राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आतापर्यंत विविध कारणांमुळे तब्बल चार वेळा लांबणीवर पडलेल्या दौऱ्याला अखेर पाचव्यांदा येत्या गुरुवारी (ता. २५) मुहूर्त लागणार असून त्यांच्या या दौऱ्याचे नियोजन पक्ष कार्यालयात येऊन धडकले आहे. दरम्यान, दौरा निश्चित झाल्यानंतर आत पुन्हा महसूल भवनासमोर मंडप थाटला जाणार आहे. तर इंद्रभवनवरील धूळ झटकली जाणार आहे. तिथे उद्घाटनाच्या शहनाईचे सूर गुंजणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याचं ठरलं बरं का ! अशी चर्चा आता भाजपच्या गोटात सुरु झाली आहे.
स्मार्ट सिटी योजनेसह विविध योजनेंतर्गत करण्यात आलेल्या विकास कामांच्या उद्घाटनासाठी गेल्या वर्षभरापासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोलापूर दौऱ्याचे नियोजन करण्यात आले. मात्र विविध कारणास्तव आतापर्यंत सोलापूरचा त्यांचा नियोजित दौरा चारवेळा रद्द झाला. कर्नाटक निकालानंतर पक्षीय स्तरावर आयोजित केलेल्या बैठकीमुळे मंगळवार (ता.१६ मे) दौराही रद्द झाला.
महसूल भवनसमोर टाकलेला मंडप काढण्यात आले. आता गुरुवार (ता.२५) रोजी नियोजित दौराची रुपरेषा पक्ष कार्यालयाला प्राप्त झाली आहे. त्यामुळे बुधवारी (ता.२४) पुन्हा उद्घाटनाची तयारी प्रशासकाकडून करण्यात येणार आहे.
फडणवीस हे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून येथील महसूल भवन येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यासह महापालिकेची इंद्रभवन इमारत, शहरातील शंभर बेडचे हॉस्पिटल आदी विकास कामांच्या उद्घाटनांसह अन्य लोकार्पणाचे कार्यक्रम त्यांच्या हस्ते होणार आहेत.
फडणवीस हे विरोधी पक्षनेते पदावर विराजमान झाल्यापासून ते आजतागायत सोलापुरातील पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्या सभेची, बैठकीची तयारी करीत आहेत. पक्षांतर्गत निर्माण झालेल्या तक्रारींचा पाढा वाचण्यासाठी काही माजी सदस्य उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्याची चातकासारखी वाट पाहत आहेत. तर काही सदस्य महापालिकेचे तिकीट पदरात पाडण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने उपमुख्यमंत्री फडणवीसांवर प्रभाव पाडण्यासाठी पुन्हा तयारीला लागले आहेत.
कार्यकर्त्यांसाठी दोन तास राखीव वेळ
शहर व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक. मिशन २०२४ साठी बूथ सक्षमीकरणासाठीची तयारी. शहराच्या विकासासाठी महत्त्वाची असलेली कामे, त्यासाठी आवश्यक असलेल्या निधीची उपलब्धता. यासह पक्षीय बांधणीच्या अनुषंगाने, आवश्यक असलेल्या बाबींची चर्चा करण्यासाठी कार्यकर्त्यांसाठी दुपारी साडेचार ते साडेसहा हा दोन तासाचा वेळ उपमुख्यमंत्र्यांनी राखून ठेवला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.