काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या सदस्यत्व, नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये मोठी खळबळ माजलेली. हे प्रकरण ताजं असतानाच आता गोव्यातही काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गोव्यातील ११ पैकी ८ आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंदशेट तनावडे यांनी दिली. त्यामुळे काँग्रेसचे दोन तृतीयांश आमदार पक्ष सोडणार असल्यानं काँग्रेसचं गोव्यातलं भवितव्य अंधारात दिसतंय. तर तिकडे भाजपच्या मिशन लोटसला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय हे नक्की.
माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, मायकल लोबो यांच्यासह ८ आमदारांनी बुधवारी सकाळी बैठक घेतली आणि यावेळी काँग्रेस सोडीचा निर्णय घेतला. आता हा आमदारांचा गट भाजपात विलीन होणार आहे. या आमदारांनी भाजपात विलीनीकरणासंदर्भात विधानसभेच्या सचिवांनाही पत्र दिलं आहे.
काँग्रेसचे हे आमदार भाजपच्या वाटेवर!
1) मायकल लोबो (माजी विरोधी पक्षनेते)
2) दिगंबर कामत,
3) डिलायला लोबो
4) राजेश फळदेसाई,
5) रुदाल्फ फर्नांडिस,
6) अलेक्स सिक्वेरा,
7) केदार नाईक,
8) संकल्प आमोणकर
दरम्यान, या आमदारांच्या पक्षबदलामुळे गोव्यातील सत्तासमीकरण बदलणार आहे. काँग्रेसचं गोवा विधानसभेतलं संख्याबळ आता फक्त ३ आमदार इतकंच होईल, तर विरोधकांच्या आमदारांची संख्याही ७ होणार आहे. काँग्रेसच्या ८ आमदारांच्या पक्षप्रवेशानंतर भाजपचं संख्याबळ २० वरुन २८ वर जाईल आणि आपल्या माहितीसाठी गोवा विधानसभेचं आमदारांचं एकूण संख्याबळ ४० आहे. त्यामुळे भाजपचं गोव्यातलं मिशन लोटस चांगलंच यशस्वी झालेलं दिसतंय.
एकीकडे काँग्रेस पक्षाविरोधातलं वातावरण बदलण्यासाठी आणि पक्षाला उभारी देण्याच्या हेतूनं राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसची भारत जोडो यात्रा तमिळनाडूतून सुरु झाली आहे. पण, ही यात्रा सुरु असतानाच गोव्यात भाजपनं काँग्रेसला मोठा दणका दिलाय. दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वीच मायकल लोबो यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर मायकल लोबो, दिगंबर कामत आणि आठ आमदार जुलै महिन्यातच भाजपात प्रवेश करणार होते. पण तेव्हा, काँग्रेसने कामत आणि लोबो यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कारवाईची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली होती. आणि त्याचवेळी, काँग्रेसने लोबो यांची विरोधी पक्षनेते पदावरून हकालपट्टी देखील केली होती. अखेर बुधवारी सकाळी लोबो यांनी समर्थक आमदारांसोबत बैठक घेऊन काँग्रेस पक्षसोडीचा निर्णय घेतलाय. आणि त्यांनी आपण काँग्रेस छोडो, बीजेपी जोडो अशी मोहीम सुरु केल्याचं कलंगुटचे आमदार मायकल लोबोंनी म्हटलंय.
तर, काँग्रेस पक्षाला सोडून भाजपची वाट धरलेल्या ८ आमदारांवर विरोधकांनी सडकून टीका केली आहे. ज्या आठ आमदारांनी सर्व राजकीय औचित्य, मूलभूत शालीनता आणि प्रामाणिकपणा विरोधात जाऊन संपत्तीचा लोभ आणि सत्तेची भूक भागवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. त्यांचा हा निर्णय म्हणजे निव्वळ निर्लज्ज स्वार्थ, लालसा आणि लबाडीचे प्रदर्शन आहे, अशा शब्दात गोवा फॉरवर्ड पार्टीच्या विजय सरदेसाईंनी घणाघात केलाय.
तर तिकडे गोव्यातील काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीपुरता अल्पसंख्याकाचा उपयोग करुन अन्याय केला आहे. अशा स्वार्थी पक्षावर यापुढे विश्वास ठेवणं मुश्कील असल्याने गोवा काँग्रेस प्रदेश अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदासोबतच काँग्रेसच्या सदस्यत्वाचाही राजीनामा देत असल्याची माहिती नजीर खान यांनी दिली आहे. शिवाय, राज्यातील जनतेनं निवडून दिले असतानाही आता ११ पैकी ८ आमदारांनी स्वार्थापोटी दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. याचा पक्षश्रेष्ठींनी विचार करुन कारवाई करण्याची मागणीही नजीर खान यांनी केली.
शेवटी कसंय ना, काँग्रेसचं देशातलं चित्र धूसर होत चाललंय. ज्यावर गुलाम नबी आझाद यांच्यासह जी २३ गटानं वारंवार बोट ठेवलं होतं. राहुल गांधींच्या नेतृत्वावरही सवाल उपस्थित केले होते. अशातच भाजप नेत्यांकडून देशात एकमेव भाजप पक्षच राहिला पाहिजे आणि काँग्रेसमुक्त भारत या मिशनवरही खोल प्रयत्न केले जात असल्याचं आता स्पष्ट दिसतंय. महाराष्ट्रातही भाजपनं शिवसेनेत फूट पाडून सत्तांतर घडवून आणलं. त्यानंतर आता भाजपनं गोव्यातील विधानसभा निवडणुकीला ५ महिने पूर्ण होत नाही तोवर आपलं गोव्यातलं मिशन लोटस पुन्हा कार्यान्वित केलं आणि तितकंच यशस्वी राबवलेलंही दिसतंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.