सोलापूर : सार्वजनिक विभागाने रुग्णवाहिकांवरील चालक भरतीचा कंत्राटदार बदलला असून अन्य सेवांचेही कंत्राटदार बदलले आहेत. याशिवाय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने देखील कंत्राटदार बदलला असून त्यांच्यातर्फे आता १५ संवर्गातील पदे नव्याने भरली जाणार आहेत. कंत्राटदार बदलामुळे अंदाजे पाच हजार कर्मचाऱ्यांना चार ते आठ वर्षानंतर घरी बसावे लागणार आहे.
राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये सद्य:स्थितीत पावणेतीन लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. तरीदेखील बाह्य यंत्रणांद्वारे कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय झाला हे विशेष. सार्वजनिक आरोग्य विभागाकडील सीटी स्कॅन, सफाई, सुरक्षा, एमआरआय, डायट, एक्स-रे, रक्त तपासणी, लॅबोरेटरी, रुग्णवाहिकांवरील चालक, अशा सेवा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सुरु आहेत.
तर ‘एमआयडीसी’कडील वाहनचालक, फिटर, विजतंत्री, तांत्रिक सहायक, गाळणी निरीक्षक, कनिष्ठ अभियंते, भूसंपादन सहायक, भूसंपादन फॅसिलिटर, कॅड ऑपरेटर, भूमापक, मल्टीपर्पज वर्कर आणि कार्यालयीन सहाय्यक, अशी पदे देखील कंत्राटी पद्धतीनेच भरली जात आहेत. शासनाच्या बहुतेक विभागांमध्ये कंत्राटी कर्मचारी भरले जात आहेत. त्यासाठी कंत्राटदार नेमले जात आहेत. मात्र, पूर्वीच्या कंत्राटदाराचे कर्मचारी नवीन कंत्राटदार आल्यावर त्याठिकाणी राहात नाहीत. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचीही अडचण होत असून त्यांनी वरिष्ठांना आहे तेच कर्मचारी ठेवावेत, अशी पत्रे पाठविली आहेत.
कंत्राटदार बदलामुळे रुग्णवाहिकेवरील कर्मचारी बदलतील
कंत्राटदार बदलल्याने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडील रुग्णवाहिकांवर २०१६-१७ पासून कार्यरत कंत्राटी चालकांची आता सेवा समाप्ती केली जाणार आहे. पण, सध्या कार्यरत चालकांनाच त्याठिकाणी ठेवायचे की नवीन भरायचे हा अधिकार त्या नवीन कंत्राटदाराचा असणार आहे. याशिवाय १० वर्षांपूर्वी शासनाच्या माध्यमातून नेमलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनात समाविष्ठ करून घेण्याची कार्यवाही सुरु असून त्यासंदर्भात पुण्यात बैठक आहे.
- डॉ. संतोष नवले, जिल्हा आरोग्याधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर
‘एमआयडीसी’च्या महाव्यवस्थापकांचे आदेश
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक तुषार मठकर यांनी २५ सप्टेंबरला काढलेल्या आदेशानुसार नवीन कंत्राटदारास एक वर्षासाठी १५ संवर्गातील ६३५ कर्मचारी कंत्राटी पद्धतीने पुरवावे लागणार आहेत. त्यात ६७ वाहनचालक, १० फिटर, एक पंपचालक, चार विजतंत्री, १२ तांत्रिक सहायक, दोन गाळणी निरीक्षक, ६९ कनिष्ठ अभियंते, एक भूसंपादन सहायक, आठ भूसंपादन फॅसिलिटर, १३ कॅड ऑपरेटर, चार भूमापक, २३४ मल्टीपर्पज वर्कर आणि २१२ कार्यालयीन सहाय्यक, अशी पदे आहेत. नवीन कंत्राटदारामुळे काही वर्षांपासून तेथील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना आता घरी बसावे लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.