मोबाईलचा अतिवापर घातक! ‘ही’ पंचसूत्री पाळा, मुले पुन्हा हाती घेणार नाहीत मोबाईल

कोरोनामुळे दोन वर्षे शाळा बंदच राहिल्याने ७० टक्के मुलांना मोबाईलची सवय जडली आहे. कोरोना काळात शिक्षण तथा ऑनलाइन अभ्यासासाठी मुलांच्या हाती मोबाईल आले, पण आता ती मुलांची सवयच बनली आहे. त्यामुळे अनेक मुलांना मणका, डोळे, कान व मेंदूच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
mobile
mobile sakal
Updated on

सोलापूर : कोरोनामुळे दोन वर्षे शाळा बंदच राहिल्याने ७० टक्के मुलांना मोबाईलची सवय जडली आहे. कोरोना काळात शिक्षण तथा ऑनलाइन अभ्यासासाठी मुलांच्या हाती मोबाईल आले, पण आता ती मुलांची सवयच बनली आहे. त्यामुळे अनेक मुलांना मणका, डोळे, कान व मेंदूच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मुलांमधील चिडचिडेपणा वाढला असून, अनेकजण मोबाईलशिवाय अभ्यास किंवा जेवण करत नाहीत, अशी स्थिती आहे. त्यामुळे प्रत्येक पालकाने पंचसूत्रीचे पालन तंतोतंत केल्यास निश्चितपणे मुलांकडून होणारा मोबाईलचा अतिवापर कमी होईल, असा विश्वास बालरोगतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

सावधान, ‘हे’ होऊ शकतात गंभीर परिणाम

  • मोबाईलच्या अतिवापरामुळे डोक्याला जास्त ताण द्यावा लागत नाही; त्यामुळे वैचारिक क्षमता कमी होऊ शकते.

  • मोबाईलवरील कोणतीही चित्रे, मेसेज, व्हिडिओ पाहून मुले भावनाशून्य, संवेदनशील होऊ लागली आहेत.

  • सतत मोबाईल वापरल्याने मणका, कान, डोळे व मेंदूच्या समस्या वाढून मुले होऊ शकतात नैराश्यग्रस्त.

  • मोबाईलच्या स्क्रीनवर सतत राहिल्याने डोळे (कॉर्निया) कोरडे पडून ते जळजळ करतात आणि चष्मा लागू शकतो.

  • बोटांचा वापर कमी होत असल्याने लिखाणाची सवय कमी होऊन गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो.

१) मुलांच्या आवडीचे वेगवेगळे पदार्थ बनवा

मुलांनी जेवण परिपूर्ण करावे, ताटात काही शिल्लक ठेवू नये, कमी जेवण करू नये, यासाठी त्याच्या आवडीचे पदार्थ आई-वडिलांनी बनवायला हवेत. जेवण बनविण्यापूर्वी मुलांना विचारा काय खायचं आहे. त्यांच्या आवडीला प्राधान्य द्यावे, जेणेकरून मोबाईलचा विसर पडेल आणि मुलांची शारीरिक तंदुरुस्ती राहील.

----------------------------------

२) भाज्या अन्‌ चपात्यामध्ये वेगळेपणा हवा

मुलांना नेहमीच काहीतरी वेगळे पाहायला, खायला, खेळायला आवडते. त्यामुळे रोज एकाच प्रकारच्या चपात्या, भाज्या पाहून, खाऊन मुले कंटाळतात. त्यामुळे लहान मुलं अन्न खायला नकार देतात किंवा कमी खातात. त्यावेळी दररोज वेगवेगळ्या भाज्या, चपात्या खायला द्या. सकाळी नाश्त्यासाठी पराठे, उपीट, शिरा, पोहे, उसळ असे पदार्थ तयार करा. शिवाय भाज्यांची चव बदलावी यासाठी मुलांच्या आवडीचे मसाले वापरा.

-------------------------------------------

३) जेवणात असावेत नवीन पदार्थ

मुलगा हातात मोबाईल दिल्याशिवाय जेवत नाही, अशावेळी पालकांनी मुलाच्या जेवणाकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे. काहीवेळा पालक जबरदस्तीने जेवायला देतात. अशावेळी मुलांना खेळून आल्यावर जेवायला द्या. त्यावेळी त्याला भूक लागलेली असते आणि पोटभरून जेवतात. जबदरस्तीने जेवण्याचा हट्ट धरू नका. दररोज वेगवेगळे पदार्थ तयार केल्यास मुलांना खाण्याची आवड निर्माण होते. मोबाईलकडे त्यावेळी त्याचे दुर्लक्ष होते. लहान मुलांना प्रत्येक गोष्टीबद्दल उत्सुकता असते. त्यामुळे ते नवीन पदार्थ शक्यतो खायला नकार देत नाहीत.

---------------------------------------------

४) सर्वांनी एकदातरी मिळून जेवायला हवेच

अनेकदा घरातील आई-वडील, मोठा भाऊ-बहीण मोबाईलमध्ये व्यस्त असतात; मग मुलांनाही त्याचे आकर्षण निर्माण होते आणि चिमुकल्यांनाही मोबाईलची सवय लागू शकते. त्यामुळे प्रत्येक कुटुंबीयाने दररोज किमान एकदातरी मुलांसह सर्वांनाच सोबत घेऊन एकत्रितपणे जेवण करायला हवे. दररोज किमान एक-दोन तास मोबाईलशिवाय गप्पा माराव्यात. त्यावेळी पालकांनी अजिबात मोबाईल हातात घेऊ नये.

-------------------------------------------------

५) मुलांना वेळ द्या, त्यांच्यासोबत खेळा

मुलांसमोर पालकांनी मोबाईलचा अतिवापर करू नये. मुले जेवत नाहीत किंवा अभ्यास करत नाहीत म्हणून कधीच त्यांना मोबाईल देऊ नका. मुलांना मैदानी खेळासाठी प्रोत्साहित करा, अभ्यासाचा जास्त ताण देऊ नका, मातीत किल्ले बनवायला शिकवा, रडतोय म्हणून मोबाईल देऊन शांत करू नका. परिसरातील (गल्लीतील) मुलांना एकत्रित करून त्यांच्यासोबत जुने मैदानी खेळ खेळू द्या. घरी आल्यावर दररोज त्यांना वेळ द्या, त्यांच्यासोबत खेळा. मोबाईलची त्याची सवय निश्चितपणे सुटेल.

शुभं करोति कल्याणम...

घरातल्या लहान बालकांनी किंवा मोठ्यांनी दररोज सायंकाळी देवाजवळ दिवा लावावा. त्यानंतर हात जोडून शुद्ध अंतःकरणाने ‘शुभं करोति कल्याणम्‌ आरोग्यं धनसंपदा । शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते ॥ दिव्या दिव्या दिपत्कार कानी कुंडले मोतीहार । दिव्याला पाहून नमस्कार ॥’ ही प्रार्थना म्हणावी; जेणेकरून घरातील वातावरण आनंदी राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.