सोलापूर : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे ‘निपुण भारत अभियान’अंतर्गत दुसरी ते पाचवीतील विद्यार्थ्यांचा २२ डिसेंबर २०२२ ते ७ जानेवारी २०२३ या कालावधीत सर्व्हे केला जाणार आहे. राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील शिक्षकांमार्फतच हा सर्व्हे होईल. प्रत्येक विद्यार्थ्याला इयत्तानिहाय, विषयनिहाय आकलन किती झाले, याची पडताळणी करून अभ्यासात पिछाडीवर असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून उपचारात्मक अध्यापन केले जाणार आहे.
कोरोनामुळे शाळा दोन वर्षे बंद राहिल्याने अनेक मुलांना अजूनही अंकगणित, अक्षर ओळख नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे या सर्व्हेतून पहिल्यांदा भाषा, गणित, परिसर अभ्यास, इंग्रजी या विषयांचे मूल्यांकन मराठी, उर्दू, इंग्रजी, हिंदीसह एकूण दहा माध्यमांतून केले जाणार आहे. सर्व्हे चाचणीत प्रत्येक विद्यार्थ्याचा स्वतंत्रपणे मौखिक स्वरूपात, आवश्यकतेनुसार लेखी पद्धतीने सर्व्हे होईल. यासाठी राज्यातील सर्व शिक्षकांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने ऑनलाइन मार्गदर्शन करीत सर्व्हेचे निकष निश्चित केले आहेत. शिक्षकाने प्रत्येक विद्यार्थ्याचा वैयक्तिकरीत्या समोर बसवून निकोप वातावरणात सर्व्हे करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
सर्व्हचे असे आहे नियोजन
विचारलेल्या प्रश्नाला विद्यार्थ्याकडून मिळणाऱ्या प्रतिसादानुसार प्रगत (३), प्रवीण (२), प्रगतशील (१) आणि प्रारंभिक (०) अशा श्रेणी द्याव्यात.
सर्व्हेत विद्यार्थ्यांना लेखी प्रश्नपत्रिका दिल्या जाणार नाहीत.
द्यार्थ्यांना सामूहिकरीत्या प्रश्न विचारले जाणार नाहीत.
सर्व्हेवेळी वर्गात तणावमुक्त वातावरण राहण्याची काळजी घेण्यात यावी.
अभ्यासात पिछाडीवर असलेल्यांची संपादणूक पातळी वाढावी म्हणून जादा तास घेऊन अध्यापन करावे
...शिक्षकांनी करू नये अतिरिक्त मदत
विद्यार्थ्यांना वरची श्रेणी मिळावी म्हणून शिक्षकांनी अतिरिक्त मदत करू नये. अतिरिक्त मदत केल्यास विद्यार्थ्याचे आकलन नेमकेपणाने समजणार नाही, असे राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने स्पष्ट केले आहे. अध्ययन अभ्यास सर्व्हेतून विद्यार्थी व अध्ययननिष्पत्ती स्पष्ट होईल. शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील (डायट) अधिकारी, विषय सहायकांनी शाळांना भेटी देऊन सर्व्हेची पारदर्शकता पडताळायची आहे.
शाळांनी त्यांच्या स्तरावर करावे नियोजन
शिक्षकांनी निकोप वातावरणात सर्व्हे पूर्ण करावा. हे सर्वेक्षण शाळेच्याच वेळेत अपेक्षित आहे. शाळेतील वर्ग, विद्यार्थी व शिक्षकांच्या संख्येनुसार, सुटीचा कालावधी विचारात घेऊन शाळा स्तरावर नियोजन करून करावे.
- राजेश पाटील, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.