मुंबई : ‘‘उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर गाडीत स्फोटके सापडणे आणि त्या प्रकरणात एका पोलिस अधिकाऱ्याची अटक होणे, या प्रकरणात एकाचा खून होणे... मंत्र्यांनी पैसे गोळा करण्याचे टार्गेट दिलेले असल्याचा आरोप तत्कालीन पोलिस आयुक्तांनी करणे... हे एकूण प्रकरणच घृणास्पद आणि अत्यंत खालच्या पातळीवर गेलेले आहे. वयाच्या ९२ वर्षी असल्या प्रकरणाची चौकशी करण्यास मी अनेक पातळीवर योग्य नाही. माझे वयही यासाठी मला साथ देणार नाही आणि दुसरे अधिक महत्त्वाचे म्हणजे हे खरेच हे पोलिस अधिकाऱ्यांनी घडवलेले असेल तर माझ्या ३६ वर्षांच्या पोलिस सेवेत अशा प्रकारचा अनुभव मला कधीच आलेला नसल्याने मी ही चौकशी करण्यास पात्र व्यक्ती नाही,’’ असे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त जे. एफ. रिबेरो यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले.
गृहखाते आणि मुंबई पोलिसांमध्ये सुरू असलेल्या वादंगावर जे. एफ. रिबेरो ‘सकाळ’शी बोलत असताना त्यांच्या प्रत्येक शब्दातून राग, चीड, तिरस्कारासोबत पोलिस सेवेवरील प्रेमापोटी वेदनाही व्यक्त होत होती. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी राज्याच्या गृहमंत्र्यानी पैसे गोळा करण्याचे टार्गेट दिले असल्याचा आरोप केल्यानंतर एकच वादळ उडाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अशा प्रकरणाची निष्पक्ष चौकशी जे. एफ. रिबेरोंसारख्या अधिकाऱ्यांकडून व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. देशातील कोणत्याही चौकशी यंत्रणेपेक्षा अधिक तटस्थपणे रिबेरो चौकशी करू शकतील, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर रिबेरोंशी ‘सकाळ’ने संपर्क साधत याविषयी विचारल्यावर त्यांनी याविषयी आपले मत व्यक्त केले.
‘‘राजकारण्यांना अशा प्रकारच्या गोष्टी चालू शकतात. पण पोलिस सेवेत आपण केवळ आणि केवळ जनतेच्या सेवेसाठी आलो आहोत हे विसरता कामा नये. गृहखात्याच्या अंतर्गत पोलिस खाते असते चुकीच्या गोष्टी करण्यास तयार नसणाऱ्या पोलिसांसाठी पण इथे सन्मानाची जागा आहे. बेकायदा गोष्ट करण्यास तयार असणाऱ्या पोलिसांना हेरले जाते. त्यांना सोयीच्या जागेवर काम करता येते. हे घडू नये याची जबाबदारी आयपीएस दर्जाच्या आयुक्तांची असते. सब इन्सपेक्टर दर्जाचे पोलिस अधिकारी आमिषाला बळी पडतात, त्यांच्यावर आयुक्तांची जरब असण्याची आवश्यकता आहे,’’ असे रिबेरो म्हणाले.
सोयीच्या नियुक्त्या मिळवण्याठी पोलिस राजकारण्यांच्या जवळ जातात आणि मग राजकारणी अधिकाऱ्यांचा वापर करतात. पण आता आयपीएस अधिकारीही याला बळी पडत आहेत. हा माझ्यासाठी खरोखरच धक्का आहे, असे ते म्हणाले.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी जे. एफ. रिबेरोंना राज्यपालपद स्वीकारण्याची विनंती केली होती, याची आठवणही यावेळी रिबेरोंनी काढली. ते म्हणाले, ‘‘३६ वर्षे सरकारची मी प्रामाणिकपणे सेवा केली होती. सामाजिक सेवा करायची असेल तर, असल्या कोणत्याही पदाची मला आवश्यकता तेव्हाही वाटत नव्हती. प्रामाणिकपणे काम केले तर, तुम्हाला निवृत्तीनंतरही लक्षात ठेवले जाते. अजूनही काही चांगले अधिकारी आहेत, ज्यांना कायम दूर ठेवले जाते. यात व्यंकटेशन, विवेक फणसळकर, सदानंद दाते सारखे अधिकारी आहेत त्यांचा येथे आवर्जुन उल्लेख करेन.’’
बदल्यांत पारदर्शकता हवी
‘‘मी जरी ही चौकशी करणार नसलो तरी ती कुठल्या दिशेने करण्याची आवश्यकता आहे याविषयी विचार होण्याची आवश्यकता आहे. या एका प्रकारणासाठी नव्हे तर, पोलिस सेवा क्षेत्र जनतेसाठी आणि न्याय देण्यासाठीच कसे उपयोगी पडेल. पोलिसांच्या नियुक्त्या हे ‘आयजीं’च्या पातळीवर व्हायला हव्यात, मंत्र्यांचा त्याच्यात हस्तक्षेप होणार नाही. त्यामध्ये पारदर्शीपणा येण्याची आवश्यकता आहे. यावरही यापुढे काम होण्याची आवश्यकता आहे,’’ असे जे. एफ. रिबेरो यांनी स्पष्ट केले.
- महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.