Ganpat Gaikwad Firing
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात केलेल्या गोळीबारामुळे महाराष्ट्रातील जंगलराजवर शिक्कामोर्तब झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी शनिवारी केली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी करताना म्हटले आहे की, महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही, कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. सत्ताधारी पक्षाचे आमदार पोलिस ठाण्यामध्येच गोळीबार करत आहेत यावरून महाराष्ट्रात जंगलराज आल्याचे स्पष्ट होत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांचा पोलिसांवर प्रचंड दबाव असून कायद्याने काम करु दिले जात नाही. आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. त्यामुळे त्यांच्यात थोडीशी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.
"या प्रकरणाने भाजपचा बुरखा फाडला गेला आहे. पोलीस ठाण्यातच गोळीबार करण्याची हिम्मत ही सत्तेचा माज दाखवते, हे कसले रामराज्य?’’ असा सवाल करून पटोले यांनी म्हटले आहे की, गणेशोत्सवाच्या काळात सत्ताधारी पक्षाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला, त्यांच्यावर कारवाई झाली नाही. उलट सरकारने त्यांना सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदावर बसवले. पुण्यातील भाजप आमदार सुनील कांबळे यांनी पोलिसाला मारहाण केली.
"पोलीस आपले काहीच वाकडे करु शकत नाहीत, आपला बॉस ‘सागर’ बंगल्यावर बसला आहे’ अशी मग्रुरीची भाषा सत्ताधारी पक्षाचा आमदार करतो. गुन्हेगारांचा बाप ‘सागर’ बंगल्यावर बसला आहे का?. सत्ताधारी पक्षाचा एक आमदार मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मागासवर्गीय मंत्र्यांच्या कंबरेत लाथ घालण्याची भाषा करतो. हे सर्व चित्र पाहता राज्यात गुंडशाही माजली असल्याचे दिसत आहे", अशी टीका पटोले यांनी केली आहे. `
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांच्या राजीनाम्याची करताना म्हटले आहे की, भाजपकडे कोणतीही नैतिक राहिली नाही. पोलिस ठाण्यात गोळीबार करण्याची ही कोणती सत्तेची मस्ती आहे?
भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या वक्तव्यामुळे अपात्र महायुतीचे भयंकर रूप जनतेसमोर आले आहे, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. सुसंस्कृत महाराष्ट्राचा महायुतीने युपी, बिहार करून ठेवला आहे. सत्ताधारी आमदार पोलिस ठाण्यात गोळीबार करत आहेत. सत्ताधारी आमदार पोलिसांवर हात उचलत आहेत. सत्तेचा माज, बंदुकीचा वापर, बदल्याचे राजकारण या सगळ्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
वडेट्टीवार पुढे म्हणाले की, महायुतीत शीतयुद्ध सुरूच आहे. निवडणुका जवळ येतील तसे, यांचे आपापसातील वाद उफाळून येतील. पैसे कमावणे आणि जमीन हडपणे हा भू-माफियांचा उद्योग तेजीत आहे. अशा उद्योगांना राजाश्रय मिळतो हे गंभीर आहे. एकीकडे सरकारने गुंड पोसायचे आणि दुसरीकडे मात्र केंद्रीय तपास यंत्रणा विरोध करणाऱ्यांच्या मागे लावायच्या. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला या अपात्र महायुतीचे भयंकर रूप लक्षात आले आहे.’
सरकार गुन्हेगारांना पोसतोय- राऊत
शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) खासदार संजय राऊत यानीही सरकार गुन्हेगारांना पोसत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, ‘मुंबई, पुणे, कोल्हापूर इथल्या तुरुंगातल्या गुन्हेगारांना जामिनावर बाहेर काढले गेले आहे. मी सगळ्यांची नावंही देऊ शकतो. हे सगळे फक्त राजकारणासाठी चालले आहे. एका गुंडाचा पुण्यात खून झाला. मुंबईत तेच सुरु आहे. गुंड टोळ्यांच्या हाती कायदा दिला आहे. तुम्ही सांगाल तो कायदा आम्हाला निवडणूक जिंकून द्या, असं चाललं आहे. महेश गायकवाड यांच्यावर आमदाराने केलेला गोळीबार धक्कादायक आहे.’
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.