सोलापूर : ग्लोबल पुरस्कार मिळण्यापूर्वीचे रणजितसिंह डिसले आणि आताचे ग्लोबल टिचर डिसले, यात खूप फरक जाणवत आहे. वरिष्ठांच्या परवानगीशिवाय काहीही न करणारे डिसले ग्लोबल झाले आणि ते अधिकाऱ्यांचे कॉल न घेता परस्पर राजकीय नेत्यांसह सरकारमधील मंत्र्यांच्या भेटी घेऊ लागले. फुलब्राईट शिष्यवृत्तीच्या रजेचा अपूर्ण अर्ज असो वा आता परस्पर गैरहजर राहिल्याने चौकशी समित्यांच्या अहवालानुसार उघड झालेली चूक असो, त्यासाठी त्यांनी राजकीय आधार घेण्याचाच प्रयत्न केल्याचे दिसून आले. अगोदर भावनिक तर आता राजीनामा, असे अस्त्र त्यांनी वापरल्याचीही चर्चा आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतरही ठोस आश्वासन न मिळाल्याने डिसले गुरुजींनी अद्याप राजीनामा मागे घेतलेला नाही.
जिल्हा परिषदेच्या परितेवाडी (ता. माढा) शाळेवर उपशिक्षक म्हणून काम करताना रणजितसिंह डिसले यांची धडपड पाहून त्यांच्याकडे प्रभारी मुख्याध्यापकाचा पदभार सोपविला गेला. सर्वकाही सुरळीत सुरु असतानाच गुरुजींनी वरिष्ठांच्या परवानगीशिवाय ग्लोबल पुरस्कारासाठी अर्ज केला. त्यांना पुरस्कारही मिळाला, पण पुरस्कारासाठी त्यांनी रितसर रजा किंवा परवानगी मागणे अपेक्षित होते. त्यांनी तसे काहीच न करता प्रतिनियुक्तीवर असताना त्यांनी ग्लोबल पुरस्काराचेच काम केले. हे प्रकरण आता त्यांच्या अंगलट आले आहे. त्यांचे काम पाहून त्यांना निश्चितपणे वरिष्ठांकडून परवानगी मिळाली असती. परंतु, त्यांनी तसे काहीच केले नाही. तत्कालीन शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी एक समिती नेमून त्यांच्या प्रतिनियुक्ती काळातील तीन वर्षांची चौकशी केली. त्यानंतर दुसरी समिती नियुक्त करून त्या अहवालाची खातरजमा करण्यात आली. दोन्ही अहवालात ते जवळपास ३२ महिने गैरहजर राहिल्याची बाब समोर आली. आपल्यामागे लागलेला चौकशीचा ससेमिरा कारवाईशिवाय थांबणार नाही, याची जाणीव त्यांना झाली. त्यामुळे त्यांनी ७ जुलैला शिक्षकपदाचा राजीनामाच दिला. वास्तविक पाहता आतापर्यंत अनेक शिक्षकांनी राजीनामे दिले, पण त्याची कुणकूण कोणालाही लागत नव्हती. डिसले गुरुजींनी राजीनामा दिला आणि ती बाब सर्वांनाच समजली, आता ही बाब कशी बाहेर आली, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. पण, जिल्हा परिषद शाळेतील ग्लोबल टिचरने राजीनामा दिल्यानंतर निश्चितपणे वरिष्ठांकडून सहानुभूती मिळेल, असाही डिसलेंना विश्वास होता. त्यांना थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईला बोलावले आणि त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही भेटता आले. त्यांच्यासमोर भावनिक झालेल्या डिसलेंना राजीनामा देऊ नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे तोंडी आश्वासन त्यांना मिळाले. पण, दोन्ही चौकशी समित्यांच्या अहवालानुसार त्यांचे वर्तन चुकीचेच होते हे उघड झाल्यानंतर डिसलेंची चूक माफ केली जाणार का, हाही प्रश्न आहे.
दरेकरांनी दिली होती विधानपरिषदेची ऑफर
काही अधिकाऱ्यांनी आपल्याकडे पैसे मागितले, असा आरोप केलेल्या डिसलेंनी काही दिवसांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे माफीनामा दिला. काही अधिकाऱ्यांकडून जाणिवपूर्वक त्रास दिला जात असल्याने डिसलेंनी राजीनामा दिल्याचीही चर्चा झाली. पण, डिसलेंना ग्लोबल पुरस्कार मिळाल्यानंतर विधान परिषदेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी त्यांची भेट घेऊन विधानपरिषदेची ऑफर दिली होती. त्यावेळी तशी चर्चाही झाली. विशेष बाब म्हणजे राज्यात सत्तांतर झाल्यानंतर डिसलेंनी राजीनामा दिल्याने त्यांच्याबद्दल आता राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
८ ऑगस्टला राजीनामा मंजूर होणार का?
रणजितसिंह डिसलेंनी ७ जुलैला माढ्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे राजीनामा सोपविला. त्यात त्यांनी कोणतेही कारण नमूद न करता वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. राजीनामा मागे घेण्यासाठी ८ ऑगस्टपर्यंत मुदत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही डिसले गुरुजींनी अद्याप राजीनामा मागे घेतलेला नाही. दुसरीकडे चौकशी समितीने त्यांच्यावर ठपका ठेवलेला असताना त्यांचा राजीनामा मंजूर होऊ शकतो का, असाही प्रश्न आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.