सोलापूर : अमर्याद वेग, सर्व्हिस रोडचा वापर न करणे, महामार्गांवर वाहने उभी असणे, ट्रिपलसिट दुचाकी, क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक, लेन कटिंग, मद्यपान करून वाहन चालविणे, अशा प्रमुख कारणांमुळे रस्ते अपघात वाढले आहेत. जिल्ह्यात १ जानेवारी ते ३० सप्टेंबर २०२४ या नऊ महिन्यांत तब्बल ५७६ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. गतवर्षी दीड हजार अपघातांमध्ये ८०० जणांनी जीव गमावल्याचे ‘आरटीओ’कडील आकडेवारीतून समोर आले आहे.
जिल्ह्यात रस्त्यांची कनेक्टिव्हिटी वाढली असून महामार्गांवरून वाहने सुसाट धावताना दिसतात. पण, दुचाकीस्वारांना नियमांचे भान नसते तर इतर वाहनांचा वेग अमर्याद असल्याची वस्तुस्थिती आहे. धक्कादायक बाब म्हणजे महामार्गांवर तासन्तास वाहने उभी असतात. त्यामुळे मागून धडक बसून अपघात व त्यात मृत्यू होण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे.
विशेष बाब म्हणजे शहर व ग्रामीण पोलिसांचे वाहतूक अंमलदार, आरटीओ, महामार्ग पोलिस अशी यंत्रणा असतानाही रस्ते अपघात व अपघाती मृत्यू वाढल्याची स्थिती आहे. बेशिस्त वाहनांवर सोलापूर शहर पोलिसांकडून सतत कारवाई सुरु असताना देखील २०२२ मध्ये १८४ रस्ते अपघातात ८० जणांचा तर २०२३ मध्ये १९० अपघातांमध्ये ७७ जणांचा मृत्यू झाला आहे. चालू वर्षात देखील १५२ अपघातात ५३ जणांचा जीव गेल्याचेही आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
जिल्हा रस्ता सुरक्षा समिती कागदावरच
जिल्ह्यातील रस्ते अपघातांवर नियंत्रण यावे, अपघातांची कारणे शोधून त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी खासदार व जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा समित्या कार्यरत आहेत. मात्र, या समित्या आहेत की नाहीत असा प्रश्न उपस्थित होत आहे. या समित्यांची किमान एक ते तीन महिन्यांत बैठक होणे अपेक्षित आहे, पण मागे या समित्यांची बैठक कधी झाली हे अधिकाऱ्यांना सुद्धा माहिती नाही, अशी वस्तुस्थिती आहे.
तालुकानिहाय अपघात व मृत्यू
(जानेवारी ते सप्टेंबर २०२४ पर्यंत)
तालुका अपघात मृत्यू
माढा १४२ ७३
माळशिरस ८९ ६२
सांगोला ७५ ५३
करमाळा ४४ २६
बार्शी १०२ ५१
मंगळवेढा ४३ २१
पंढरपूर १३२ ६५
अक्कलकोट ४३ २३
मोहोळ १०५ ७८
द. सोलापूर ५९ ३६
उत्तर सोलापूर ६७ ३५
सोलापूर शहर १५२ ५३
एकूण १०५३ ५७६
२२ महिन्यांत ११३ जणांचे परवाने निलंबित
बेशिस्त वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर सोलापूर शहर व ग्रामीण पोलिसांकडील वाहतूक अंमलदाराकडून नेहमीच दंडात्मक कारवाई केली जाते. याशिवाय आरटीओ व इंटरसेप्टर वाहनांद्वारे ई-चालानमधूनही दंड आकारला जातो. वाहतूक पोलिसांच्या प्रस्तावानुसार मागील २२ महिन्यांत जिल्ह्यातील ११३ जणांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. त्यात चालू वर्षातील ४८ जण आहेत.
प्रत्येक तालुक्यासाठी एक वाहतूक निरीक्षक
प्रत्येक तालुक्यासाठी एक वाहतूक निरीक्षक नेमला असून त्या तालुक्यात झालेल्या अपघातांची कारणे व उपाययोजना काय करता येतील, याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली आहे. त्याचा अहवाल त्यांच्याकडून घेतला जातो. याशिवाय रस्ता दुभाजक तोडलेला असल्यास त्याची माहिती रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ठेवली जाते. रस्त्याची कामे सुरु असल्यास त्याठिकाणी काय खबरदारी घ्यावी, याचीही माहिती वाहनधारकांना होईल अशी व्यवस्थाही केली आहे.
- गजानन नेरपगार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.