नगरसेवक झाले माजी, आमदार लक्ष देणार का? बाप्पांनाही सोलापुरातील रस्त्यांतील खड्ड्यांची चिंता; वर्षाला सव्वादोन कोटींचा खर्च, तरी खड्ड्यांची डागडुजी नाही

गणेशोत्सव अवघ्या १८ दिवसांवर आला असताना सोलापूर शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याचे चित्र आहे. ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरवात होत आहे. तरीदेखील महापालिकेकडून रस्त्यांच्या दुरुस्तीची हालचाल दिसत नाही.
maharashtra
maharashtrasakal
Updated on

सोलापूर : गणेशोत्सव अवघ्या १८ दिवसांवर आला असताना सोलापूर शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याचे चित्र आहे. ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरवात होत आहे. तरीदेखील महापालिकेकडून रस्त्यांच्या दुरुस्तीची हालचाल दिसत नाही. विशेष बाब म्हणजे शहरातील प्रत्येक विभागीय कार्यालयास रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी दरवर्षी २० लाख रुपये तर नगरअभियंता कार्यालयास ७५ लाख रुपयांची तरतूद आहे. तरीदेखील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, हे विशेष. एकूण यंदा गणेशोत्सवात सोलापूर शहरातील रस्ते बाप्पासाठी सुद्धा भीतीदायक ठरणार आहेत.

सोलापूर शहरात प्रवेश करताना धर्मवीर संभाजी महाराज चौकातून पुढे मार्गस्थ होताना त्याठिकाणी मोठा खड्डा पडला आहे. पुढे ॲम्बेंसेडर हॉटेललगतचा रस्ता व समोरील रस्ताही खराब झाला आहे. पुढे एसटी स्टॅण्डसमोर व छत्रपती शिवाजी महाराज चौकातही मोठा खड्डा पडला आहे. नवीपेठ, पासपोर्ट कार्यालयासमोरील रोड, अक्कलकोट पाण्याची टाकी, अक्कलकोट रोड, शिंदे चौक, रंगभवनजवळील जिल्हा न्यायालयासमोरील रस्ता व पुढे पोटफाडी चौक, गुरुनानक चौकातून अशोक चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरही खड्डे पडल्याची वस्तुस्थिती आहे.

अनेक अधिकारी व शासकीय कर्मचारी दररोज या रस्त्यावरून ये-जा करतात, शाळकरी मुलांचीही याच रस्त्यावरून ये-जा सुरू असते. वाहनांची सर्वाधिक वर्दळ असणाऱ्या या रस्त्यांची अशी दुरवस्था झालेली असतानाही महापालिकेकडून खड्ड्यांची दुरुस्ती होत नसल्याचे गाऱ्हाणे सोलापूरकरांनी मांडले आहे. आता रस्त्यांच्या दुरुस्तीचा विषय महापालिका प्रशासनाकडून किती गांभीर्याने सोडविला जातो, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष आहे.

रस्त्यांच्या दुरूस्तीचे आयुक्तांनी द्यावेत आदेश

गणेशोत्सव, नवरात्र उत्सव आता काही दिवसांवर आला आहे. मात्र, सध्या शहरातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांचेही अपघात वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीचे आदेश द्यावेत.

- अमोल शिंदे, प्रमुख सल्लागार, मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ, सोलापूर

----------------------------------------------------------------------------------------

महापालिकेकडून तातडीने खड्डे बुजवावेत

गणेशोत्सव आता काही दिवसांवर आला असून महापालिका प्रशासनाने मिरवणूक मार्गांवरील खड्ड्यांची दुरुस्ती तातडीने करावी. जेणेकरून मिरवणूक काढताना कोणताही अडथळा येणार नाही. महापालिकेने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.

- श्रीकांत घाडगे, प्रमुख सल्लागार, लोकमान्य गणेशोत्सव महामंडळ, सोलापूर

रस्ते दुरुस्तीचा निधी

  • विभागीय कार्यालये

  • झोननिहाय दरवर्षी निधी

  • प्रत्येकी २० लाख रुपये

  • नगरअभियंता कार्यालयाचा निधी

  • ७५ लाख रुपये

  • दरवर्षीची एकूण तरतूद

  • २.३५ कोटी

अधिकारी म्हणतात, थेट आयुक्तांना विचारा

आता उत्सवांचा काळ असून शहरातील रस्त्यांमधील खड्ड्यांची दुरुस्ती कधी होणार, त्यासाठी निधी आहे का?, यासंदर्भात नगरअभियंता कार्यालयास माहिती विचारली असता त्यांनी थेट महापालिका आयुक्तांना विचारा, असे सांगितले. महापालिका आयुक्तांना याबाबत संपर्क साधला, पण त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. नगरसेवक माजी झाल्याने त्यांच्याही मागणीकडे फार लक्ष दिले जात नसल्याने आता शहरातील विधानसभा मतदारसंघातील आमदार तरी या विषयाकडे लक्ष देतील का, असा प्रश्न सोलापूरकरांनी उपस्थित केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.