देशाला स्वातंत्र्य मिळून काही वर्षच उलटली होती. देशभरातील लोकांनी गुण्या-गोविंदानं नांदायला सुरूवात केली होती. मात्र देशातील अनेक राज्यांना भाषावार प्रांत रचनेचा मुद्दा भेडसावत होता. यामध्ये आताच्या महाराष्ट्रातले, म्हणजेच तेव्हाच्या हैद्राबाद, गुजरात, विदर्भ आणि मुंबई अशा वेगवेगळ्या भागांत राहणारे मराठी भाषिक देखील मोकळा श्वास घेण्यासाठी धडपडत होते. कारण मराठी भाषेच्या आधारावर मुंबई, मराठवाडा, विदर्भासह स्वतंत्र्य राज्य स्थापन व्हावं ही त्याकाळच्या लोकांची प्रमुख मागणी होती. मात्र आज आपल्याला वाटते, तेवढी ही गोष्ट सोपी नव्हती. याच मागणीसाठी पुढे मोठा संघर्ष उभा राहिला.
मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचं एक राज्य असावं या मागणीसाठी मराठी भाषिकांनी संघर्ष सुरू केला. या चळवळीची सुरूवात १ मे १९४६ रोजी बेळगावमध्ये झाली. संयुक्त महाराष्ट्राची मागणी करण्याच्या विचारानं प्रेरीत होऊन संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. या समितीची स्थापना झाली, त्यावेळी कुणाच्या ध्यानी मनीही नसेल की हा संघर्ष पुढे एवढा मोठा होईल. १९४६ पासून सुरु झालेल्या या चळवळीनं वेगवेगळी वळणं पाहिली. देशाला स्वातंत्र्य मिळालेलं होतं, मात्र भाषावार प्रांत रचना तेव्हा अंतर्भूत झालेली नव्हती. त्यामुळे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला.
केंद्रात असलेल्या काँग्रेस सरकारचंच या गोष्टीला समर्थन नव्हतं. त्यामुळे वेगवेगळ्या समित्या, आयोग नेमण्यात आले. अकोला करार, नागपुर करार यांसारखे करार झाले. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी देखील वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या भुमिका घेतल्या. अशाच एका टप्प्यावर पंडीत जवाहरलाल नेहरुंनी घोषणा केली की, मुंबई केंद्र शासित प्रदेश राहील. या घोषणेनंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागलं.
१६ जानेवारी १९५६ ला पंडित नेहरूंनी मुंबईला केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा दिला जाईल, अशी घोषणा केली आणि पुढच्या काही वेळातच १७ तारखेला बंद पुकारण्यात आला. १७ जानेवारीचा सुर्य उगवला आणि बंदला मुंबईत हिंसक वळण लागलं. मुंबईसह इतरत्र सुद्धा ही दंगल पसरली मात्र, चळवळीचं केंद्र झालेल्या मुंबईत हिंसचाराची आग जास्त भडकली. अनेक ठिकाणी प्रतिकात्मक आंदोलनांनी दिवसाला सुरूवात झाली. यावेळी पोलिसांनी जमावाला पांगण्याचा प्रयत्न केला असता संघर्ष झाला.
मध्य व उत्तर मुंबईत आंदोलकांनी काही ठिकाणी बसेस आणि इमरतींवर दगडफेक केली. काही ठिकाणी पंडित नेहरू आणि मोरारजी देसाई यांच्याविरोधात मोर्चे निघाले. तर काहींनी मत्र्यांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी केली. या दिवसभरात झालेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये मुंबईत ८ ठिकाणी गोळीबार झाला. यामध्ये ४ जण जखमी झाले, तर १०६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
दुसरा दिवस कसा असेल याकडे नेते मंडळी, पोलीस अधिकारी आणि पत्रकारांसह सर्वांचच लक्ष लागून होतं. कारण हिंसाचाराची आग शांत होण्याचं नाव घेत नव्हती. दुसऱ्या दिवसाची सकाळ सुद्धा हिंसाचाराच्या घटनांनी झाली. मुंबई एवढी ढवळून निघाली होती की, कोणत्याही कोपऱ्यात गेलात तर घोषणा, जाळपोळ, पोलिसांच्या वाहनांचे सायरन याशिवाय दुसरं काहीच कानावर पडत नव्हतं. पोलीस आणि आंदोलकांमधला संघर्ष वाढत गेला. यावेळी पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या गोळीबारात काहीजण जखमी तर काही ठार झाले. आंदोलकांनीही पोलिसांवर दगडफेक, लाठीहल्ले, अॅसिड हल्ले केल्याचं वृत्तपत्रातील बातम्यांमधून दिसून येतं.
डाव्या पक्षांनी सर्व कामगारांनाही बंदचं आवाहन केलं होतं. त्यामुळे ही आग औद्योगिक भागातही पसरत होती. पोलिसांनी तात्काळ त्याठिकाणी कर्फ्यु लागू केला. दिवसभर सर्वत्र गोंधळ उडालेला होता. १९ जानेवारीच्या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर आजंही त्या भयावह आठवणींच्या खुना आहेत. "मुंबई ११४ वेळा गोळीबार, १० ठार, २५० जखमी" हा मथळा संयुक्त महाराष्ट्राच्या रक्तरंजीत संघर्षाचा इतिहास सांगतो.
तिसरा दिवस सुद्धा हिंसाचाराच्या घटनांचाच होता. १८ जानेवारीला झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लष्करी तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. मुंबईत सुरू झालेल्या या हिंसाचाराने आता ठाण्यापर्यंतचा परिसर कवेत घेतला होता. काही ठिकाणी सरकारी इमारती पेटवल्या गेल्या, काही ठिकाणी जाळपोळ करण्यात आली, काही ठिकाणी पोलिसांवर हल्ले झाले, कुठे पोलिसांसह पोलीस स्थानकाला आग लावण्यात आली तर काही ठिकाणी थेट पोलिसांवर हात बाँब फेकल्याचं बातम्यांमधून दिसून येतं. दंगल शांत व्हायला २० जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागली. २० जानेवारीला वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर आलेल्या बातमीनुसार दंगल शांत झाली होती, मात्र मागच्या ४ दिवसांत पोलिसांच्या गोळीबारात तब्बल ३७ जण ठार झाले होते.
पुढे याच चळवळीच्या आणखी एका टप्प्यावर महाद्वैभाषिक राज्याची स्थापना झाली. ज्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र आणि महागुजरात अशा दोन्ही राज्यांचा समावेश होता. मात्र ही गोष्ट देखील समितीला मान्य नव्हती. ३० नोव्हेंबर १९५७ ला नेहरु छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या उद्घाटनासाठी प्रतापगडावर आले होते. त्यावेळी मोठ्या संख्येनं संयुक्त महाराष्ट्र समितीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली होती. नंतर दिल्लीत देखील निदर्शनं केली. मोठ्या संघर्षानंतर अखेर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन स्वतंत्र राज्यं अस्तिवात आली. १९४६ ते १९६० मध्ये थेट संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीपर्यंत सुरु असलेल्या या यशस्वी संघर्षातील १९५६ चा जानेवारी महिना म्हणजे कधीही न विसरता येणारा इतिहास आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.