सोलापूर : मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. ८) होम मैदानावर वचनपूर्ती सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी ४५० बसगाड्यांची सोय करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी हा कार्यक्रम होणार असल्याने ४० हजार लाभार्थी आणण्याचे नियोजन आहे. त्यासाठी प्रत्येक तहसीलदारास ५ ते अडीच हजार लाभार्थींचे टार्गेट देण्यात आले असून त्यासाठी त्यांची दमछाक होत असल्याची स्थिती आहे. काहींनी वरिष्ठांकडे टार्गेट कमी करून देण्याची विनंती देखील केल्याचे सांगण्यात येत आहे.
मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अनगर, मंद्रूप येथील तहसीलदारांना प्रत्येकी पाच हजार लाभार्थींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. याशिवाय माळशिरस, करमाळा, बार्शी, सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा, माढा येथील तहसीलदारांना प्रत्येकी अडीच हजार लाभार्थींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सकाळी साधारणत: दहा ते साडेदहाच्या सुमारास त्या महिलांना एसटी बसमधून गावातून सोलापूरकडे आणले जाणार आहे.
कार्यक्रम संपायला अंदाजे साडेतीन-चार वाजणार आहेत. त्यामुळे त्या महिलांची सोय करण्यात येणार असून एसटी बसमध्येच त्यांना उपवासाचे फूड पॅकेट दिले जाणार आहे. पाण्याची सोय देखील बसमध्ये असणार आहे. बसमध्ये अंगणवाडी सेविका, आशासेविका, तलाठी देखील असतील. एका बसमध्ये ५० महिला लाभार्थी असणार आहेत. आता प्रत्यक्षात कार्यक्रमासाठी किती महिला येतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अंगणवाडी सेविका, आशासेविका लाभार्थींच्या घरोघरी
वचनपूर्ती सोहळ्यासाठी महिला लाभार्थी आणायची प्रमुख जबाबदारी तहसीलदारांवर असून त्यांनी अंगणवाडी सेविका, आशासेविका व तलाठी, ग्रामसेवकांसह अन्य कर्मचाऱ्यांना लावले आहे. त्यासाठी सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह राजकीय पदाधिकाऱ्यांचीही मदत घेतली जात आहे. अधिकाऱ्यांनी कार्यक्रमाला येणाऱ्या गावनिहाय लाभार्थींसह बसगाड्या कोणत्या गावात याव्यात, त्याची यादी वरिष्ठांना दिली आहे. पण, ऐन नवरात्रोत्सवात सोहळा होणार असल्याने गर्दी होईल की नाही, याची प्रशासनाला चिंता आहे. गाव, तालुकास्तरावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तेवढे मजबूत नेटवर्क नसल्याचे चित्र असून प्रशासकीय कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी व भाजपचे पदाधिकारीही लाभार्थी शोधण्यापासून दूर आहेत. या पार्श्वभूमीवर गावागावातील लाभार्थी महिलांच्या घरी अंगणवाडी सेविका व आशासेविकांना जाऊन त्यांना कार्यक्रमाला येण्याची विनंती करीत आहेत.
१२ राजकीय पक्षांचे ‘हे’ पदाधिकारी स्टेजवर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत सोलापुरात होणाऱ्या वचनपूर्ती सोहळ्यासाठी राजकीय पक्षांच्या ५० पदाधिकाऱ्यांची बैठक व्यवस्था स्टेजवर केली जाणार आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाने १२ पक्षांच्या जिल्हाध्यक्षांना पत्र पाठवून पदाधिकाऱ्यांची नावे मागविली आहेत. त्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, माकप, आम आदमी पार्टी, शिवसेना, मनसे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, वंचित बहुजन आघाडी, बसपा, रिपाइं यांचा समावेश आहे. पण, यापैकी कोणकोणत्या पक्षातील पदाधिकारी स्टेजवर दिसतील, याची उत्सुकता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.