अण्णासाहेब बोरगुडे : सकाळ वृत्तसेवा
नैताळे (जि. नाशिक) : महाराष्ट्राची लोककला म्हणून तमाशा मंडळाकडे बघितले जात असले, तरी तमाशा मंडळांतील हजारो कलावंत कोरोना (Corona) कालखंडातील दोन वर्षांपासुन आपले जीवन कसे व्यतित करत आहेत, हा एक संशोधनाचा विषय होईल. सावकाराकडून कर्ज घेऊन प्रपंच चालवताना होणाऱ्या यातना शब्दांत मांडता येणार नाहीत. मात्र, महाराष्ट्र शासनाकडून मदत मिळावी यासाठी अनेकदा मंत्रालयाच्या पायऱ्या झिझवल्या, आंदोलने केली. मात्र, शासनाने नुसतीच पॅकेजची घोषणा केली; अद्याप एक दमडीही मदत कलावंतांच्या पदरात पडलेली नाही. अशी खंत राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांनी रविवारी (ता. ६) ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.
नातेवाईक किती दिवस मदत करणार?
नैताळे येथे आल्या असताना श्रीमती बनसोडे यांच्याशी संपर्क साधला असता त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील जत्रा- यात्रा बंद केल्या. तसे करणे काळाची गरज असली, तरी लोकनाट्य तमाशातील ज्येष्ठ कलावंतांना मात्र शासनाने वाऱ्यावरच सोडले आहे. जत्रा, यात्रा, बाजार यावर चरितार्थ अवलंबून असलेल्या तमाशा मंडळांचे सांस्कृतिक कार्यक्रमही या काळात बंद झाले. महाराष्ट्राची लोककला म्हणून तमाशा मंडळाकडे बाघितले जात असताना, त्यातील कलाकारांवर मात्र अक्षरशः उपासमारीची वेळ आली. उसने- पासने करुन बघितले. पण, लोक, नातेवाईक किती दिवस मदत करणार? अखेर सावकारी कर्जाशिवाय पर्याय नव्हता.
महाराष्ट्र शासनाकडून कलावंतांना मदत मिळावी म्हणून अक्षरशः आंदोलनेही केली. पण, शासनाकडून फक्त अन् फक्त आश्वासने मिळत गेली. अनेकवेळा मंत्रालयाच्या पायऱ्याही झिझवल्या. दरम्यानच्या काळात सरकारने पॅकेजची घोषणा केली खरी; पण अद्यापपर्यंत एक दमडीही कलावंतांच्या पदरात पडलेली नाही. कोरोनामुळे अनेक तमाशा मंडळांना आपले निष्ठावंत कलावंत गमावण्याची वेळ आली. कुटुंबातील कर्ता पुरुष व स्री गेल्यावर कुटुंबाची काय अवस्था होते, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. सरकार अडचणीत आहे, याची आम्हाला कल्पना आहे. पण, त्याहीपेक्षा कलावंत, त्यांचे कुटुंब अडचणीत आहेत. ही बाब सरकारने लक्षात घ्यायला हवी होती. कलावंताचे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत. ते सोडविण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. एका मोठ्या तमाशा मंडळात ५० ते १०० जण काम करतात. राज्यात जवळपास १२० पेक्षा जास्त छोटी- मोठी तमाशा मंडळे आहेत. त्यातील सात ते आठ हजार कलावंतांचा प्रश्न शासनाने टांगता ठेवला असल्याचेही त्यांनी या वेळी नमुद केले.
लतादिदी आमचा कंठ
या देशाचे भुषण असलेल्या गान सम्राज्ञी लता मंगेशकर ह्या तमाशा मंडळाचा व सांस्कृतिक कार्यक्रमांचा कंठ होता, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कोरोना कालखंडात महाराष्ट्र शाशनाच्या सांस्कृतिक विभागाकडून दिले जाणारे पुरस्कारही दिले गेले नाहीत. याबाबत शासनाने घोषणा करण्याची गरज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.