मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी होणाऱ्या निवडणुकीमध्ये सत्यजीत तांबे हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना नाशिक पदवीधर मतदारसंघातून मिळणारा पाठिंबा वाढत चालला आहे. महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटना (MUST) आणि महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटनेने सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांना या निवडणुकीसाठी पाठिंबा दिला असून त्याबाबतचे पत्रही त्यांनी सत्यजीत तांबे यांना दिले आहे.
नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगावमधील सगळ्या पदवीधर मतदारांनी सत्यजीत तांबे यांच्या नावासमोर 1 क्रमांक लिहून त्यांना या निवडणुकीत प्रचंड बहुमताने जिंकवावे असे आवाहन मस्ट या संघटनेने केले आहे.
महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटनेने सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देण्यासाठी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पदवीधरांना उच्चशिक्षित असलेल्या सत्यजीत तांबे यांच्यात समस्यांचे निराकरण करणारा आशेचा किरण दिसत आहे.
त्यांच्या विजयात आपलाही खारीचा वाटा असावा या उद्देशाने मी मनिष गावंडे, महाराष्ट्र खासगी शिक्षक संघटनेचा अध्यक्ष म्हणून सत्यजीत तांबे यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर करत आहे. नाशिक विभागातील संघटनेचे पदाधिकारी आणि हितचिंतक, शिक्षक हे सत्यजीत तांबे यांच्या विजयासाठी निष्ठेने काम करतील असे आश्वासनही गावंडे यांनी दिले आहे.
सत्यजीत तांबे यांचे वडील आ. डॉ.सुधीर तांबे यांनी या मतदारसंघाचे 3 वेळा प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांनी पदवीधरांच्या समस्या सोडवण्यासाठी मनापासून काम केले होते. कार्यकर्ते जोडण्याची त्यांची हातोटी त्यांचे पुत्र आणि अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनीही आत्मसात केली आहे. सत्यजीत तांबे यांचा कामाचा व पाठपुरावा करण्याचा आवाका मोठा असून त्यांनी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले आहे.
या काळात त्यांनी विविध कामे करत तरुण वर्गाला आपल्यासोबत जोडण्याचे काम केले होते. तेव्हापासून त्यांनी जोडलेले तरुण कार्यकर्ते किंवा पाठिराखे हे त्यांनी मनापासून जोपासले असून ज्यामुळे ते आजही राज्यातील तरुणांमध्ये लोकप्रिय युवानेते म्हणून ओळखले जातात.
डॉ.सुधीर तांबे यांनी या मतदारसंघासाठी केलेली आजवरची कामे आणि सत्यजीत तांबे यांची उभ्या महाराष्ट्रात असलेली लोकप्रियता यामुळे सत्यजीत तांबे यांना मिळणारा पाठिंबा हा वाढत असून दिवसागणिक तो अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.