एफआरपी वेळेत अदा न करणारे व आरआरसी आदेश निर्गमित झालेले कारखाने त्यांनी लाल यादीत टाकले आहेत.
माळीनगर (सोलापूर): गाळप हंगाम 2021-22 सुरू होताना राज्यातील शेतकऱ्यांना ऊस पुरवठा करण्याबाबत सुयोग्य निर्णय घेण्याकरिता साखर आयुक्तांनी युक्ती शोधली आहे. एफआरपी वेळेत अदा न करणारे व आरआरसी आदेश निर्गमित झालेले कारखाने त्यांनी लाल यादीत टाकले आहेत. त्यानुसार राज्यातील 27 कारखाने लाल यादीत गेले असून त्यापैकी 13 कारखाने सोलापूर जिल्ह्यातील आहेत.
गाळप हंगाम 2020-21 मध्ये ऊसाची एफआरपीची रक्कम संपूर्णपणे काही कारखान्यांनी विहित कालावधीत अदा केली आहे, तर काही कारखान्यांनी विहित कालावधी उलटूनही एफआरपी अदा केलेली नाही. शेतकऱ्यांकडून सातत्याने एफआरपीची रक्कम कमी प्राप्त झाली, प्राप्त झालेली नाही किंवा विलंबाने प्राप्त झालेली आहे, अशा स्वरूपाच्या तक्रारी शासनाकडे व साखर आयुक्तांकडे वारंवार प्राप्त होतात.
या तक्रारींमध्ये मुख्यतः ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्त रकमेचे आमिष दाखविणे, परंतु ती रक्कम न देणे, ऊस गाळपास नकार देणे, हंगामाच्या सुरुवातीच्या काळात ऊस उत्पादकांना रक्कम अदा करणे व शेवटच्या महिन्यात शेतकऱ्यांची रक्कम थकीत ठेवणे अशा बाबी आढळल्या आहेत. काही निवडक शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा जादा रक्कम देऊन त्यानंतर बहुसंख्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करणे अशा अनिष्ठ प्रथा आढळून आलेल्या आहेत. त्यासंदर्भात सातत्याने विविध संघटनांमार्फत साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चे, उपोषण, धरणे आंदोलने होत असतात. काही कारखाने नेहमीच एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना विलंबाने देतात. अशा कारखान्यांच्या विरुद्ध साखर आयुक्तालयास आरआरसी आदेश निर्गमित करावे लागतात.
त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम कारखाना कोणता हे ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना सहज समजावे, यासाठी शेतकऱ्यांना योग्य ती माहिती पुरविण्याबाबत मंत्री समितीच्या बैठकीत चर्चा झाली. साखर आयुक्तांनी याबाबत परिपत्रक काढले आहे. ते https://sugar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यामध्ये नियमित एफआरपी देणारे कारखाने हिरव्या रंगाने, विलंबाने एफआरपी देणारे नारंगी रंगाने तर एफआरपी वेळेत न देणारे व आरआरसी अंतर्गत कारवाई झालेले कारखाने लाल रंगाने दर्शविले आहेत.
शेतकऱ्यांनी कोणत्या साखर कारखान्यास ऊसाचा पुरवठा करावा याबाबत निर्णय घेणे सोपे व सुलभ होण्यासाठी नियमित एफआरपी अदा करणारे, हंगामात थोड्या विलंबाने एफआरपी अदा करणारे व हंगाम संपूनही मुदतीत एफआरपी अदा न करणारे तसेच आरआरसी आदेश निर्गमित झालेल्या कारखान्यांची माहिती शेतकऱ्यांकरिता प्रसिद्ध करणे आवश्यक झाले आहे.
- शेखर गायकवाड, साखर आयुक्त
2020-21 च्या हंगामात लाल यादीत गेलेले जिल्हानिहाय कारखाने...
- सोलापूर - संत दामाजी, मंगळवेढा, विठ्ठल सहकारी, गुरसाळे (पंढरपूर), मकाई (करमाळा), लोकमंगल ऍग्रो इंडस्ट्रीज, बीबीदारफळ, लोकमंगल शुगर, भंडारकवठे, सिध्दनाथ शुगर, तिऱ्हे, गोकुळ शुगर इंडस्ट्रीज, धोत्री, मातोश्री लक्ष्मी, अक्कलकोट, जयहिंद शुगर, आचेगाव, विठ्ठल रिफाइण्ड शुगर्स, पांडे (करमाळा), गोकुळ माऊली शुगर्स, तडवळ, भीमा सहकारी, मोहोळ, सहकार शिरोमणी, भाळवणी (पंढरपूर)
- सांगली - यशवंत शुगर, नागेवाडी (खानापूर), एसजीझेड अँड एसजीए शुगर्स, तासगाव
- सातारा - किसनवीर सातारा, भुईंज (वाई), खंडाळा तालुका शेतकरी सहकारी, म्हावशी (खंडाळा)
- उस्मानाबाद - लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज, लोहारा, कंचेश्वर शुगर, तुळजापूर
- नाशिक - एस.जे शुगर, मालेगाव
- नंदुरबार - सातपुडा तापी, शहादा
- औरंगाबाद - शरद सहकारी, पैठण
- बीड - जयभवानी सहकारी, गेवराई, वैद्यनाथ सहकारी, परळी वैजिनाथ
- लातूर - सिद्धी शुगर, अहमदपूर, साईबाबा शुगर्स, औसा, पन्नगेश्वर शुगर्स, रेणापूर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.