Anil Deshmukh : खोट्या प्रतिज्ञापत्रांसाठी फडणवीसांचा दबाव;माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा ‘बाँबगोळा’

‘‘ महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी चार खोटी प्रतिज्ञापत्रे तयार करून द्या. तुमच्यावर कुठलीच कारवाई करणार नाही. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे त्यांच्या विश्वासातील व्यक्तीला पाठविले होते,’’
Anil Deshmukh
Anil Deshmukhsakal
Updated on

नागपूर : ‘‘ महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी चार खोटी प्रतिज्ञापत्रे तयार करून द्या. तुमच्यावर कुठलीच कारवाई करणार नाही. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे त्यांच्या विश्वासातील व्यक्तीला पाठविले होते,’’ असा खळबळजनक आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज केला. मी प्रतिज्ञापत्र दिले असते तर तीन वर्षांपूर्वीच महाविकास आघाडीचे सरकार कोसळले असते असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान ‘‘माजी गृहमंत्री देशमुख यांच्यावर ईडी आणि इतर तपास यंत्रणांचा दबाव आणून सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला,’’ असा आरोप सामाजिक कार्यकर्ते श्‍याम मानव यांनी केला. या आरोपावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही लोक सुपारी देत असल्याची टीका केली. फडणवीसांच्या टीकेला मानव यांनी प्रत्युत्तर दिले असून, सुपारी देण्याची क्षमता त्यांच्यामध्येच जास्त आहे, असे नमूद केले.

‘‘फडणवीस यांच्या सांगण्यावरून तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना माझ्यावर शंभर कोटींच्या खंडणीचा खोटा आरोप केला होता. या दरम्यान फडणवीस यांनी त्यांचा अत्यंत विश्वासू माणूस माझ्याकडे पाठविला. त्याने माझे आणि फडणवीस यांचे फोनवरून बोलणे करून दिले. त्यानंतर अनेकदा तो माझ्याकडे आला. प्रत्येक वेळी त्याने माझे आणि फडणवीस यांचे फोनवरून बोलणे करून दिले. एकदा फोनवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी काही कागदपत्रे तुमच्याकडे पाठवतो ती जरा पाहून घ्या. पुन्हा ती जवळची व्यक्ती कागदपत्रे घेऊन आली व तिने माझे मोबाईलवरून फडणवीस यांच्याशी बोलणे करून दिले. फडणवीस म्हणाले, जी कागदपत्रे पाठविली आहेत त्या चार मुद्यांवर आपण प्रतिज्ञापत्र करून द्या. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री म्हणून मला त्यांच्या ‘वर्षा’ सरकारी निवासस्थानी बोलावले. मुंबई महानगर पालिकेची निवडणूक जवळ आली आहे. त्यासाठी मला पैशांची गरज आहे. आपण मला तीनशे कोटी रुपये जमा करून द्या असा खोटा आरोप तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर लावायचा व त्याचे प्रतिज्ञापत्र करून द्यायचे असे त्यांनी सांगितले होते,’’ असे देशमुख यांनी नमूद केले.

आदित्य ठाकरेंना अडकविण्याचा प्रयत्न

‘‘उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नातू व तत्कालीन कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांना दिशा सालियन आत्महत्या प्रकरणात गोवण्यात यावे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची व्यवस्थापक दिशा सालियन हिच्यावर आदित्य यांनी अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि तिने जेव्हा आरडाओरड केली तेव्हा तिला बाल्कनीतून खाली फेकण्यात आले आणि त्यातच तिचा मृत्यू झाला, असा खोटा आरोप प्रतिज्ञापत्राद्वारे आदित्य ठाकरे यांच्यावर करावा,’’ असेही सांगण्यात आले होते.

अजित पवारही होते रडारवर

अजित पवार यांच्यावरही खोटे आरोप केले जावेत असे मला सांगण्यात आले होते. ‘‘ तिसऱ्या प्रतिज्ञापत्रात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील कार्यालयात मंत्री म्हणून मला बोलावून घेतले. तिथे त्यांचा मुलगा पार्थ पवार देखील होता. दादांनी सांगितले महाराष्ट्रात गुटखा आणि पान मसाल्याचा मोठा धंदा आहे. त्यांच्याकडून आपल्याला पैसे वसुली करायची आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पैसे वसुलीचे काम पार्थ पवार करतील. तुम्ही फक्त गृहमंत्री म्हणून त्यांना मदत करा,’’ असा खोटा आरोप अजित पवार यांच्यावर करायला सांगण्यात आला होता असे देशमुख यांनी नमूद केले. ‘‘ याच प्रतिज्ञापत्रात तत्कालीन मंत्री अनिल परब यांचे दापोलीच्या साई रिसॉर्टमध्ये पैसे लागलेले आहेत. सर्व पैसे त्यांचेच आहेत. फक्त कागदोपत्री मालकी सदानंद कदम यांची दाखविण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तक्रारीवर गृहमंत्री म्हणून त्यांना मदत करा, असा आरोप मला अनिल परब यांच्यावर प्रतिज्ञापत्रातून करायला सांगण्यात आला होता,’’ असे देशमुख यांनी म्हटले आहे.

विकत घेण्याची क्षमता फडणवीसांकडेच जास्त

‘‘ मला कुणी विकत घेऊ शकते का? मी कुणाच्या सांगण्यावरून वागू शकतो का? माझे संपूर्ण ५४ वर्षांचे जीवन लोकांसमोर आहे,’’ असे सांगून श्‍याम मानव म्हणाले की, ‘‘मी १९७० पासून सार्वजनिक जीवनात आहे. पत्रकार म्हणून शोधपत्रकारिता केली आहे. या काळात हजारो लोकांचा भंडाफोड केला. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने माझ्याकडे पुरावे दिल्यानंतर त्यावर कितपत विश्वास ठेवावा? कितपत ठेवू नये? कोणते पुरावे पाहावे? कोणते पाहू नयेत? या सर्व गोष्टी मला नीट माहीत आहेत. माझी विश्वसनीयता मला महत्त्वाची आहे. मी आयुष्यात कधी खोटे बोललो नाही, बोलणार नाही. मी जे आरोप केले ते पहिल्यांदा केलेले नाहीत. मी गेल्या पाच महिन्यांपासून हेच बोलत आहे.’’

खात्री पटल्याशिवाय बोलणार नाही

अनिल देशमुख यांच्याकडे असलेल्या पुराव्यांबाबत बोलताना श्याम मानव म्हणाले की, ‘‘ अनिल देशमुख यांच्याकडे असलेल्या पुराव्यांची खात्री पटल्याशिवाय मी बोलणार नाही. सरकारवर एवढे गंभीर आरोप करताना त्याचे परिणाम काय होऊ शकतात याची मला कल्पना आहे. मी फक्त लोकशाही, राज्यघटनेविषयी बोललो. अशा पद्धतीने सरकार पाडण्याला माझा विरोध आहे. आणीबाणीच्या विरोधात आंदोलनामुळे मी तुरुंगात गेलो तेव्हा हेच संघाचे लोक माझ्याबरोबर होते. तुरुंगातून सुटल्यानंतर मी देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधर फडणवीस यांच्याबरोबर काम केले. त्यांना माझे कौतुक वाटत होते.’’

मानव खोटे का बोलतात?

‘‘ श्याम मानव यांनी एवढे मोठे आरोप करण्यापूर्वी माझ्याशी चर्चा करायला हवी होती,’’ असे सांगत फडणवीस म्हणाले ‘‘शाम मानव मला बऱ्याच वर्षांपासून ओळखतात तेही सुपारीबाजांच्या नादी लागून खोटे नरेटिव्ह का स्वीकारत आहेत? त्यांनी या संदर्भातील पुरावे पडताळून पाहायला हवे होते. कोणतीही खातरजमा न करता दररोज वेगवेगळे फेक नरेटिव्ह चालविले जात आहेत. देशमुख यांनीच गिरीश महाजन यांना मोक्का लावण्याचे आदेश दिले होते. विरोधी पक्षांच्या आमदारांना तुरुंगात डांबण्याचे आदेश मविआ सरकारच्या काळात दिले जात होते. देशमुखांच्या आदेशाचा उल्लेख सीबीआयच्या आरोपपत्रामध्ये देखील आहे.’’ फडणवीसांच्या आरोपांचे मानव यांनी खंडन केले. ‘‘ फडणवीस यांची भेट घेणे सोपे नाही. मी तीन वर्षांपासून त्यांची भेट घेण्यासाठी तासनतास वाट पाहिली आहे. पण त्यांची भेट होऊ शकली नाही,’’ असे मानव म्हणाले.

‘देशमुखांच्या क्लिप माझ्याकडे’

माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि सामाजिक कार्यकर्ते शाम मानव यांनी केलेल्या आरोपांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. माझ्याकडे देशमुखांच्या काही क्लिप्स आहेत. वेळप्रसंगी मी त्या बाहेर काढू शकतो असे विधान त्यांनी केले आहे. ‘‘ अनिल देशमुख हे सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. ते कोणत्याही थराला जाऊन आरोप करत असतील तर त्यांच्याच पक्षातील सहकाऱ्यांनी दिलेले त्यांचे काही व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप माझ्याकडे आहेत. त्यात ते उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याबद्दल जे बोलले आहेत ते बाहेर आले तर तेच अडचणीत येतील. मी अशा प्रकारचे राजकारण करत नाही पण पुराव्याशिवाय कुणीही माझ्यावर वाटेल ते आरोप केले तर सोडतही नाही,’’ असेही फडणवीस म्हणाले. देशमुख यांना मविआ सत्तेत असतानाच मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी ठोठावलेल्या शिक्षेमुळे तुरुंगात जावे लागले होते याची आठवणही फडणवीस यांनी करून दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.