पुढाऱ्यांचा एक वेगळाच बिग बॉस सुरु झाला होता. दिल्लीत बसून बिग बॉस आदेश देत होते. शोच्या टीमने घरामध्ये राहण्यासाठी खासम्-खास लोक निवडले होते.. मातब्बर गडावर एकटे पडलेले उधारराजे, त्याच गडावरुन सैन्याला पळवून नेऊन ठाण्यात वेगळाच गड स्थापन केलेले नाथाभाई दाढीवाले, लाडक्या दादावर प्रेम असलेल्या हळूवार मनाच्या बारामतीच्या सुपरफास्ट ताई, एक लढाई जिंकून जग जिंकल्याचा आव आणणारे नानाबुवा पाटील; पुढे काय होईल, या भीतीने गर्भगळीत झालेले देवाभाऊ फडफडे... हे स्पर्धक सहभागी झाले होते.
या सगळ्यांनंतर खास एन्ट्री झाली ती दादाराव दणगटेंची. बिग बॉसच्या घरात येण्यासाठी त्यांनी खास गुलाबी रंगाचं जॅकेट शिवून घेतलं होतं. त्यांना असं रंगवून पाठवणाऱ्या टेलरचीच जास्त चर्चा होती. दादा येताच गुलाबी साडी गाणं वाजलं. पण यावेळी दादा खेकसले नाहीत तर गालातल्या गालात लाजले. घरात सगळ्यात शेवटी आणि अनपेक्षित एन्ट्री झाली ती काका बारामतीकरांची. हे कुणालाच ठाऊक नव्हतं. अगदी बिग बॉसलाही माहिती होतं की नाही, ही शंकाच आहे.
सकळाचे ११ वाजले होते. घरामध्ये बिग बॉसचा आवाज घुमला. ''बिग बॉस आदेश देतात की- घरातील सर्व सदस्यांनी लिव्हिंग रुममध्ये जमायचं आहे. आपल्याला एक टास्क देण्यात येतोय. आपल्या विरोधकाने आजवर कोणती चांगली कामं केली, त्यांच्यातले चांगले गुण आणि त्यांचा राजकीय प्रवास यावर भरभरुन बोलायचं आहे. लक्षात घ्या की तुमच्या मनाच्या मोठेपणावर आणि चातुर्यावर यावेळची बिग बॉस विधानसभा ट्रॉफी तुम्हाला मिळणार आहे.. आणि या खेळाचे संचालक असतील ज्येष्ठ सदस्य काका बारामतीकर.'' बिग बॉसचा आदेश आला होता.
बिग बॉसचा आवाज ऐकून काका बारामतीकर चमकले. त्यांना तो आवाज कुठेतरी ऐकल्यासारखा वाटत होता. कितीही बेस दिला, फिल्टर लावला तरी अनुभवाच्या जोरावर काकांनी बिग बॉसचा तो आवाज हेरला. पण स्वभावाप्रमाणे ते काहीच बोलले नाहीत. सर्व पुढारी सदस्य लिव्हिंग रुममध्ये जमले. सुरुवातीला उधारराजेंनी नाथाभाईंवर बोलावं, असा आदेश आला.
उधारराजेंची खास टोमणे शैली सुरु झाली, ''नाथाभाई म्हणजे लाडक्या बहिणींचा भाऊ.. दीड हजारात काय होत नाही? सगळं होतं. जुहू चौपाटीवर एक इमारतही बांधून होईल.. रोज फाईव्ह स्टारमध्ये जेवण होईल, उद्योग-धंदे वाढतील.. राज्यात पैसाच पैसा होईल... एवढंच काय तर लाडक्या भावांनाही जॉबच जॉब मिळतील. जिकडे बघावं तिकडे जॉब. बेरोजगारी हासुद्धा एक जॉबच आहे.. दोन-चार महिन्यात कळेत तुम्हाला काय असते बेरोजगारी! त्यामुळे नाथाभाई एक यशस्वी राज्यप्रमुख आहेत.
हे ऐकून नाथाभाई दाढीतल्या दाढीत हसले. उत्तर देण्यासाठी उठणार तेवढ्यात गुलाबी जॅकेटात बसलेले दादाराव दणगटे तावातावाने उठले. बिग बॉस हे चुकीचंय. लाडक्या बहिणीचा आणि नाथाभाईंचा काय संबंध? सगळंच त्यांना दिल्यावर आम्ही काय निस्ते जॅकेटं घालून फिरायचं का? लाडक्या बहिणीला मी पैसे देतोय.. म्हणून ती आज सुखी-संपन्न-समाधानी-आनंदी झालीय. उधारराजे जरा माहिती घेऊन बोलत जा.
''त्यासाठी त्यांना घराबाहेर पडावं लागेल.. कष्ट पडतील मग'' मध्येच नाथाभाई बोलते झाले. ''त्याचं कसंय ना.. माणसाची गुणवत्ता ही त्याच्या मेरिटवर असते. आणि म्हणून हे जे मेरिट आहे त्याची गुणवत्ता सुधारण्याचं काम आमच्या सरकारने केलं आहे. लाडकी बहीण तुझी का माझी, हा प्रश्नच नाहीये..दादा! आपल्या सगळ्यांच्याच सगळ्या बहिणी आहेत. फायदा आपल्यालाच होणार ना त्याचा.. कळलं का? शेवटी योजनेचं पूर्ण नाव काय आहे, हेसुद्धा दादांनी पाहाणं महत्त्वाचं आहे.. असो.'' असं म्हणून नाथाभाई शांतपणे बसले.
संचालक काका बारामतीकर सगळं ऐकत होते. त्यांनी सुपरफास्ट ताईंना आदेश देऊन लाडक्या दादांबद्दल बोलायला सांगितलं. ताई म्हणाल्या, ''अरे कसायस तू.. बरायस ना? उशिरा का होईना पण चुका समजणारा माझा दादा मनाने खूप मोठाय.. त्याच्या मनात जशा लाडक्या मराठी बहिणी आहेत तसेच गुजराती भाऊदेखील आहेत.. त्यांचं ऐकून तो जेकाही करतोय ना ते भव्यदिव्य आहे.. खरंतर त्याची लाडकी भाऊ योजना सुरुय.. तो यशस्वी होवो याच सदिच्छा!''
दादारावांना असला शब्दछळ अजिबात आवडत नाही.. जे काय मनात असेल ते रोखठोक बोलावं, असं त्यांना (पूर्वी) वाटे. म्हणून ते काहीच कळलं नाही असं समजून गप्प बसले. पुढे नानाबुवा पाटील यांनी खास हिंदीमिश्रित नागपुरी शैलीत बोलायला सुरुवात केली. त्यांचा रोख देवाभाऊंकडे होता की उधारराजेंकडे होता? की नाथाभाऊंकडे होता? हे शेवटपर्यंत कुणालाच कळलं नव्हतं.
नानाबुवा म्हटले, मोठमोठे रस्ते बांधता, त्यावर खड्डे करता.. गुणवत्ताच नाही तुमच्यात. घरात बसून कामं केल्यावर दुसरं काय होणार? लोकांनी बघितलंय, लोकांना नकोएत तुम्ही. स्कोर तरी बघा..सांगली-कोल्हापूर बघा. आता तुम्हाला संधी नाही.. देशातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाला प्रमुख दावेदारीची संधी हवीय.. कळलं का? धन्यवाद!
देवाभाऊ फडफडे हळूच उठून सोफ्याआड दडून बसले होते.. कुणाला कळलंच नव्हतं. त्यांच्यातला तो जोश, मुद्दे मांडण्याची हातोटी, तळमळ, चीड, संताप.. हे काहीच दिसत नव्हतं. शक्य तेवढं मागे राहण्याचा ते प्रयत्न करत होते. संचालकांनाही ते दडून बसल्याचं कळलं नाही. त्यामुळे त्यांनी सुपरफास्ट ताई विजयी झाल्याचं घोषित केलं.
उपस्थित सदस्यांनी कल्ला सुरु केला, तेवढ्यात बिग बॉसचा आवाज आला. ''संचालक काका बारामतीकर आपण केवळ संचालक आहात.. आपण निर्णय द्यायचा नव्हता. जरी दिला असला तरी हरकत नाही. कारण आपला निर्णय अंतिम असेल असं आम्ही म्हणालो नव्हतो. त्यामुळे या खेळाचे खरे विजेते आहेत देवाभाऊ फडफडे..''
सर्वांनाच धक्का बसला. त्यांनी बिग बॉसवर प्रश्न उपस्थित केले. त्यावर बिग बॉस बोलले- ''देवाभाऊंनी अत्यंत संयमाने हा खेळ खेळला आहे.. कुणावरही राग नाही की टोमणा नाही.. ना राजकीय महत्त्वाकांक्षा. त्यामुळे या फेरीचे तेच विजेते आहेत. हा बिग बॉसचा निर्णय आहे.. जय गुजरात.. सॉरी सॉरी जय महाराष्ट्र!''
सोफ्याआड दडून बसलेले देवाभाऊ त्वेषाने बाहेर आले आणि त्यांच्या त्या खास भाषणी शैलीत ओरडायला लागले- ''म्हणून मी सांगत होतो.. मीच येणार-मीच येणार! बघा आता पुढे-पुढे काय होतंय ते.'' सगळे सदस्य नाराजीने उठून गेले. काका बारमतीकरांनी बिग बॉसचा तो आवाज दिल्लीतून येतोय, हे हेरलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.