सोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला यंदाच्या हंगामातील सर्वाधिक दर मिळाला असून, सोमवारी (ता. २३) सोलापूर बाजार समितीत कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक पाच हजार ७०० रुपयांचा दर मिळाला आहे. सोमवारी सरासरी दर तीन हजार ७०० रुपयांपर्यंत होता. सोलापूरच्या बाजार समितीत कांद्याची आवक दिवसेंदिवस वाढत आहे. किरकोळ बाजारात कांद्याला ६० रुपये किलो असा दर मिळत आहे.
जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा १० हजार हेक्टरवर कांदा लागवड वाढली असून, सुमारे २५ हजार हेक्टरवर कांदा लागवड झाल्याचे कृषी विभागाकडील आकडेवारीतून स्पष्ट होते. सध्या सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक वाढत असून, सोमवारी बाजार समितीत १८० गाड्यांची (२० गाड्या पांढरा तर १६० गाड्या लाल कांदा) आवक नोंदविली. सध्या नवीन कांदा हा म्हसवड, कर्नाटकातील बागलकोट, विजयपूर येथून येत आहे. तर नगर, पुणे, धाराशिव, लातूर व सोलापूर या जिल्ह्यातून जुना कांदा येत आहे.
सोमवारी पांढऱ्या कांद्याचा किमान दर तीन हजार रुपये प्रतिक्विंटल तर लाल कांद्याला सरासरी भाव तीन हजार ७०० रुपयांपर्यंत मिळाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले. गतवर्षी कांद्याची निर्यातबंदी केल्यानंतर शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले आणि दीड-दोन हजार रुपये क्विंटल दराने कांदा विकावा लागला. अनेकांनी सोलापूर बाजार समितीऐवजी बंगळूरच्या बाजारात कांदा विकला. आता नवीन कांदा बाजारात येत असून, कांद्याचा दर पाच हजारांपर्यंत असल्याने जिल्ह्यात कांदा लागवड वाढत असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांचा खर्च पाहता कांद्याला प्रतिक्विंटल पाच हजार रुपयांचा दर अपेक्षित आहे.
कांद्याच्या रकमेसाठी १५ दिवसांचा धनादेश
मोठा खर्च करून कांदा लागवड करून तो विक्रीसाठी बाजार समितीत आणला जातो. त्यावेळी १५ हजारांहून अधिक रकमेचा कांदा असल्यास त्या शेतकऱ्याला रोखीने बिल दिले जात नाही, अशी वस्तुस्थिती आहे. वास्तविक पणन कायद्यानुसार शेतकऱ्याने विकलेल्या मालाची रक्कम रोखीने देणे आवश्यक आहे. मात्र, त्यादृष्टीने कोणीही अंमलबजावणी करीत नाहीत व त्यासाठी प्रशासकीय अधिकारी देखील लक्ष देत नाहीत, अशीही स्थिती आहे. तो धनादेश घेऊन शेतकऱ्याला पुन्हा बॅंकेत जाऊन हेलपाटा मारावा लागतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.