बेळगाव : सर्वत्र लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे, यादरम्यान मध्यरात्री दीड वाजता मुसळधार पावसातही गणेश भक्त पावसाच्या आडोशाला कट्टा धरून गणेश दर्शन घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होते.
नाशिक : रात्रीचे बारा वाजल्याने पोलिसांनी शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक थांबवली, पोलिसांनी फिरून सर्व वाद्य बंद असल्याची खात्री केली, 12 वाजता मिरवणूकीतील सर्व वाद्य बंद करण्यात आले. तसेच सर्व गणेश मंडळाचे चित्ररथ माघारी परतले.
नाशिक : दंडे हनुमान मंडळाचा गणपती मेहेर सिग्नलवर दाखल झाला त्यानंतर भाविकांकडून तालावर ठेका धरत जल्लोष, पुष्प वृष्टी, अतिषबाजीने स्वागत करण्यात आले. दरम्यान 12 वाजता सर्व वाद्य बंद करण्याच्या पोलिसांकडून ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना देण्यात आल्या मात्र दंडे हनुमान मंडळाचा चित्ररथ अद्यापही मेहेर सिग्नलवर आहे. दरम्यान पोलिसांकडून आवाहन करूनही कार्यकर्ते ठाण मांडून असल्याने पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचा दिला इशारा दिला.
हिंगोली : कळमनुरीत पोलिसांनी मिरवणुकी मधील डीजे रोखल्याने काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता. तर हिंगोलीत शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी बनायेंगे मंदिर गाण्यावर ठेका धरत गणरायाची मिरवणूक काढली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानावरील गणपतीचे विसर्जन झाले आहे. गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत गणपतीला निरोप देण्यात आला आहे.
साताऱ्यात भरपावसात तरुणींचा डॉल्बीवर तुफान डान्स
सातारा : भर पावसात विसर्जन मिरवणुकीत तरुणींनी डॉल्बीच्या तालावर ठेका धरला. साताऱ्यात मुसळधार पावसात गणेश विसर्जन मिरवणूक पार पडत आहेत. सायंकाळनंतर निघालेल्या मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीत मुसळधार पावसाने हजेरी लावली. शहरातील एका गणेश मंडळाच्या मिरवणुकीत तरुणींनी भर पावसात डॉल्बीच्या तालावर ठेका धरत डान्स केला. पावसामुळं विसर्जन मिरवणुकीत व्यत्यय आला असला तरी तरुणींमध्ये उत्साह असल्याचं दिसून येत आहे.
नाशिकमध्ये विसर्जन मिरवणुकांमध्ये उत्साह
नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये उत्साह पहायला मिळत आहे. भाविकांनी गोदाकाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे.
जळगाव : गणेश विसर्जनासाठी पाण्यात उतरलेल्या १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील खडकी बुद्रुक इथं गणपती विसर्जनादरम्यान एका १७ वर्षीय तरुणांचा बुडून मृत्यू झाला. सौरभ मोरे असं या तरुणाचं नाव असून तो आपल्या आई आणि भावासह राहतो. शुक्रवारी आपल्या गणेश मंडळाच्या गणपती विसर्जनासाठी तो अंबुजा कंपनीमागील तलावात उतरला होता.
औंढा नागनाथ इथं मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
शहरात मानाच्या ११ गणपतींच्या मिरवणुकीला दुपारी तीनच्या दरम्यान सुरुवात झाली. आत्तापर्यंत काही गणपतींचे विसर्जन झाले आहेत. शहरात ११ मानाचे गणपती आहेत, त्यांच्या विसर्जनानंतर इतर गणपतींच्या विसर्जनाला सुरुवात होते.
जालन्यातील मौजपुरी पोलीस ठाण्यातील गणपती बाप्पाला आज निरोप देण्यात आला. यावेळी उपस्थित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ढोल ताशाच्या तालावर ठेका धरला.
सत्तांतरानंतर शहाजीबापू पाटील यांचा पन्नास खोके एकदम ओके हा डायलॉग एकदम प्रसिद्ध झाला होता. सत्तांतर होऊन दोन महिन्यांहून अधिकचा काळ लोटला आहे. मात्र, त्यानंतरही याची क्रेझ कमी झालेली नसून, चंद्रपूरमध्ये गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी ‘पन्नास खोके, एकदम ओके’, असे लिहिलेले टी-शर्ट नागरिकांमध्ये आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे.
कोल्हापूर : मिरजकर तिकटी इथं दुपारी अडीचच्या सुमारास गणपती पुढं सोडण्याच्या कारणावरून संतप्त कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. त्यांचा पोलिसांनीही वाद झाला. यामुळं उडालेल्या गोंधळानं परिसरात तणाव निर्माण झाला. याचवेळी काही कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडत आपली नाराजी व्यक्त केली. बाळाचा वापर करत पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
वर्ध्यात नागरिकांचा पर्यावरण पूरक गणपती विसर्जनाकडं कल दिसून येत असून ठिकठिकाणी कृत्रिम हौदाची व्यवस्था करण्यात आली आहे. आर्वी नाका इथं नगरपरिषद आणि ॲक्टिव्ह बडीज क्लबच्या वतीनं आयोजित गणपती बाप्पांसोबत सेल्फी पॉईंटमध्ये अनेक भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पांसोबत फोटो काढण्याचा आनंद घेतला. त्यानंतर कृत्रिम हौदामध्ये बाप्पांच्या मूर्तीचं विसर्जन केलं.
लातूर शहरातील गांधी चौक पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यातील गणेशाचे विसर्जन करण्याच्या मिरवणुकीमध्ये ताशाच्या ठेक्यावर ताल धरलेला पाहायला मिळाला. हे कर्मचारी गणेशाचा विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये आनंद घेत होते. या गणेशाचे विसर्जन झाल्यानंतर हे पोलीस कर्मचारी पुन्हा पहाटेपर्यंत कर्तव्यावर हजर राहणार आहेत.
दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर कोल्हापुरात बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरवात झालीय. आता दुपारपर्यंत तब्बल 90 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे, अशी माहिती कोल्हापूर महापालिकेकडून देण्यात आली आहे.
जळगावात महापालिकेच्या मानाच्या गणपती विर्सजन मिरवणुकीला सुरुवात झालीय. या विसर्जन मिरवणुकीत महापौर जयश्री महाजन यांच्यासोबत महापालिका आयुक्त विद्या गायकवाड, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे सहभागी झाले आहेत. यावेळी ढोल-ताशांच्या तालावर अधिकाऱ्यांनी ठेका धरला.
तब्बल 2 वर्षांनंतर सार्वजनिक गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरी करण्यात येत आहे. अनंत चतुर्दशी दिवशी आज पुण्यात मानाच्या गणपतींची मिरवणूक निघाली. या वेळी अनेक ढोल-ताशा पथकाने लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी वादन केलं. या ढोल-ताशाच्या गजरात लक्ष्मी रोडवरील नागरिकांनी पुरेपूर आनंद लुटला. नाशिक ढोलाच्या तालावर पुणेकरांचे पाय देखील थिरकले.
कोल्हापूर महापालिकेकडून सार्वजनिक गणेश विर्सजन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सार्वजनिक संस्था, तरुण मंडळे व तालीम संस्थांचे अध्यक्षांना पापाची तिकटी इथं प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे व अधिकारी यांच्या हस्ते श्रीफळ, पान, सुपारी अर्पण करण्यात येत आहे.
दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर नाशिकमध्ये बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरवात झालीय. मंत्री गिरीश महाजन यांनी मिरवणुकीचा शुभारंभ गणरायाची आरती करून केला आहे. यावेळी गिरीश महाजन यांनी ढोल वादन केलं. सुरुवातीला नाशिक महानगरपालिकेच्या गणपती बाप्पाला मिरवणुकीच्या अग्रभागी होता. त्यानंतर नाशिक शहरातील मानाचा पहिला गणपती समजला जाणारा रविवार कारंजा मंडळाच्या चांदीच्या गणपतीचा रथ सहभागी झाला होता.
नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून शहरातील प्रमुख 15 गणेश विसर्जन ठिकाणी वैद्यकीय पथकांचा सुसज्ज रुग्णवाहिका ठेवण्यात आले आहेत, तसेच गोदा घाटासह शहरातील इतर घाटांवर जीव रक्षक अग्निशमन दल आपत्ती व्यवस्थापना आणि सुरक्षा पथकासह वैद्यकीय पथक नेमण्यात आलं आहे.
गणेश चतुदर्शीच्या निमित्तानं बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आता कोणीही गणपती विसर्जन करणार नाही याची खबरदारी घ्या, असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं जारी केले आहेत. जर कोणीही दहिसर नदीत गणपती विसर्जनाचा प्रयत्न केल्यास वन विभागाच्या अधिकाऱ्यांना योग्य ती कारवाई करण्याचे स्वातंत्र्य राहिलं, असंही न्यायालयानं नमूद केलंय.
औरंगाबादमध्ये गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीला सुरवात झालीय. यावेळी अनेक राजकीय नेत्यांची या मिरवणुकीत सहभाग पाहायला मिळत आहे. तर, गणपती मिरवणुकीत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी ढोल वाजवण्याचा आनंद लुटल्याचं पाहायला मिळालं.
कोल्हापूर : दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधांनंतर राज्यसह कोल्हापुरात गणपती विसर्जनाला उत्साहात सुरूवात झालीय. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या स्नुषा मधुरीमाराजे यांनीही गणेशोत्सव मिरवणुकीत लेझीम खेळाचा आनंद घेतला. मधुरीमाराजे या माजी आमदार मालोजीराजे यांच्या पत्नी आहेत.
मुंबई - लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला असून वाजत-गाजत राजाच्या मिरवणुकीला सुरुवात झालीय. यावेळी भक्तांमध्ये उत्साह पहायला मिळतोय.
नागपूर : शहरातील फुटाळा, सोनेगाव, सक्करदरा, गांधीसागर, नाईक तलाव, लेंडी तलाव, पोलिस लाईन टाकळी यासह सर्वच तलावांमध्ये विसर्जनास पूर्णत: बंदी आहे. या सर्व ठिकाणी मनपाद्वारे लोखंडी टँकची व्यवस्था करण्यात आलीय. कृत्रिम टॅंकच्या ठिकाणी विसर्जनासोबतच निर्माल्य संकलनासाठी निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. कृत्रिम टॅंकच्या ठिकाणी मजबूत लोखंडी बॅरिकेटिंग करण्यात येत आहे. याशिवाय विसर्जन परिसरात हायमास्ट लाईट लावण्यात आले आहेत.
बोरीवली पूर्व इथल्या मागाठाणे परिसरात विराजमान झालेल्या 'उपनगरचा राजा' ची विसर्जन मिरवणूक सुरू झालीय. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना भक्त आणि कार्यकर्ते भावूक झालेले पाहायला मिळत आहेत.
दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधांनंतर राज्यसह पुण्यात गणपती विसर्जनाला उत्साहात सुरूवात झालीय. पुण्यातील मंडई परिसरात असलेल्या टिळक पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झालीय. पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला पालकमंत्र्यांनी पुष्पहार अर्पण करून विसर्जनला सुरूवात होण्याची परंपरा आहे. त्यात भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मंडईतील टिळक पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आल्याने पालकमंत्रीपदाची माळ चंद्रकांत पाटलांच्याच गळ्यात पडणार असल्याची चर्चा सुरू झालीय.
कोल्हापूर शहरामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झालाय. शहरातील पहिल्या मानाचा बाप्पा असलेल्या तुकाराम माळी मंडळाचा गणराया विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ केला असून कोल्हापूरमध्ये कळीचा मुद्दा असलेल्या हद्दवाढीवरून या मंडळानं केलेला बुलेटस्वार गणपती मार्गस्थ झाला आहे. त्यानंतर थोड्याच वेळाच इतर गणेश विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे.
आज गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक आहे. मी आज राजकारणावर काही बोलणार नाही. पण, महाराष्ट्रातील आजचं राजकारण खूप वाईट आहे. ते राज्यासाठी, विकासासाठी नक्कीच चांगलं नाहीय. लोकांना राजकारणाचा कंटाळा येईल इतके आजचे वाईट राजकारण होत आहे. राजकारण खालच्या पातळीवर आलं आहे. त्याचा स्तर वरती आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. नीलम ताई, चंद्रकांत दादा, दादा भेटले, राजकारण विषयी काही झालं नाही. उत्सवी वातावरण आहे. त्यामुळं राजकीय विषय नको, असं आदित्य ठाकरे यांनी नमूद केलं.
कोल्हापूर शहरात पंचगंगा नदीमध्ये आतापर्यंत एकाही मूर्तीचं विसर्जन होऊ देण्यात आलेलं नाही. भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मनपा प्रशासनाकडून आजही विसर्जन कुंडाची सोय करण्यात आलीय.
राज्यातील गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण झाली असून मुंबई पुण्यात मानाचे गणपती विसर्जनासाठी बाहेर पडले आहेत. तर औरंगाबादमध्येही आता विसर्जन मिरवणूकीची तयारी सुरुय. शहराचे ग्रामदैवत संस्थान गणपती मंदिरात शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते आरती करण्यात येत आहे.
कोल्हापूर : श्रद्धा, भक्ती भाव मनी घेऊन आलेल्या हजारो भक्तांच्या उपस्थितीत सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीस आज दिमाखात सुरुवात झाली. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते मिरवणुकीतील मानाच्या तुकाराम माळी गणेश उत्सव मंडळाच्या श्री गणेशाचे पूजन झाले. त्यानंतर पारंपारिक वाद्यांच्या गजरात पालखीतून श्री गणेश विसर्जनासाठी मार्गस्थ झाले.
कोल्हापुरातील पहिला मानाचा गणपती तुकाराम माळी मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या उपस्थितीत विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.
सोलापूर : आज अनंत चतुर्दशी आहे. आज लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याचा दिवस आहे. यानिमित्त राज्यभरात भव्य अशा विसर्जन मिरवणुकांचं आयोजन करण्यात येतं. या मिरवणुका शांततेत पार पडाव्यात. मिरवणुकीदरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तगडा पोलीसबंदोबस्त तैनात करण्यात येतो. सोलापूर (Solapur) शहरात देखील विसर्जन मिरवणुकांसाठी पोलीस आणि महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. सोलापूर शहरात अनंत चतुर्दशीनिमित्त तब्बल 2080 पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
पुण्यातील गणेशोत्सवाच्या सार्वजनिक मिरवणुकीला काही वेळात सुरुवात होणार आहे. मिरवणुकीसाठी पुण्यातील लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ भव्य रांगोळी साकारण्यात आलीय. राष्ट्रीय कला अकादमी (न्यास) यांच्यातर्फे ही रांगोळी साकारण्यात आलीय. सक्सेस, डिप्रेशन, एज्युकेशन या थीमवर अकादमीकडून 30 फूट रांगोळी साकारली गेली आहे.
आज विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आलीय. यामध्ये भाजीपाला, दूध, ब्रेड आणि बेकरी पदार्थ वाहून नेणारी वाहने, पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, पेट्रोल, डिझेल, केरोसीन टँकर्स तसेच रुग्णवाहिका, शासकीय आणि निमशासकीय वाहने, स्कूल बस यांना सूट देण्यात आलीय.
कोल्हापूर शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपती बाप्पांचे विसर्जन कशा पद्धतीने होणार याबाबत पोलिस प्रशासन आणि गणेश मंडळाचे प्रतिनिधी यांच्यामध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्ये तीन मार्गांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. शाहू स्मारकमध्ये झालेल्या या बैठकीसाठी शेकडो मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांनी तीन मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. खासबाग मैदान, मिरजकर तिकटी, बिनखांबी, महाव्दार रोड, पापाची तिकटी, गंगावेस, रंकाळा टॉवर, क्रशर चौक याशिवाय सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, गोखले कॉलेज, हॉकी स्टेडियम, संभाजीनगर चौक, क्रशर चौक, इराणी खाण, उमा टॉकीज, काॅमर्स कॉलेज, बिंदू चौक, शिवाजी चौक, पापाची तिकटी, गंगावेस, रंकाळा टॉवर, क्रशर चौक असा मार्ग असणार आहे.
मुंबईत लालबाग, परळ परिसरात अनेक मोठी गणेशोत्सव मंडळ आहेत. लालबागचा राजा, मुंबईचा राजा, गिरगावचा राजा, खेतवाडी, चिंतामणी अशा सर्व गणपतींची आज भव्य विसर्जन मिरवणूक निघणार आहे.
पुणे : आज अनंत चतुर्दशी आहे. मनाच्या गणपतीची मिरवणूक आज निघते. लोकमान्य टिळकांचा गणपती म्हणून ओळख असलेल्या केसरी वाड्यात आज मी आरतीला आलो असून पुण्यातील सार्वजनिक मिरवणुकीत आज मी सहभागी होणार असल्याची माहिती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.