तुमची जागा-जमीन कोणी बळकावलीय किंवा अतिक्रमण केलयं का? उताऱ्यावर परस्पर नोंदी करून जागा हपडल्यास ‘येथे’ अर्ज केल्यास नक्की मिळेल न्याय; ‘ही’ कागदपत्रेही आवश्यक

बेकायदा फेरफार तयार करून किंवा दंडेलशाही करून जागा-जमीन बळकावली किंवा त्याठिकाणी अतिक्रमण केले असल्यास संबंधिताला दिवाणी न्यायालयातून न्याय मिळतो. दुसरीकडे मालकीच्या सातबारा उताऱ्यावर चुकीच्या पद्धतीने नावे लावली असल्यास किंवा चुकीची नोंद ओढून खरेदीखत केले असल्यास त्यांना प्रांताधिकाऱ्यांकडे दाद मागता येतो.
Farmer issue land grabbing act in maharashtra
Farmer issue land grabbing act in maharashtrasakal
Updated on

सोलापूर : बेकायदा फेरफार तयार करून किंवा दंडेलशाही करून जागा-जमीन बळकावली किंवा त्याठिकाणी अतिक्रमण केले असल्यास संबंधिताला दिवाणी न्यायालयातून न्याय मिळतो. दुसरीकडे स्वतःच्या मालकीच्या सातबारा उताऱ्यावर कोणीतरी चुकीच्या पद्धतीने नावे लावली असल्यास किंवा चुकीची नोंद ओढून जागेचे खरेदीखत केले असल्यास त्यांना प्रांताधिकाऱ्यांकडे दाद मागून न्याय मिळविता येतो.

सोलापूर शहरातील विशेषतः हद्दवाढ भागातील अनेक जागा बेकायदा बळकावण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. दुसरीकडे समोरील व्यक्तीच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन त्याच्या जागेवर अतिक्रमण किंवा कब्जा करण्याचेही प्रकार लक्षणीय आहेत. गंभीर बाब म्हणजे उताऱ्यावरील व्यक्तीच्या परस्पर जागेची खरेदी किंवा उताऱ्यावर नावांची नोंद लावण्याचेही प्रकार घडत आहेत. अशावेळी त्या व्यक्तींना पुन्हा स्वतःचीच जागा असल्याचे सिद्ध करण्यासाठी एजंटला हजारो रुपये देऊन दाद मागावी लागत असल्याचीही वस्तुस्थिती आहे. असे गैरप्रकार थांबविण्यासाठी पोलिसांचीही मदत आवश्‍यक असून महसूलमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही मंडलाधिकारी, तलाठ्यांकडील कामांची पेन्डन्सी, नोंदीची माहिती नियमित घेणे आवश्यक असल्याची अपेक्षा सर्वसामान्यांची आहे.

जपून ठेवा ‘ही’ कागदपत्रे

१) खरेदी खत

जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात जमिनीची मूळ मालकी सिद्ध करण्यासाठी खरेदी खत महत्त्वाचे असून जमिनीच्या मालकी हक्काचा तो प्रथम पुरावा समजला जातो. यावर जमिनीचा व्यवहार किती तारखेला, कोणत्या दोन व्यक्तींमध्ये, किती क्षेत्राचा व किती रुपयास झाला, याची सविस्तर माहिती असते. खरेदी खत झाल्यावर ती माहिती फेरफारवर येते आणि मग सातबारा उताऱ्यावर नवीन मालकाची नोंद होते. आता १९८५ पासूनचे खरेदीखत ऑनलाइन पाहता येतात.

------------------------------------------------------------------------------------------

२) सातबारा उतारा

शेतजमिनीचा सातबारा उतारा जमिनीच्या मालकी हक्काचा महत्त्वाचा आहे. शेतकऱ्याकडे किती जमीन, किती जमिनीवर त्याचा अधिकार, हे नमूद असते. त्यावरील भूधारणा पद्धतीतून जमिनीचा खरा मालक कोण, याची ओळख पटते. ‘भोगवटादार वर्ग-एक’च्या जमिनीचे हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात, शेतकरीच हा मालक असतो. ‘भोगवटादार वर्ग-दोन’मध्ये जमिनींचे हस्तांतर करण्यावर शासनाचे निर्बंध असतात आणि सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय या जमिनींचे हस्तांतर होत नाही. तिसऱ्या प्रकारच्या जमिनी ‘सरकार’ प्रवर्गात मोडतात. या जमिनी सरकारी मालकीच्या असतात. चौथ्या प्रकारात ‘सरकारी पट्टेदार’ जमिनी असतात, यामध्ये सरकारी मालकीच्या पण भाडेतत्वावर दिलेल्या जमिनी असतात.

--------------------------------------------------------------------------------------------

३) खाते उतारा किंवा ८-अ

एखाद्या शेतकऱ्याची जमीन वेगवेगळ्या गट क्रमांकांमध्ये विभागलेली असू शकते. या गट क्रमांकांमधील शेतजमिनीची माहिती एकत्रितपणे ‘८-अ’मध्ये असते. या उताऱ्यामुळे एखाद्या गावात तुमच्या मालकीची जमीन कोणकोणत्या गटात आहे हे समजते. त्यामुळे जमिनीच्या मालकी हक्कासाठी हा उतारा महत्त्वाचा दस्ताऐवज आहे. १ ऑगस्ट २०२० पासून हा उतारा डिजिटल स्वाक्षरीचा उपलब्ध आहे.

----------------------------------------------------------------------------------------------

४) जमीन मोजणीचे नकाशे

जमिनीच्या मालकी हक्कासंदर्भात काही वाद उद्भवल्यास जमिनीची मोजणी केली जाते. यावेळी जमीन मोजणीचे नकाशे असल्यास त्या जमिनीवरील मालकी हक्क प्रस्थापित करता येऊ शकतो. त्यामुळे जमीन मोजणीचे नकाशे जपून ठेवणे आवश्‍यक आहे. एका ठरावीक गट नकाशातील शेतजमीन कुणाच्या नावावर आहे, त्या शेतकऱ्याचे नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे, याची माहिती त्यात असते.

-----------------------------------------------------------------------------------------------

५) जमीन महसूलाच्या पावत्या

दरवर्षी जमिनीचा महसूल भरल्यानंतर तलाठ्यांमार्फत दिली जाणारी

पावती, हा सुद्धा जमिनीच्या मालकी हक्काबाबत महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो. या पावत्या सांभाळून ठेवल्यास वेळप्रसंगी पुरावा म्हणून त्याचा वापर करता येतो. याशिवाय एखादी जमीन तुमच्या मालकीची असेल आणि या जमिनीबाबत पूर्वी कोणतीही केस किंवा खटला चालला असल्यास त्याची कागदपत्रे, त्यातील जबाबाच्या प्रती, निकालपत्र जपून ठेवावे. याचाही वापर मालकी हक्काचा दावा करण्यासाठी करता येतो.

-------------------------------------------------------------------------------------

६) प्रॉपर्टी कार्ड

मालमत्तेच्या हक्काविषयी माहिती सांगणारा सरकारी कागद म्हणजे प्रॉपर्टी कार्ड. ज्या पद्धतीने साताबारा उताऱ्यावर व्यक्तीच्या मालकीची शेतजमीन किती, याची माहिती असते, त्याचप्रमाणे प्रॉपर्टी कार्डवर बिगरशेतीची नोंद असते. बिगर शेतजमिनीवर स्थावर मालमत्ता म्हणजेच घर, बंगला, व्यवसायाची इमारत आहे याची माहिती प्रॉपर्टी कार्डवर असते. बिगरशेती क्षेत्रात घर असल्यास संबंधित व्यक्तीने घरपट्टी भरल्याच्या पावत्याही सांभाळून ठेवाव्यात. घराच्या मालकीविषयी वाद निर्माण झाल्यास त्याचा पुरावा म्हणून वापर होतो.

कागदपत्रांसह अपिल केल्यास अन्यायग्रस्ताला निश्चित न्याय

जागा किंवा जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर चुकीची नोंद झाली असेल किंवा उताऱ्यावरील नावे चुकीच्या पद्धतीने काढली गेली असल्यास त्यांना प्रातांधिकाऱ्यांकडे अपील करण्याचा अधिकार आहे. कागदपत्रांची पडताळणी होऊन सुनावणीअंती संबंधिताला न्याय दिला जातो. पण, जागेवर बेकायदा कब्जा किंवा कोणी अतिक्रमण केले असल्यास त्यांना दिवाणी न्यायालयातून दाद मागता येते.

- सदाशिव पडदुणे, प्रांताधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.