सोलापूर : काका महेश कोठे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे देवेंद्र कोठे हे वयाच्या २४ व्या वर्षी पहिल्यांदा २०१२ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर २०१७ मध्ये महेश कोठेंसोबत शिवसेनेत गेलेले देवेंद्र कोठे दुसऱ्यांदा शिवसेनेकडून नगरसेवक झाले. पण, २०१९च्या निवडणुकीत शिवसेनेकडून विधानसभेची उमेदवारी न मिळाल्याने महेश कोठेंनी तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला. पण, देवेंद्र कोठेंनी लोकसभा निवडणुकीवेळी भाजपमध्ये प्रवेश केला आणि पक्षाने त्यांना विधानसभेची संधी दिली.
बीबीए पदवीप्राप्त देवेंद्र कोठे हे शांत स्वभावाचे व त्यांच्या प्रभागात नगरसेवक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी सामाजिक बांधिलकीतून वडील स्व. राजेश कोठे यांच्या व आजोबा विष्णूपंत कोठे यांच्या स्मरणार्थ निराधारांना अन्नदानाचे कार्य हाती घेतले. शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातूनही त्यांनी गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय केली. नगरसेवक म्हणूनही त्यांनी दहा वर्षात नावलौकीक मिळविला होता. मागील अडीच वर्षांपासून महापालिकेत प्रशासकराज असल्याने त्यांनी जनतेत राहणे पसंत केले होते. कोठे यांना देवेंद्र फडणवीस यांनी मी तुझ्यासोबत राहीन, तु तयारी कर, काम कर म्हणून सल्ला दिला होता. तो सल्ला मानून कोठेंनी शहर मध्य मतदारसंघात महिला, श्रमिक वर्गांसाठी विविध मोहिमा राबविल्या. आरोग्य शिबिरे घेतले, लाडकी बहीण योजनेचा सर्वांना लाभ मिळावा म्हणून अनेक ठिकाणी कॅम्प घेतले. लोक ते विसरले नाहीत. त्यांनी मतदानाच्या रुपाने कोठेंना साथ दिली.
२०१९च्या विधानसभेवेळी काका महेश कोठे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, पण देवेंद्र कोठेंनी तटस्थ राहणे पसंत केले आणि हा त्यांचा निर्णय दूरदृष्टीचा ठरला. लोकसभा निवडणुकीत राम सातपुते यांचे प्रामाणिक काम केल्याची पोचपावती पक्षाने त्यांना विधानसभेची उमेदवारी देवून दिली. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जितला हा उमेदवार होता, त्यामुळे त्यांना नवखे उमेदवार असताना देखील पक्षाअंतर्गत फार विरोध झाला नाही. त्यांचा विश्वास सार्थ ठरवित देवेंद्र कोठेंनी दणदणीत विजय मिळविला. चार निवडणुकांमध्ये कधी शहर मध्य तर कशी शहर उत्तरमधून आमदारकीसाठी आबदणाऱ्या महेश कोठेंच्या अगोदर त्यांचा पुतण्या देवेंद्र कोठे पहिल्याच निवडणुकीत आमदार झाले हे विशेष.
सासू, सासरे, पत्नी, बहिणीही प्रचारात
सासू-सासरे भाजपात आणि देवेंद्र कोठे हे काका महेश कोठेंसमवेत काँग्रेस, शिवसेनेत अशी एकेकाळी स्थिती होती. सहा महिन्यांपूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना या विधानसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारी दिली. त्यानंतर मतदान होईपर्यंत सासू श्रीकांचन यन्नम, सासरे रमेश यन्नम, पत्नी मोनिका कोठे, बहीण धनश्री कोंड्याल व राधिका कोठे हे सगळे देवेंद्र कोठे यांच्यासोबत सावलीसारख्या उभ्या राहिल्या. घरोघरी जावून त्यांनी प्रचार केला. त्यामुळे मतदारांबरोबरच देवेंद्र कोठेंच्या विजयात कुटुंबियांची साथ देखील खूप मोलाची ठरली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.