृत्वात मुदतीत होईल जलवाहिनीचे काम

चिखली, पाकणी व हिवरे या तिन्ही ग्रामपंचायतींनी ठराव दिले आहेत. टेंभुर्णी बायपासजवळील मोजणी पूर्ण झाली असून बाधितांना मोबदला देऊन जलवाहिनीचे काम सुरू होईल. धरणाजवळील ८०० मीटरचे काम सुरू केले असून ते आठ दिवसांत पूर्ण होईल. आयुक्त शीतल तेली- उगले यांच्या नेतृत्वात मुदतीत काम पूर्ण होईल.

- व्यंकटेश चौबे, सार्वजनिक आरोग्य अभियंता, सोलापूर महापालिका

दिलीप मानेंची मध्यस्थी अन्‌ पाकणीकडून मिळाला ठराव

टाकळी (ता. दक्षिण सोलापूर) ग्रामपंचायतीने लावलेल्या दरानुसार महापालिकेने पाकणी ग्रामपंचायतीला ४९ लाखांची थकबाकी द्यावी, अशी मागणी सरपंच बालाजी यलगुंडे यांनी केली होती. पण, शहराचा पाणीप्रश्न सुटण्यासाठी आचारसंहितेपूर्वी ग्रामपंचायतीचा ठराव आवश्यक असल्याने माजी आमदार दिलीप माने यांनी त्यासाठी मध्यस्थी केली. अखेर ग्रामपंचायतीने ठराव दिला असून, महापालिकेनेही ग्रामपंचायतीला टाकळीप्रमाणे १९९८ पासूनची थकबाकी देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुनावणी घेऊन निर्णय देतील आणि त्यानुसार महापालिकेकडून ग्रामपंचायतीला थकबाकी दिली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.