Gopal Ganesh Agarkar Birth Anniversary : गोपाळ गणेश आगरकर यांची आज जयंती. 39 वर्ष आयुष्य जगलेले आगरकर यांची ओळख पत्रकार आणि समाजसुधारक म्हणून आहे. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सामाजिक जागृती निर्माण करण्यात त्यांचे महत्त्वाचं योगदान आहे. आगरकरांनी 1888 साली 'सुधारक' हे वृत्तपत्र सुरु केले.
याआधी ते टिळकांनी सुरु केलेल्या 'केसरी'चे पहिले संपादक होते. सुधारकमधून त्यांनी व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिवाद, भौतिकता या मुल्यांचा प्रचार केला. सामाजिक समता, स्त्री-पुरुष समानता आणि विज्ञान-निष्ठा ही त्यांची जीवनमूल्ये होती.
मुलींनासुद्धा शिक्षण मिळायला पाहिजे, तसेच त्यांना पुरुषांसारखे समान अधिकार मिळायला हवेत, अशा मताचे ते होते. आगरकरांनी यासंदर्भात एक सविस्तर लेख सुधारकमधून लिहिला होता. यावरुन त्यांच्यावर मोठी टीकाही झाली होती.
तत्कालिन महाराष्ट्राची परिस्थिती पाहता आगरकरांनी मांडलेले विचार खूपच पुरोगामी होते. शिवाय सनातनी लोकांना ते कधीही मान्य न होणारे नव्हते. तत्कालीन समाजाच्या विरोधात जाताना आगरकरांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला.
सनातनी लोकांनी त्यांच्या जिवंतपणीच त्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली होती. असे असले तरी आगरकांनी आपल्या विचारात कधीही मवाळपणा आणला नाही. त्यांनी नेहमीच बुद्धीप्रामाण्यावादाचा हट्ट धरला. बुद्धीला पटेल तेच स्वीकारले पाहिजे अशा मताचे ते होते.
आगरकरांचा प्रवास
आगरकरांची घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. अशा स्थितीत शिक्षण घेण्यासाठी त्यांना बरेच प्रयत्न करावे लागले. त्यांनी छोटी-मोठी काम करतं आणि कधी माधुकरी मागून आपलं मॅट्रिकपर्यंकतचे शिक्षण पूर्ण केले.
मॅट्रिक झाल्यानंतर 1875 मध्ये ते पुढील शिक्षणासाठी पुण्यात आले. या ठिकाणी त्यांनी डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पुण्यात शिक्षण घेताना त्यांना आर्थिक त्रास सहन करावा लागला. वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा यातून मिळालेली बक्षिसं किंवा शिष्यवृत्तीच्या पैशातून त्यांनी दिवस काढले. एम. ए. करत असताना 1879 मध्ये त्यांची आणि लोकमान्य टिळकांची भेट झाली.
आगरकर आणि टिळक यांच्यातील वाद
आगरकर बुद्धिवादाचा आधार घेणारे समाज सुधारक होते. आधी सामाजिक सुधारणा आवश्यक आहेत, तेव्हाच मिळालेल्या स्वातंत्र्याला अर्थ राहीलं असं त्याचं म्हणणं होतं.
दुसरीकडे, राजकीय स्वातंत्र्य अधिक महत्त्वाचं असून ते मिळाल्यानंतर सामाजिक सुधारणा करता येतील, असा टिळकांचा विचार होता.
समाजसुधारणा विरुद्ध राजकीय स्वातंत्र्य याच वादातून 1887 च्या ऑक्टोबरमध्ये आगरकरांनी केसरीचे संपादकत्व सोडलं आणि सुधारक हे वृत्तपत्र सुरु केलं. केसरीमधून मनासारखे मतं मांडता येत नसल्याने त्यांनी केसरीचे संपादकत्व सोडलं होतं.
आगरकर आणि टिळकांमध्ये संमतीवय आणि बालविवाहाच्या प्रश्नावर टोकाचे मतभेद होते. लग्नाच्या वेळेस व्यक्तीचे वय निश्चित करण्यासाठी ब्रिटिश सरकारने कायदा करावा की करू नये असा वाद निर्माण झाला होता. टिळकांचं मत होतं की, ब्रिटिश सरकारने विवाहसंबंधी कायदा करणे म्हणजे अंतर्गत बाबतींत हस्तक्षेप करणे होय.
आगरकराचं मत होतं की, अशा सुधारणा कायद्याद्वारेच केल्या जाऊ शकतात. आगरकर आणि टिळक यांच्यामध्ये मतभेद असले तरी त्यांना एकमेकांबाबत सख्य वाटायचं. टिळक आणि आगरकरांनी लिहिलेल्या काही लेखांमधून स्पष्ट होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.