महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या निधीच्या माध्यमातून गाव पातळीवर बांधण्यात येणारे राज्यातील पहिले गोदाम उभारण्याचा मान पुणे जिल्ह्याला मिळाला आहे.
पुणे - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या निधीच्या माध्यमातून गाव पातळीवर बांधण्यात येणारे राज्यातील पहिले गोदाम उभारण्याचा मान पुणे जिल्ह्याला मिळाला आहे. या योजनेच्या माध्यमातून बांधले जाणारे पहिले गोदाम मावळ तालुक्यातील आडे या गावात उभारण्यात आले आहे. या गोदामाची साठवण क्षमता ही १०० मेट्रिक टन इतकी असून याचे क्षेत्रफळ हे १ हजार ८९ चौरस फूट इतके असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी मंगळवारी (ता.२१) सांगितले.
केंद्र व राज्य सरकारने रोजगार हमी योजनेच्या निधीच्या माध्यमातून गाव पातळीवर गोदाम उभारण्यास परवानगी दिली आहे. या परवानगीनंतर हे राज्यातील पहिलेच गोदाम उभारले गेले आहे. या गोदामाचे उद्घाटन खासदार श्रीरंग बारणे यांचे हस्ते मंगळवारी (ता.२१) करण्यात आले. यावेळी आमदार सुनील अण्णा शेळके, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, कृषी समितीचे माजी सभापती बाबूराव वायकर, मावळचे गटविकास अधिकारी सुधीर भागवत, रोजगार हमी योजनेच्या गट विकास अधिकारी स्नेहा देव आदी उपस्थित होते.
या गोदामाच्या बांधकामासाठी सुमारे ११ लाख ४७ हजार रुपयांचा खर्च ग्राह्य धरण्यात आला होता. यापैकी रोजगार हमी योजनेतून अकुशल कामासाठी १ लाख ८३ हजार रुपये तर, कुशल कामासाठी ४ लाख २३ हजार असे एकूण सहा लाख ६ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. शिवाय ग्रामपंचायतीने त्यांच्या हिश्श्यातून ४ लाख रुपयांचे योगदान दिले. याशिवाय या गोदामाच्या बांधकामामुळे रोजगार हमी योजनेंतर्गत ७२३ व्यक्तींचे श्रम दिवस निर्माण झाले. या श्रम दिवसातून गावातील सर्व गरीब कुटुंबांना मिळून एकूण १ लाख ८६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले, असे रोजगार हमी योजनेच्या गट विकास अधिकारी स्नेह देव यांनी सांगितले.
हे गोदाम कृषी अवजारे, बियाणे आणि खतांचा साठा करून ठेवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या साठवणुकीद्वारे काढणीनंतर होणारे नुकसान टाळण्यात आणि आपत्कालीन विक्री रोखण्यासाठी ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. या गोदामात ठेवण्यात आलेल्या मालावर शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज मिळू शकते. या गोदामात कोल्ड स्टोअरेज आणि राइस मिल्स बसवता येतात. वैयक्तिक व स्वयंसहाय्यता गटांचे छोटे व्यवसाय या गोदामातून चालविता येऊ शकतील. जेणेकरून गावपातळीवर रोजगार आणि शाश्वत उत्पन्न मिळू शकते. याशिवाय या गोदामाच्या भाड्यापोटी मिळणारे उत्पन्न ग्रामपंचायतीला मिळू शकणार आहे.
- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.