मुंबई: फास्ट टॅग प्रणालीचा वाहनधारकांनी अधिकाधिक वापर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महामंडळाच्या अखत्यारीतील यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी) पथकर नाक्यांवर फास्टॅगधारक वाहनांना 5 टक्के सवलत (कॅशबॅक) 11 जानेवारी पासून दिली जाणार आहे.
पथकर नाक्यावरुन जाणाऱ्या वाहनांचा प्रवास कॅशलेस आणि वेगवान होण्यासाठी फास्टॅग प्रणाली विकसित करण्यात आली आहे. फास्टॅग वापरकर्त्या वाहनांची संख्या वाढवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने वाहनधारकांसाठी प्रोत्साहनपर कॅशबॅक योजना जाहीर केली आहे.
“मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि वांद्रे-वरळी सागरी सेतूने प्रवास करणाऱ्या प्रत्येक फेरीला पथकराच्या 5 टक्के कॅशबॅक रक्कम वाहनधारकाच्या फास्टॅग बँक खात्यात महामंडळामार्फत थेट जमा होईल. फास्टॅगचा वापर वाढावा, या हेतूने महामंडळाने कार, जीप आणि एसयूव्ही वाहनधारकांकरता मर्यादित कालावधीसाठी सवलत योजना लागू केली आहे,”असे सह-व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी सांगितले.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राज्यभरातील पथकर नाक्यांवर फास्टॅग प्रणालीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. त्याअंतर्गत यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, सातारा-कागल राष्ट्रीय महामार्ग, राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी) तसेच मुंबई एन्ट्री पॉईंटतर्गंत वाशी, मुलुंड (पूर्व द्रुतगती मार्ग), मुलुंड (लाल बहाद्दूर शास्त्री), ऐरोली पथकर नाक्यावर फास्टॅग प्रणाली कार्यान्वित झाली आहे. फास्टॅग प्रणालीची 100 टक्के अंमलबजावणीच्या दृष्टीने महामंडळाची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
फास्टॅगधारक वाहनांच्या संख्येत वाढ होण्यासाठी वांद्रे-वरळी सागरी सेतू पथकर नाका आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खालापूर, तळेगाव पथकर नाका, फूड मॉल, पेट्रोल पंपावर वेगवेगळ्या बँकांच्या मदतीने फास्टॅग स्टॉल सुरु करण्यात आले आहेत. त्याबरोबरीने रेडिओ एफएम वाहिनीवर प्रसिद्धी मोहीम देखील राबवण्यात येत आहे.
------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Fastag now 5 percent cashback cashless travel discount plan MSRDC
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.