सेनापती कापशी (कोल्हापूर) :‘‘एकरकमी एफआरपी २,९६० रुपये आणि एक जानेवारीपासून कामगारांना वेजबोर्डही लागू करण्याची घोषणा संस्थापक व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केली. काळम्मा बेलेवाडी (ता. कागल) (Belewadi) येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या सातव्या गळीत हंगाम प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बिद्री कारखान्याचे संचालक गणपतराव फराकटे (Ganapatrao Farakte) होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘‘एकरकमी एफआरपी देणे कर्तव्यच आहे. त्यामुळे कोणीही टीमकी वाजवण्याची गरज नाही. आंबेओहळ प्रकल्प पूर्ण झाला आहे. लवकरच नागणवाडीही पूर्ण होईल. त्यानंतर हक्काचा ऊस पिकेल. गाळप क्षमता दहा हजार टन, ५० मेगावॅट वीजनिर्मिती व दररोज एक लाख लिटर इथेनॉलनिर्मिती असा विस्तार वाढ करणारच. नऊ लाख टन गाळपासह ११ कोटी युनिट वीजनिर्मिती, सव्वा कोटी लिटर इथेनॉल व ५० लाख लिटर रेक्टिफाईड स्पिरिट उत्पादनाचे उद्दिष्ट आहेत.’’
प्रताप उर्फ भय्या माने म्हणाले, ‘‘सात वर्षे वयाचा कारखाना प्रस्थापित कारखान्यांच्या बरोबरीने दर आणि शेतकऱ्यांना सोईसुविधा देत आहे.’’
कर्मचारी संजय पाटील (भडगाव) यांनी महिन्याचा पगार मंत्री मुश्रीफ यांच्या न्यायालयीन दाव्याच्या खर्चासाठी दिला.
युवराज पाटील, सतीश पाटील, मनोज फराकटे, शशिकांत खोत, प्रवीणसिंह भोसले, विकास पाटील, सूर्याजी घोरपडे उपस्थित होते. स्वागत अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी केले. प्रास्ताविक जनरल मॅनेजर संजय घाटगे यांनी केले. सूत्रसंचलन विशाल बेलवळेकर यांनी केले. संतोष मोरबाळे यांनी आभार मानले.
तुमचे आदर्श घेऊ
मुश्रीफ यांनी प्रा. जालिंदर पाटील, सावकर मादनाईक भेटल्यावरचा किस्सा सांगितला. ते त्यांना म्हणाले, ‘‘इतर जिल्ह्यात कर्जमुक्त कारखाने तीन टप्प्यात एफआरपी देतात. शेतकरी संघटनेने कारखाना बंद पाडल्याने शिरोळमधील चार कारखाने एकरकमी एफआरपी देतात. अशा स्थितीत त्यांना आवाहन केले, की व्यक्तिगत नव्हे; परंतु एक कर्ज नसलेला साखर कारखाना भाड्याने घ्या, तो आदर्शवत चालवून दाखवा. तुमच्या पावलावर पाऊल टाकून कारखाना चालवण्याचे तुमचे आदर्श घेऊ.’’
डांगोरा कशाला
प्रवीणसिंह भोसले म्हणाले, ‘‘सगळेच एकरकमी एफआरपी देत आहेत मग ‘शाहू’ने दिल्याचा डांगोरा पिटण्याची काय गरज. संजय घाटगे यांच्या अन्नपूर्णा कारखान्याला मिळणारा प्रतिसाद पाहून ऊस तिकडे जातोय या भीतीने हा गवगवा समरजितसिंह घाटगे करीत आहेत. पाच वर्षांपूर्वी शेतकरी संघटनेने गाळप बंदची हाक दिली तेव्हा तलवारी आणि बंदुका घेऊन ऊस आणून गाळप केले. त्यावेळी शेतकऱ्यांबद्दलचे प्रेम कुठे गेले होते.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.