विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे कमीच! सोलापुरात बहुजन कल्याण विभागाची 2 नवीन वसतिगृहे; मराठा विद्यार्थ्यांना वसतिगृहाची प्रतिक्षाच

दहावी-बारावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांची पुढील शिक्षणाच्या प्रवेशासाठी लगबग सुरू आहे. सोलापूर शहरात जिल्हा परिषदेची दोन तर समाजकल्याण विभागाची दोन वसतिगृहे आहेत. आता यंदापासून बहुजन कल्याण विभागाची दोन नवीन वसतिगृहे सुरू होत आहेत.
solapur
mantralaysakal
Updated on

सोलापूर : दहावी-बारावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांची पुढील शिक्षणाच्या प्रवेशासाठी लगबग सुरू आहे. सोलापूर शहरात जिल्हा परिषदेची दोन तर समाजकल्याण विभागाची दोन वसतिगृहे आहेत. आता यंदापासून बहुजन कल्याण विभागाची दोन नवीन वसतिगृहे सुरू होत आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातही दोन वसतिगृहे आहेत. पण, गावाकडून शहरात शिकायला येणाऱ्या मुला-मुलींची संख्या हजारांमध्ये असून त्यांच्या राहाण्यासाठीची वसतिगृहे मात्र मोजकीच आहेत. त्या वसतिगृहांची प्रवेश क्षमता अवघी दोन हजारांपर्यंतच आहे.

इयत्ता अकरावी आणि बारावीनंतर पदवी अभ्यासक्रमासाठी चांगल्या नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी सामान्य कुटुंबातील मुले-मुली धडपड करतात. कुटुंबाची आर्थिक स्थिती जेमतेम असल्याने मोलमजुरीवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असल्याने दररोज शहरातील महाविद्यालयांमध्ये ये-जा करणे त्यांना परवडत नाही. त्यामुळे मोफत किंवा स्वस्तात वसतिगृहाची सोय असल्यास चांगले गुण मिळालेल्या सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा खर्चही परवडतो. मात्र, वसतिगृहे आहेत पण त्याची प्रवेश क्षमता अत्यल्प असल्याने अनेक होतकरू विद्यार्थ्यांची शहरात शिक्षण घेण्याची इच्छा असूनही त्यांना शिकता येत नाही. दुसरीकडे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पदवी व पदव्युत्तर महाविद्यालयांमध्ये लागू झाल्याने शहरातील महाविद्यालयांमध्ये किंवा विद्यापीठातील विद्यार्थ्यांची संख्या वाढणार आहे. विद्यापीठात पदवीचे आणखी काही वाढीव कोर्सेस सुरू होत आहेत. पण, विद्यापीठातील वसतिगृहांची क्षमता केवळ ४५० पर्यंतच आहे.

जिल्ह्यातील वसतिगृहांची स्थिती...

१) समाजकल्याण विभागाची सोलापूर शहरात ३ तर अक्कलकोट, पंढरपूर, बार्शीत प्रत्येकी दोन, मोहोळ, नजीक पिंपरी, अनवली, अकलूज, माळशिरस, माढा, कुर्डुवाडी येथे प्रत्येकी एक वसतिगृह आहे. याठिकाणी पाचवी ते पदवीपर्यंतच्या एसटी व एससी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत राहाण्याची सोय आहे. १६ वसतिगृहांची प्रवेश क्षमता १२०० पर्यंतच आहे.

------------------------------------------------------------------------------------

२) जिल्हा परिषदेचे सोलापूर शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील नेहरू वसतीगृह आहे. या वसतिगृहाची क्षमता ५०० पर्यंत आहे. शेळगी येथे मुलींसाठी सावित्रीबाई फुले वसतिगृह असून त्याची क्षमता १०० ते १२५ पर्यंत आहे. त्याठिकाणी अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते. क्षमतेपेक्षा अधिक अर्ज आल्यास गुणवत्ता यादीनुसार प्रवेश दिले जातात. जुलैमध्ये प्रवेश सुरू होतील. विद्यार्थ्यांना एक हजार रुपयाचे डिपॉझिट तर दहा महिन्यांसाठी पाच हजारांपर्यंत भाडे आहे.

---------------------------------------------------------------------------------------

३) मराठा समाजातील आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी सोलापुरात वसतिगृह व्हावे, अशी वर्षानुवर्षांची मागणी आहे. परंतु, अद्याप वसतिगृह झालेले नसून शासनाकडून अशा विद्यार्थ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता म्हणून काही रक्कम अनुदान स्वरूपात दिली जाते.

----------------------------------------------------------------------------------------

४) राज्य शासनाच्या नवीन बहुजन कल्याण विभागाच्या माध्यमातून सोलापूर शहरातील भवानी पेठ व नवीन आरटीओ ऑफिसजवळ वसतिगृह सुरू होणार आहेत. यंदाच त्याचा शुभारंभ होणार असून भवानी पेठेतील वसतिगृह मुलींसाठी (प्रवेश क्षमता १००) व मुलांसाठी आरटीओ ऑफिसजवळील हॉस्टेल असेल. त्याचीही प्रवेश क्षमता १०० पर्यंतच असून या दोन्ही वसतिगृहांमध्ये व्हीजेएनटी, एसबीसी व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाच (व्यावसायिक शिक्षण घेणारे अकरावी, बारावीचे विद्यार्थी) प्रवेश मिळणार आहे.

--------------------------------------------------------------------------------------------

५) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात देखील तीन वसतिगृहे असून त्यातील एक वसतीगृह परदेशी विद्यार्थ्यांसाठी नव्याने सुरू करण्यात आले आहे. त्याची प्रवेश क्षमता ५० आहे. याशिवाय मुलींसाठी विद्यापीठात ३०० प्रवेश क्षमतेचे आणि मुलांसाठी १५० प्रवेश क्षमतेचे वसतिगृह आहे.

जुलैमध्ये वसतिगृहाचे प्रवेश

जिल्हा परिषदेच्या नेहरू वसतिगृहात व शेळगीतील मुलींच्या सावित्रीबाई फुले वसतिगृहात अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतील. जुलैमध्ये त्याची प्रक्रिया सुरू होईल. क्षमतेपेक्षा जास्त अर्ज आल्यास गुणवत्तेनुसार प्रवेश दिले जातात.

- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

मुला-मुलींसाठी वसतिगृहाची तातडीने व्हावी सोय

राज्य शासनाने मराठा समाजासाठी काय काय केले हे सांगण्यासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर केला, पण आमच्या मुला-मुलींच्या राहाण्यासाठी शहराच्या ठिकाणी वसतिगृह उभारू शकले नाही. वसतिगृह निर्वाह भत्ता दिला जातो, पण आमची शहरात येऊन शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींसाठी कायमस्वरूपी वसतिगृह व्हावे, अशी मागणी आहे.

- माऊली पवार, समन्वयक, सकल मराठा समाज, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.