सोलापूर : वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांकडे परवाना (लायसन) नसल्यास आता तब्बल दहा हजारांचा दंड भरावा लागणार आहे. दुसऱ्या व्यक्तीचे वाहन त्रयस्थ व्यक्ती चालवित असल्यास त्या व्यक्तीला आणि मूळ मालकाला प्रत्येक पाच हजारांचा दंड केला जात आहे. अल्पवयीन मुलाच्या ताब्यात वाहन देणाऱ्या पालकांविरूध्द पोलिसांत गुन्हा दाखल होईल, असा इशारा आरटीओ अधिकाऱ्यांनी दिला आहे.
वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करण्याबरोबरच वाहनाची कागदपत्रे (विमा, परवाना, पीयूसी, आरसी बुक) असणे बंधनकारक आहे. दुचाकीस्वारांना हेल्मेटचे तर चारचाकी चालकांना सीटबेल्टचे बंधन घालण्यात आले आहे. राज्यात दरवर्षी जवळपास ३६ ते ३८ हजार अपघात होतात आणि त्यात तब्बल १४ ते १६ हजार जणांचा मृत्यू होतो. हे प्रमाण मागील चार-पाच वर्षांपासून कायम आहे. सोलापूर शहर-जिल्ह्यात सर्वाधिक ५३ अपघातप्रवण ठिकाणे असून जिल्हाभरात दरवर्षी जवळपास साडेपाचशे ते सहाशे जणांचा मृत्यू होत आहे. वाहनांचा अतिवेग व लेनकटिंग हे त्यामागील प्रमुख कारण आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन आयुक्तालयाने बेशिस्त वाहनांचा दंड वाढविला आहे. तरीपण, अपघाताचे प्रमाण अपेक्षेप्रमाणे कमी झालेले नाही, हे विशेष. त्यामुळे आता बेशिस्तांवर मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. १५ सप्टेंबरनंतर रिक्षाच्या उजव्या दरवाजातून प्रवाशांना चढता-उतरता येणार नाही. रहदारीच्या बाजूचा दरवाजा बंद करावा, असे आवाहन आरटीओने रिक्षाचालकांना केले आहे. अपघात कमी व्हावेत, हा त्यामागील हेतू आहे.
फिटनेस नसलेल्यांना चार हजारांचा दंड
आठ-दहा वर्षांनी प्रत्येक वाहनाकडे फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक आहे. सोलापूर शहर-जिल्ह्यात सध्या १८ लाखांहून अधिक वाहने आहेत. त्यातील बहुतेक वाहनांकडे फिटनेस प्रमाणपत्रच नाही. वर्षानुवर्षे त्याच जुन्या गाड्यांतून प्रवासी व मालवाहतूक केली जात आहे. आता अशा वाहनांना प्रत्येकी चार हजारांचा दंड आकारला जाणार आहे. हेल्मेट नसलेल्यांनाही एक हजाराचा दंड भरावा लागणार आहे.
दंड न भरल्यास वाहन जमा केले जाणार
पालकांकडून अनेक अल्पवयीन मुलांच्या हाती वाहने दिली जातात. वाहन चालविण्याचा परवाना असल्याशिवाय वाहन चालवता येत नाही. तरीपण, तशा व्यक्तींकडे वाहन दिसल्यास त्यास दहा हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. दंड न भरल्यास ते वाहन जमा केले जाणार आहे.
- विजय तिराणकर, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.