१७ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सोडवण्यासाठी शिष्टाईची भूमिका घेणारे गिरीश महाजन हे संकटमोचक म्हणून प्रसिद्ध आहेत. कारण कुठलाही मोर्चा असो वा छोटमोठं आंदोलन असो, त्यात भाजप पक्ष असो वा फडणवीसांचं सरकार, आंदोलकांसोबत चर्चेसाठी कायम महाजनांनाच पुढे केलं जातं. आता याच महाजनांना संकटमोचक का म्हटलं जातं, तेच जाणून घेऊयात...
गिरीश महाजन, भाजपाचे संकटमोचक अशी प्रतिमा आणि ओळख आहे. राज्यात कुठेही सरकारवर संकट आले, तर संकटमोचक म्हणून महाजनांची नेमणूक होते. मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणारे, पोलिसांच्या राड्यामुळे राज्यभरात चर्चेत असलेलं आंदोलन म्हणजे जालन्यातल्या मनोज जरांगेंचं आंदोलन. या आंदोलनात सरकारच्या बाजूनं शिष्टाई करण्यातही गिरीश महाजन अग्रस्थानी होते.
आता महाजन म्हणजे जळगावच्या जामनेर मतदारसंघातून सहावेळा निवडून आलेले आमदार. महाविद्यालयीन काळातच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सुरु झालेला त्यांचा राजकीय प्रवास मंत्रिपदापर्यंत व्हाया जामनेरचे सरपंच, आमदार असा झाला.
१९९५ साली भाजपाकडून पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढले आणि ईश्वरलाल जैन यांना पराभूत करुन विजयीसुद्धा झाले. त्यामुळे १९९५ पासून अगदी आतापर्यंत महाजन हे जामनेरचे आमदार म्हणून निवडून येतात. २०१४ साली युतीचं सरकार आलं त्यावेळी जलसंपदा खात्याचं काम त्यांनी पाहिलं. २०१४ ते २०१९ या काळात भाजपाच्या अनेक राजकीय रणनीतींमध्येही त्यांनी मोलाची भूमिका बजावली. विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना भाजपाच्या गळाला लावण्यातही ते यशस्वी ठरले. मग राधाकृष्ण विखे पाटील असो, हर्षवर्धन पाटील असो... त्यामुळे गिरीश महाजन महाराष्ट्र भाजपातलं आणि फडणवीसांच्या जवळचं मानलं जाणारं एक मोठं Asset आहे.
महाजनांकडे एखादी जबाबदारी सोपवली की विजय निश्चित आहे, अशी भाजपाला खात्री असते. त्यामुळे २०१४ च्या फडणवीस सरकारच्या काळात मुंबईत आलेला शेतकरी-शेतमजूर मोर्चा, मराठा क्रांती मोर्चा, ऐन दिवाळीतलं एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन असो, या सर्व आंदोलनांमध्ये महाजनांची समन्वयकाची भूमिका होती.
याशिवाय, २०१८ साल असो, २०१९ असो वा २०२० या तीनही वर्षी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण केलं. त्या प्रत्येक आंदोलनात सरकारकडून अण्णांची मनधरणी करण्यासाठी महाजन कधी राळेगणसिद्धीत पोहचले तर कधी दिल्लीत... त्यामुळे अण्णांनी आपलं उपोषण मागे घेण्यातही महाजनांनी त्या त्या वेळी खारीचा वाटा उचलला होता.
गेल्या वर्षी राज्यसभेच्या निवडणुकीवेळी देवेंद्र फडणवीस कोरोनाबाधित होते, त्यामुळे ते होम क्वारंटाईन असतानाही आमदारांशी चर्चेची जबाबदारी महाजनांच्या खांद्यावर होती. आणि त्यातही ते यशस्वी झालेले दिसले. त्यामुळे गिरीश महाजनांनी कायमच पक्ष असो, फडणवीस असो वा राज्यातलं त्यांचं सरकार असो, त्यांना दिलेली जबाबदारी कायम यशस्वीरित्या पार पाडलेली दिसते.
अगदी आताचं जरांगेंच्या आधीचं सांगायचं झालं तर, जुलै महिन्यात रायगडमधील इर्शाळवाडीत जेव्हा दरड दुर्घटना घडली, तेव्हाही सर्वात आधी ग्रामविकासमंत्री म्हणून गिरीश महाजन थेट घटनास्थळी पोहचले होते. तिथे जाऊन सर्व प्रशासकीय मदतीवर आणि कारभारावर नजर ठेवून होते. त्यामुळे तेव्हाही शासन लोकांच्या दु:खात तिथं पोहचलं असून त्यांना सर्वतोपरी मदत करत असल्याची जाणीवही महाजनांनी आपल्या उपस्थितीतून दाखवून दिली.
महाजन ही व्यक्ती अशी आहे, जी राजकारणापलीकडे लोकांच्यात मिळून मिसळून काम करत असते. लोकांच्या सुख-दु:खात सहभागी होणं, कुठेही अपघात झाला तर तात्काळ धावून जाणं आणि मदत करणं यासाठी ते कायम लोकप्रिय राहिलेत. त्यामुळे त्यांचा लोकात मिसळून काम करण्याचा स्वभावच त्यांच्यासाठी कायम उजवी भूमिका बजावतो, असंही म्हटलं जातं.
आता संकटमोचक संबोधलं जाण्याविषयी जळगावातल्या एका कार्यक्रमात अवधूत गुप्तेनं थेट महाजनांना विचारलं असता, ते म्हणतात- प्रत्येक वेळी माझा मोठा हात आहे असं म्हणता येणार नाही, मात्र मी खारीचा वाटा उचलत असतो. कारण, मराठा मोर्चा असो वा कुठलाही मोर्चा असो, मोठं आंदोलन असो, त्याला मी सामोरा जातो. कारण देवेंद्र फडणवीस यांचा तसंच पक्षाचा माझ्यावर मोठा विश्वास आहे. यामुळेच मला ट्रबल शूटर ऑफ बीजेपी असंही म्हटलं जातं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.